इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) सैनिक आणि सुटका झालेल्या पाच पॅलेस्टिनी बंदिवानांनी दिलेल्या महितीनुसार, इस्त्रायली लष्करी दलाने विशेषत: गाझामध्ये पॅलेस्टिनी नागरिकांना धोकादायक ऑपरेशन्समध्ये ढाल म्हणून ठेवणारे प्रोटोकॉल लागू केले आहेत. ‘सीएनएन’द्वारे गोळा केलेल्या माहितीनुसार, मॉस्किटो प्रोटोकॉलनुसार घरे, बोगदे आणि इतर ठिकाणी अडकलेले इस्रायली सैन्य पॅलेस्टिनी बंदिवानांना ढाल म्हणून पुढे करीत आहे. सुटका झालेल्या पाच पॅलेस्टिनी नागरिकांनी खुलासा केला आहे की, इस्रायली सैन्याला बघताच नागरिक त्यांच्यावर हल्ला करीत होते. त्यांना इतर ठिकाणी हल्ले करण्यापासून रोखले जात होते. आता याच पॅलेस्टिनी नागरिकांचा वापर करून, इस्रायली सैन्य आपला बचाव करीत, आपले ध्येयही पूर्ण करीत आहे. काय आहे वास्प आणि मॉस्किटो प्रोटोकॉल? याचा इस्रायलला कसा फायदा होत आहे? त्याविषयी जाणून घेऊ.
संपूर्ण संघर्षात इस्रायलच्या विविध युनिट्समधील सैनिकांनी बंदीवानांचे वर्णन करण्यासाठी विशिष्ट शब्दांचा वापर केला आहे. गुप्तचर अधिकाऱ्यांनी लहान आणि विशिष्ट असाइनमेंटसाठी इस्रायलमधून गाझामध्ये आणलेल्या व्यक्तींना वास्प म्हणून ओळखले जाते. दुसरीकडे मॉस्किटो हा शब्द थेट गाझामध्ये पकडलेल्या कैद्यांसाठी वापरला जातो; ज्यांना इस्त्रायलमध्ये हस्तांतरित न करता, गाझामधील इस्रायली सैनिकांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्याच ठिकाणी बंदिस्त ठेवले जाते.
हेही वाचा : हरदीप सिंह निज्जरचे मृत्यू प्रमाणपत्र देण्यास कॅनडाचा नकार; राष्ट्रीय तपास संस्थेला प्रमाणपत्र का हवेय?
आयडीएफ सैनिकांनी ताब्यात घेतलेल्यांचा कसा वापर केला जातो?
“इमारतीत, बोगद्यांमध्ये स्फोटके लावली जातात. आम्ही त्यांना आमच्या आधी इमारतीत जाण्यास सांगतो; जेणेकरून स्फोट झाल्यास आम्हाला काही होऊ नये,” असे आयडीएफ सैनिकाने सांगितले. आयडीएफ सैनिकांनी दिलेल्या माहितीनुसार- अशा पद्धतीने गाझा शहर, रफाह, खान युनिस व उत्तर गाझासह संपूर्ण गाझामधील प्रमुख भागांत पॅलेस्टिनी नागरिकांचा वापर करण्यात आला आहे. सामान्यत: चिलखती वाहने, टाक्या किंवा कुत्र्यांचा वापर करून संशयित ठिकाणांची तपासणी केली जाऊ शकते. मात्र, तरीदेखील आयडीएफ सैनिकांना पॅलेस्टिनी नागरिकांचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे. युनिटमधील काही सैनिकांनी याला विरोध केला असला तरी वरिष्ठ कमांडरचे निर्देश मान्य करणे त्यांच्यासाठी अनिवार्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
पॅलेस्टिनी नागरिकांचा अनुभव
२० वर्षीय मोहम्मद साद म्हणाला की, त्यांना लष्करी गणवेश परिधान करण्यास भाग पाडले गेले. “त्यांनी आम्हाला लष्करी गणवेश घालण्यास भाग पाडले, आमच्यावर कॅमेरा लावला आणि आम्हाला मेटल कटर दिला,” असे त्याने सांगितले. तो पुढे म्हणाला, “ते बोगदे शोधत आहेत, असे सांगून, त्यांनी आम्हाला संशयास्पद गोष्टी तपासण्यास सांगितले. काही घटनांमध्ये संभाव्य स्फोटकांची भीती असल्याने इस्रायली सैनिकांनी बंदिवानांना जिन्याखाली चित्रीकरण करणे, कपाटांची तपासणी करणे व फर्निचर हलवणे आदी गोष्टी करण्यास सांगितले.” सादने एका घटनेचे वर्णन करताना सांगितले की, टाकीजवळ चित्रीकरण करताना, त्याला गोळी लागली; परंतु तो वाचला. त्यानंतर इस्रायलच्या सोरोका मेडिकल सेंटरमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले. १७ वर्षीय मोहम्मद शबेर याच्या वडिलांची आणि बहिणीची हत्या झाल्यानंतर त्याला बंदिस्त करण्यात आले होते. “त्यांनी माझा मानवी ढाल म्हणून वापर केला. मला उद्ध्वस्त केलेल्या घरांमध्ये, धोकादायक किंवा भूसुरुंग असलेल्या ठिकाणी नेले,” असे त्याने सांगितले.
