पुण्यात काेयते उगारून दहशत माजविणे, तसेच गाड्यांची मोडतोड अशा प्रकारच्या गुन्ह्यांत वाढ झाली. अशा प्रकारच्या गुन्ह्यात सराइतांसह अल्पवयीन सामील असल्याचे वेळोवेळी उघडकीस आले. प्रसारमाध्यमांनी या दहशत माजविणाऱ्या टोळ्यांना ‘कोयता गँग’ असे नाव दिले आाणि या नावाची दहशत राज्यभरात पसरली. वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे यांनी ‘कोयता गँग’च्या दहशतीकडे अधिवेशनात लक्ष वेधले. त्यावर मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात ‘कोयता गँग’ अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट केले. माध्यमांनी हे नाव दिल्याचे त्यांनी मंगळवारी सभागृहात सांगितले. हे सांगताना पुण्यातील गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन सामील असल्याने ही बाब चिंता करण्यास लावणारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘कोयता गँग’ नाव कसे पडले?
शहरातील उपनगरात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी परिसरातील अल्पवयीन मुलांनी भररस्त्यात कोयते उगारून दहशत माजविल्याच्या घटना वाढीस लागल्या. कोयत्याच्या धाकाने खाद्यपदार्थ विक्रेते, व्यापाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार सुरू झाले. नागरिकांना धमकावून दहशत माजविण्यात आली. दोन वर्षांपूर्वी हडपसरमधील मांजरी भागातील ग्रामस्थांनी कोयता गँगच्या दहशतीमुळे थेट पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. त्या वेळी विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार यांनी अधिवेशनात कोयता गँगवर कारवाईची मागणी तेव्हा केली. याच काळात शहरातील वेगवेगळ्या भागात दहशत माजविण्याच्या घटना घडल्या. तेव्हापासून उपनगरात हप्तेवसुली करणाऱ्या, दहशत माजविणाऱ्या टोळ्या ‘कोयता गँग’ म्हणून ओळखू जाऊ लागल्या. प्रसारमाध्यमांनी या टोळ्यांना कोयता गँग असे नाव दिले.
‘रायझिंग गँग’चा उदय?
पुण्यातील संघटित गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाटी पोलिसांनी टोळ्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) आणि झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई केली. एकीकडे गुन्हेगारी टोळ्यांचे म्हाेरके, साथीदार कारागृहात असताना त्यांच्या छत्रछायेखाली वाढलेल्या उदयोन्मुखांच्या टोळ्या (रायझिंग गँग) उदयास आल्या. या टोळ्यांमध्ये सराइतांसह अल्पवयीन मुले सामील असल्याचे उघडकीस आले. त्यांना रोखण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. पोलिसांनी ‘रायझिंग गॅंग’च्या टोळ्यांची यादी तयार केली आहे. पोलीस दफ्तरी अशा प्रकारच्या २१ टोळ्या पुणे शहर परिसरात सक्रिय असल्याचे उघडकीस आले. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी व्यूहरचना तयार केली आहे. ‘मकोका’ आणि ’एमपीडीए’ कारवाई करून अशा टोळ्यांना जरब बसविण्यात आली आहे.
गुन्हेगारीचे आकर्षण नि अमली पदार्थ
उपनगरातील अनेक मुले नशेच्या आहारी गेले आहेत. दारू, गांजा, चरस अशांचे सेवन करणारी अल्पवयीन मुलेही आहेत. या मुलांचे पालक कष्टकरी आहेत. उपनगरात राहणारी काही अल्पवयीन मुले गुन्हेगारी टोळ्यांमध्ये आहेत. वर्चस्व निर्माण करण्यासाठी तरुण, अल्पवयीन मुलांकडून दहशत माजवली जात आहे. भरधाव वेगाने दुचाकी चालविणे, भररस्त्यात तलवार, कोयत्याने केक कापण्याच्या घटना उपनगरात घडतात. शहरातील संघटित गुन्हेगारीवर पोलिसांनी वचक बसवला असला तरी अल्पवयीन मुलांमधील हिंसक वृत्ती नागरिक आणि पोलिसांसाठी डोकेदुखी ठरली आहे.
पोलिसांची व्यूहरचना काय?
कोयता उगारून दहशत माजविणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या विरोधात कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. अल्पवयीन मुलांवर जरब बसविण्यासाठी पोलीस आयुक्तांनी व्यूहरचना आखली आहे. बालगुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींचा आधार घेऊन कठोर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. शहरातील सराइतांची झाडाझती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गुन्हेगारीकडे वळालेल्या मुलांचे समुपदेशन करण्यासाठी पोलिसांकडून मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेण्यात येणार आहे. समुपदेशन आणि कारवाई अशी व्यूहरचना पोलिसांनी आखली आहे. पुणे शहरात गेल्या वर्षी वेगवेगळ्या गुन्ह्यात ४०० हून जास्त अल्पवयीन मुले गंभीर गुन्ह्यात सामील असल्याचे उघडकीस आले होते.
जामीन देणे बंद
कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर बाल न्याय मंडळाकडून (जेजेबी) जामिनाचे प्रकरण चर्चेत आले होते. त्या गुन्ह्यातील अल्पवयीन मुलाला निबंध लिहिण्याच्या अटींवर बारा तासांत जामीन दिल्याने समाजमाध्यमात टीका करण्यात आली होती. त्याचा परिणाम ‘जेजेबी’च्या कामकाजावर झाला आहे. आता किरकोळ चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतल्या गेलेल्या अल्पवयीन मुलांनादेखील तात्काळ जामीन दिला जात नसून, त्यांना चार दिवस बालसुधारगृहातच मुक्कामी ठेवून त्यांचे समुपदेशन केल्यानंतर सोडले जात आहे.
वाहतूक नियमभंगात अल्पवयीन
पुणे शहरात मोठ्या संख्येने अल्पवयीन मुले वाहने चालवितात. खरे तर अशा प्रकरणात पालकच दोषी असतात. पालकच मुलांना दुचाकी, मोटार चालविण्यास देतात. गेल्या वर्षी पुणे पोलिसांनी ७३ अल्पवयीनांना पकडले होते. गेल्या दोन महिन्यांत २५ अल्पवयीनांना वाहन चालविताना ताब्यात घेण्यात आले. अल्पवयीन वाहन चालवताना पकडल्यास त्याच्याकडील वाहन एक वर्षासाठी रस्त्यावर उतरवू दिले जाणार नाही. तसेच त्याला २५ वर्षांपर्यंत परवानाही दिला जाणार नाही, अशी कारवाई वाहतूक शाखेकडून करण्यात येणार आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर मुलाला महागडी मोटार चालविण्यास देणाऱ्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
rahul.khaladkar@expressindia.com