How the Kamasutra Defends Women’s Sexual Rights: ‘कामसूत्र’ असं ऐकलं तरी आज अनेकांच्या डोळ्यासमोर फक्त कामुक चित्रं, लैंगिक मुद्रा किंवा अश्लीलतेशी जोडलेली उत्पादनेच येतात. पण या प्राचीन ग्रंथामागे लपलेला खरा आशय आजही अनेकांना माहीत नाही. विशेषतः जेव्हा आपण स्त्रीच्या लैंगिकतेविषयी बोलतो, तेव्हा हा ग्रंथ केवळ शारीरिक संबंधांपुरता मर्यादित राहात नाही, तर तो स्त्रीच्या लैंगिक स्वातंत्र्याचा आवाज ठरतो. भारतीय समाजात आजही स्त्रियांचा लैंगिक आनंद हा संकोचाचा, टाळण्याचा आणि मौनाचा विषय आहे. पण हाच तो देश आहे, जिथे जवळपास दोन हजार वर्षांपूर्वी एक असा ग्रंथ लिहिला गेला, जो स्त्रीच्या इच्छांना, अभिव्यक्तीला आणि संमतीला महत्त्व देतो. कामसूत्र हा ग्रंथ लैंगिकतेच्या चर्चेला एक सन्मान्य, विचारप्रधान आणि स्त्रीसन्मानावर आधारित स्वरूप देतो.

भारतीय समाजात स्त्रियांचा लैंगिक आनंद हा विषय अनेकदा दुर्लक्षित केला जातो किंवा नाकारला अथवा दडपला जातो. मुलींना त्यांच्या शरीराविषयी बोलायला लाज वाटायला वाटते किंवा तसं बोलणं हे अश्लाघ्य मानलं जात आणि त्यामुळेच त्यांच्या गरजा, भावना यांविषयी फारशी चर्चा केली जात नाही. एकूणच परंपरा नेहमीच पुरुषांच्या गरजांना अधिक महत्त्व देतात. परंतु हा तोच देश आहे, जिथे कामसूत्रासारखा ग्रंथ लिहिला गेला. किंबहुना हा ग्रंथ स्त्रियांच्या लैंगिक स्वातंत्र्याविषयी उघड भाष्य करतो.

वात्स्यायनाने इ.स. ३ ऱ्या शतकात हा ग्रंथ लिहिल्याचे मानले जाते. ‘काम’ म्हणजे प्रेम, इच्छा, लैंगिकता आणि आनंद; ‘सूत्र’ म्हणजे मार्गदर्शन किंवा शास्त्र. हा ग्रंथ फक्त लैंगिक मुद्रांविषयी नसून, तो प्रेमसंबंध, नातेसंबंध, परस्पर आदर आणि सामाजिक नियम यांचं विवेचन करतो. वेंडी डोनिगर या संस्कृती अभ्यासक त्यांच्या ‘Redeeming the Kamasutra’ या पुस्तकात लिहितात की, वात्स्यायन स्त्रीच्या लैंगिक आनंदाचे समर्थन करतो. त्याने स्त्रियांना शिक्षण, अभिव्यक्ती आणि लैंगिक स्वातंत्र्य मिळावं यासाठी आग्रह धरला. कामसूत्र हा पुरुषप्रधान ग्रंथ नसून, तो दोघांच्याही परस्पर आनंद आणि संमती यावर विश्वास ठेवतो. या ग्रंथात सेक्स म्हणजे एकतर्फी विजय नाही, तर सहवासाचा अनुभव आहे, हे स्पष्ट केलं आहे.

पुरुषांच्या आनंदासाठी असणारी व्यक्ती

परंतु, आपल्याला दिसणारी आजची पुरुषकेंद्री कामसूत्राची प्रतिमा ही मुख्यतः १८८३ साली ब्रिटिश लेखक सर रिचर्ड बर्टनने केलेल्या इंग्रजी भाषांतरामुळे तयार झाली आहे. बर्टनने मूळ मजकुरातील स्त्रीच्या स्वातंत्र्यावर भाष्य करणारे भाग किंवा तरतुदी वगळल्या आणि स्त्रीची भूमिका फक्त पुरुषांच्या आनंदासाठी असणारी अशी व्यक्ती केली. याउलट अभ्यासक गणेश सैली सांगतात की, मूळ कामसूत्रात स्त्रियांना समान सहभागी म्हणून दर्शवण्यात आलं आहे. त्या हावभाव, भावना आणि शब्दांमधून आपली गरज व्यक्त करतात. त्यांचा आनंद पुरुषांच्या आनंदाइतकाच महत्त्वाचा मानला जातो. संवाद, विशेषतः सेक्सपूर्वीची संमती, हा या ग्रंथाचा महत्वाचा भाग आहे (कामसूत्रा ऑन फेमिनाईन प्लेजर; गणेश सैली, २००६)