इस्रायली लष्कराने यावर काय प्रत्युत्तर दिले?
आयडीएफच्या प्रवक्त्याने हे आरोप फेटाळले असून, लष्करी ऑपरेशनमध्ये गाझा नागरिकांचा वापर करण्यास मनाई असल्याचे सांगितले आहे. इस्रायली सैन्याने ‘सीएनएन’ला सांगितले, “आयडीएफचे निर्देश आणि मार्गदर्शक तत्त्वे ताब्यात घेतलेल्या गाझा नागरिकांचा लष्करी कारवाईसाठी वापर करण्यास कठोरपणे प्रतिबंधित करतात. आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा आणि इस्रायली सर्वोच्च न्यायालयाने अशा कृतींना मानवी हक्कांचे उल्लंघन मानून नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर करण्यावर बंदी घातली आहे.” २००५ मध्ये अधिकार गटांच्या तक्रारींनंतर, इस्रायली सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला होता. परंतु, आयडीएफ सैनिकांना त्यांचे अनुभव सामायिक करण्यासाठी व्यासपीठ प्रदान करणारी संस्था ‘ब्रेकिंग द सायलेन्स’कडे असी अनेक छायाचित्रे आहेत; ज्यात पॅलेस्टिनी नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर केल्याची, डोळ्यांवर पट्टी बांधून, हात बांधून नागरिकांना गाझामधील उद्ध्वस्त इमारतींमध्ये नेण्यात आल्याची छायाचित्रे आहेत.
हेही वाचा : प्राण्यांची गणना का केली जाते? त्यामागचे उद्दिष्ट काय?
हे दावे खरे आहेत का?
हमासने नागरी वस्त्यांमध्ये आपल्या लष्करी कारवाया सुरू केल्या, असा आरोप इस्रायलने केला आहे. त्यामुळे संघर्षादरम्यान मोठ्या प्रमाणात नागरी मृत्यू होत आहेत. आयडीएफने असा दावा केला आहे की, हमासच्या या रणनीतीमुळे नागरिकांना धोका निर्माण होतो; ज्यामुळे शाळा, रुग्णालये व निवासी संकुले यांसारख्या भागांवर हल्ले होतात. इस्रायली सैन्याने यालाच गाझामधील पॅलेस्टिनी नागरिकांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरवले आहे. पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार अलीकडील आयडीएफ ऑपरेशन्समुळे ऑक्टोबरपासून ४२,००० हून अधिक मृत्यू झाल्याची माहिती आहे. युनायटेड नेशन्सचा अंदाज आहे की, यात बहुतांश सामान्य नागरिक आहेत. “आम्ही हमासला पॅलेस्टिनींना मानवी ढाल म्हणून वापरताना पाहिले,” असे इस्रायली सैनिक म्हणाला. “पण, माझ्या स्वत:च्या सैन्यानेही तेच केले हे पाहणे माझ्यासाठी अधिक वेदनादायक होते. हमास ही दहशतवादी संघटना आहे. आयडीएफने दहशतवादी संघटनांच्या पद्धतींचा वापर करू नये,” असे त्याने सांगितले.