नेमके काय घडले?
जामनगर हवाई तळावरून जॅग्वार विमान गेल्या बुधवारी रात्रीच्या प्रशिक्षण मोहिमेसाठी आकाशात झेपावले होते. उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाडामुळे काही वेळेतच ते कोसळले. अपघाताचे कारण आणि तांत्रिक बिघाड शोधण्यासाठी हवाई दलाने ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’ चौकशी सुरू केली आहे. महिनाभरात तांत्रिक बिघाडामुळे हवाई दलाच्या जॅग्वार लढाऊ विमान अपघाताची ही दुसरी घटना आहे. मार्चमध्ये अंबाला येथे दिवसाच्या प्रशिक्षणासाठी निघालेले विमान ‘ऑनबोर्ड’ प्रणालीत बिघाड झाल्यामुळे कोसळले होते. यापूर्वी वेगवेगळ्या कालखंडात सहा जॅग्वार विमाने अपघातग्रस्त झाली. यातील २०१८ मधील एका अपघातात हवाई दलाच्या अत्यंत अनुभवी लढाऊ वैमानिकांपैकी एक शहीद झाला होता.
भारत एकमेव वापरकर्ता?
ब्रिटन आणि फ्रान्सने संयुक्तपणे विकसित केलेले जॅग्वार हे ‘स्वनातीत’ म्हणजे ध्वनीहून अधिक वेगाने (सुपरसॉनिक) उड्डाण करणारे विमान आहे. ते कमी उंचीवरून मार्गक्रमण करते. एक अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या करारांन्वये १९७९ मध्ये ही विमाने हवाई दलात समाविष्ट झाली होती. ‘समशेर’ म्हणून त्यांचे नामकरण झाले. दोन इंजिनांमुळे हवेत संचार करण्याची क्षमता अधिक आहे. आखूड आणि अंशत: बांधलेल्या धावपट्टीवरूनही ती उड्डाण करू शकतात. मार्गक्रमणातील अचूकता आणि लक्ष्यभेदी हल्ला प्रणाली असे दुहेरी गुण ही तत्कालीन तंत्रज्ञानातील मोठी झेप ठरली. सुमारे ४५ वर्षांपासून सेवेत असणाऱ्या जॅग्वार विमानांचा जगात भारतीय हवाई दल एकमेव वापरकर्ता आहे. त्याची निर्मिती करणाऱ्या फ्रान्सने शेवटचे जॅग्वार २००५ मध्ये, तर ब्रिटनने २००७ मध्ये सेवेतून निवृत्त केले.
अद्यायावतीकरणाचा पर्याय किती व्यवहार्य?
साडेचार दशकांत हिंदुस्तान एरॉनॉटिक्स (एचएएल) आणि संरक्षण संशोधन संस्था (डीआरडीओ) यांच्या सहकार्याने जॅग्वारची दूरवरून हल्ला, अचूक लक्ष्यभेद आणि पुरेशा इंधन साठ्यासह तळावर परतण्याची क्षमता सातत्याने अद्यायावत केली गेली. तीन टप्प्यांत ही प्रकिया पार पडणार होती. तिसऱ्या टप्प्यात जॅग्वारचे इंजिन बदलण्याचाही प्रस्ताव होता. परंतु अमेरिकन बनावटीचे इंजिन खरेदी करून ते बसविण्यास मोठा खर्च असल्याने तो विषय बाजूला ठेवला गेल्याचे तज्ज्ञ सांगतात. आधुनिक रडार प्रणाली, जॅमर, परदेशी-स्वदेशी प्रणालीने सुसज्जतेकडे लक्ष दिले गेले. अनेक कारवायांत जॅग्वारने महत्त्वाची कामगिरी बजावली. २०१९ मध्ये, पाकिस्तानमधील बालाकोट हल्ल्यादरम्यान, जॅग्वारचा वापर पाकिस्तानी हवाईदलाच्या अत्याधुनिक एफ-१६ चे लक्ष विचलित करण्यासाठी केला गेला. त्यामुळे एफ-१६ विमानांनी जॅग्वारला रोखण्यासाठी नियोजन केले. यातून मिराज लढाऊ विमानांना पाकिस्तानी हवाई क्षेत्र ओलांडता आले.
अपघातांची मालिका का संपत नाही?
जुनाट विमानांचे अपघात केवळ तांत्रिक अकार्यक्षमताच नाही, तर सरकारी धोरणातील उणिवाही समोर आणतात, याकडे काही तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. विमान जुने आहे की देखभालीची क्षमता नाही, असाही त्यांचा प्रश्न आहे. या घटना भारतीय हवाई दलाची सुसज्जता आणि सुरक्षा मानकांवर गंभीर प्रश्न उपस्थित करतात. अपघातांचे सत्र कायम राहिल्यास भविष्यात देशाला मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते, याकडेही अनेक विश्लेषक लक्ष वेधतात. सैन्यदलांच्या आधुनिकीकरणाचे धाडसी दावे होतात. मात्र प्रत्यक्षात भारतीय हवाई दलाची ताकद आणि विश्वासार्हता वाढविण्यासाठी ठोस प्रयत्न होत नसल्याची टीका होत आहे.
जुन्या विमानांची अपरिहार्यता?
चीन आणि पाकिस्तान या दोन्ही आघाड्यांवर लढण्यासाठी भारतीय हवाई दलास लढाऊ विमानांच्या ४२ तुकड्यांची (स्क्वॉड्रन) आवश्यकता आहे. सद्या:स्थितीत केवळ ३१ तुकड्या अस्तित्वात आहेत. या स्थितीत जॅग्वारसारख्या जुन्या विमानांना निवृत्त करणे हवाईदलाच्या लढाऊ क्षमतेवर परिणाम करू शकते. सध्याच्या ताफ्यात ‘सुखोई – ३० एमकेआय’, ‘मिग – २९ एम’, ‘मिराज – २०००’, राफेल, जॅग्वार आणि ‘मिग – २१ एस’ अशी सात प्रकारची लढाऊ विमाने आहेत. पुढील काळात मिग – २९, जॅग्वार आणि मिराज – २००० ही विमाने निवृत्तीच्या वाटेवर येतील. त्यांची जागा तेजसला दिली जाणार आहे. तेजस मिळण्यास विलंब झाल्यामुळे जॅग्वारसारखी जुनी विमाने तूर्त महत्त्वाची ठरतात. अशी विमाने उड्डाणतास कमी करून जास्त काळ सेवेत ठेवण्याचे काही माजी अधिकाऱ्यांनी समर्थन केले आहे.