ज्ञानेश भुरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एक वेळ अशी होती, की रवींद्र जडेजा आंतरराष्ट्रीय स्तरावर येण्यासाठी धडपडत होता. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत त्याने स्वतःला सिद्ध केले होते. गोलंदाज तर होताच, त्याच्याकडे फलंदाज म्हणूनही बघितले जायचे. मात्र, तो वेगवान गोलंदाजी खेळताना अडचणीत सापडायचा. असा काय बदल झाला आणि आज तो एक परिपूर्ण अष्टपैलू खेळाडू म्हणून गणला जातोय, याविषयीचा हा आढावा.

जडेजा उत्तम फिरकी गोलंदाज होताच, पण फलंदाज म्हणून त्याची ओळख कशी झाली?

देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत रवींद्र जडेजाने आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीने छाप पाडली होती. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय होण्यासाठी ती पुरेशी नव्हती. त्यामुळेच आयपीएलमध्येच रवींद्र जडेजा नावाचा गुणी क्रिकेटपटू गवसला असे म्हणायला वाव आहे. आयपीएलच्या २०२१ च्या हंगामात रवींद्र जडेजाच्या कामगिरीने चेन्नईने तेव्हा फॉर्ममध्ये असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला हंगामातील पहिला पराभव पत्करायला भाग पाडले. जडेजाने २८ चेंडूंत नाबाद ६२ धावांची खेळी केली. त्यानंतर आपल्या गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाने रॉयल चॅलेंजर्सच्या आव्हानातील हवा काढून घेतली. तेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा कर्णधार विराट कोहलीने आम्हाला चेन्नई सुपर किंग्जने नाही, तर एका खेळाडूने हरवले असा शब्दात जडेजाच्या खेळीचे कौतुक केले. जडेजाची अष्टपैलू म्हणून ही पहिली ओळख.

असे काय होते त्या खेळीत?

त्या वेळी खाते उघडण्यापूर्वीच ख्रिस्तियनने त्याचा झेल सोडला होता. याचा पूर्ण फायदा उठवत त्याने प्रथम काईल जेमिसनचा समाचार घेतला. नंतर हर्षल पटेलच्या गोलंदाजीत पाच षटकारांसह ३७ धावा कुटल्या होत्या. ते चेन्नईच्या डावातील अखेरचे षटक होते. त्यामळे चेन्नईला ४ बाद १९१ अशी मोठी धावसंख्या उभारता आली होती.

जडेजा तोपर्यंत भरवशाचा फलंदाज नव्हता का?

भरवाशाचा असे म्हणता येणार नाही, पण तोपर्यंत फलंदाज म्हणून त्याच्याकडे फारसे गांभीर्याने बघितलेही जात नव्हते. फिरकी गोलंदाजी आत्मविश्वासाने खेळणारा जडेजा वेगवान गोलंदाजीला कायम घाबरून खेळायचा. आखूड टप्प्याचे चेंडू पडले की जाडेजाची गाळणच उडत होती.

पण, आता काय बदल झाला?

फलंदाजीची बदललेली शैली, हाताचा विस्तार करून तो फटके खेळू लागला. फलंदाजी करताना किंवा फटके मारताना तो एका ठरावीक पद्धतीने पाठीची कमान करू लागला. त्याचा फरक इतका पडला की तो वेगवान गोलंदाजांचा अधिक धाडसाने सामना करू लागला. तंदुरुस्तीला त्याने दिलेले महत्त्व हे या सगळ्याच्या मुळाशी आहे. याच तंदुरुस्तीमुळे त्याला आवश्यक ऊर्जा आणि फटके खेळण्याची ताकद मिळते. त्याचबरोबर फटका खेळताना तो पाठ मागच्या बाजूला एक विशिष्ट पद्धतीने वाकवून खेळू लागला. या पद्धतीमळे त्याच्या फटक्यांना वेगळी ताकद मिळत होती. आयपीएलच्या त्या खेळीने त्याला हे गवसले आणि भारताला एक अष्टपैलू खेळाडू मिळाला. त्यानंतर मेलबर्न मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध महत्त्वाच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने ५७ धावांची सामना जिंकून देणारी खेळी केली. कॅनबेरा येथील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने नाबाद ६६ धावांची खेळी केली. या दोन खेळीनी त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील वेगळी ओळख मिळाली.

जडेजाची उपस्थिती भारतीय संघासाठी किती महत्त्वाची ठरते?

त्याची तंदुरुस्ती, स्फोटक फलंदाजी, चित्त्याच्या चपळाईचे क्षेत्ररक्षण आणि उपयुक्त डावखुरी फिरकी गोलंदाजी यामुळे तो खऱ्या अर्थाने परिपूर्ण क्रिकेटपटू ठरतो. त्याच्या उपस्थितीने कर्णधार निश्चिंत असतो. संघाला जेव्हा गरज असते तेव्हा तसा तो धावून येतो. फिरकी गोलंदाज म्हणून तो अपेक्षा पूर्ण करतोच. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊनही तो उपयुक्त धावा करून संघाची बाजू भक्कम करतो किंवा मर्यादित षटकांच्या सामन्यात आव्हानाचा पाठलाग सोपा करतो. क्षेत्ररक्षण तर त्याचे अव्वल आहेच. त्यामुळे संघातील त्याची उपस्थिती ही एकूणच सांघिक कामगिरीत चैतन्य निर्माण करणारी असते.

दुखापतीमुळे बाहेर बसावे लागलेल्या जडेजाचे पुनरागमन कसे झाले?

क्षेत्ररक्षण करताना जडेजाची पाठ दुखावली आणि त्यामुळे त्याला पाच महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर रहावे लागले. अनेक महत्त्वाच्या मालिकांना तो मुकला. पण, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याला संधी मिळाली. ती मिळणारच होती. कारण, कुठल्याही संघात चपखलपणे बसू शकणारा हा खेळाडू आहे. अशा खेळाडूंना वेगळ्या कामगिरीची आवश्यकता नसते. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना त्यांच्याच नियोजनात अडकवले. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्विपचा अधिक वापर करणार हे निश्चित होते. चेंडू खालीही रहात होता. त्यामुळे जडेजाने चेंडूची दिशा अगदी सरळ ठेवली. त्याचा फायदा त्याला नेमका झाला. त्याने पाच बळी मिळविले. त्यापूर्वी तंदुरुस्ती दाखविण्यासाठी रणजी सामना खेळताना त्याने सात बळी मिळविले.

या सगळ्या कामगिरीमुळे जडेजाला सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणता येईल का?

जडेजाने आपल्या फिरकी गोलंदाजीने नेहमीच छाप पाडली आहे. खेळपट्टीकडून थोडीशी जरी मदत मिळाली, तरी जडेजाचे चेंडू कमाल करतात. त्याच्या चेंडूला चांगली फिरक असते. त्यामुळे केव्हा केव्हा फिरकी गोलंदाजीला पोषक नसणाऱ्या खेळपट्टीवरही तो उपयुक्त ठरून जातो. अर्थात, अशा वेळी त्याची बॅटही मदतीला धावून येते. संघाच्या गरजेनुसार जडेजाने आपल्या बॅटनेही योगदान दिले आहे. जडेजा कायमच ५ ते ७ या क्रमांकात खेळायला येतो. तेव्हा संघाची परिस्थिती कधी चांगली असते, तर कधी संघाला धावांची आवश्यकता असते. अशा दोन्ही वेळी जडेजा खेळून गेला आहे. त्यामुळेच आज सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूत त्याची गणना झाल्यास आश्चर्य वाटणार नाही.