इतका समृद्ध वारसा असूनही आजही भारतात स्त्रीच्या लैंगिकतेविषयी मोकळेपणाने बोलणं टाळलं जातं. लीझा मंगलदास या सेक्स एज्युकेटर आहेत. त्या सांगतात की, स्त्रियांचा लैंगिक आनंद आजही सांस्कृतिक अपेक्षांमुळे दडपला गेला आहे. स्त्रीने गप्प राहावं, अधीन राहावं आणि लग्नाआधी लैंगिकदृष्ट्या निष्क्रिय राहावं, अशी अपेक्षा असते. दीपा नारायण या समाजशास्त्राच्या अभ्यासक आहेत. त्या सांगतात की, ही दडपशाही घरापासूनच सुरू होते. मुलींना लहानपणापासून आपल्या गरजा नाकारायला आणि पुरुषांच्या गरजांना महत्त्व द्यायला शिकवलं जातं. याचीच परिणती पुढे कौमार्याचं गुणगान करण्यात होते. परंतु पुरुषांसाठी अशी कुठलीही अट नसते. सेक्स म्हणजे स्त्रीने पुरुषाला काहीतरी देणं असा दृष्टिकोन तयार होतो. आनंद हा पुरुषांचा अधिकार, तर स्त्रीसाठी तो फक्त एक अपघात आहे. सेक्स पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी केवळ प्रजननासाठी असावा अशी धारणा रुजलेली आहे. परंतु, मूळ कामसूत्र वेगळी कथा सांगतं. त्यात स्त्रियांना त्यांच्या आनंदात सक्रिय आणि सन्माननीय भूमिका देण्यात आली आहे. त्यांच्या कामुकतेची तुलना कोमल फुलांशी परंतु जपून ठेवावी लागणारी अशी केली आहे.

कामसूत्र स्त्रीवाद ही कल्पना विशद करतो. हा ग्रंथ फक्त सेक्ससाठी नाही, तर स्त्रीच्या लैंगिक स्वातंत्र्यासाठी आहे. तो पितृसत्ताक मानसिकतेला आव्हान देतो. स्त्रियांना त्यांच्या इच्छा मांडण्याचं आणि स्वतःच्या आनंदावर हक्क गाजवण्याचं स्वातंत्र्य देतो.
हा ग्रंथ सांगतो की, स्त्रीच्या लैंगिकतेवर नियंत्रण ठेवण्याची संकल्पना चुकीची आहे. नात्यामध्ये संमती आणि दोघांचाही आनंद ही मूल्यं अत्यंत महत्त्वाची आहेत. वेंडी डोनिगर कामसूत्राला एक प्रकारचा स्त्रीवादी ग्रंथ मानतात. कारण यामध्ये स्त्रियांना आपला जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य, आपली इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आणि सेक्स हे फक्त पुरुषांचं क्षेत्र नाही हे सांगण्याचं सामर्थ्य आहे. यात स्त्रीच्या आर्थिक स्वातंत्र्यालाही महत्त्व देण्यात आलं आहे. किंबहुना स्त्री ही आर्थिकदृष्ट्या सबल असावी याचाही आग्रह हा ग्रंथ धरतो.

पितृसत्ता विरुद्ध लैंगिक स्वातंत्र्य

कामसूत्र हे एका अर्थाने पितृसत्ता आणि लैंगिक स्वातंत्र्य यांच्यातील संघर्षाचं प्रतीक आहे. एकीकडे समाज आहे जो स्त्रीच्या इच्छांवर बंदी आणतो आणि दुसरीकडे कामसूत्र आहे, जे स्त्री-पुरुष दोघांच्याही आनंदाला महत्त्व देतं. हा ग्रंथ स्त्रियांना संवाद आणि अभिव्यक्तीसाठी मोकळं व्यासपीठ देतो. गेल्या शंभर वर्षांपासून कामसूत्राचं खरं रूप सांस्कृतिक संकोच आणि सेन्सॉरशिपमुळे झाकून टाकण्यात आलं आहे. परंतु, जर या ग्रंथाच्या कामुक प्रतिमेपलीकडे पाहिलं, तर आपल्याला असा ग्रंथ संमती, समानता आणि स्त्री-स्वातंत्र्य यांचं समर्थन करताना दिसतो.

आजही जगभरात स्त्रियांच्या इच्छांवर पाळत ठेवली जाते. अशा वेळी, स्त्रीचा लैंगिक आनंद हा काही अपराध नाही तर तो तिचा हक्क आहे, याची आठवण कामशास्त्र हा ग्रंथ करून देतो.