How Many Indians Got America Visas : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या कारभाराची सूत्रे हातात घेतल्यानंतर त्यांनी तेथील बेकायदा स्थलांतरितांबाबत कठोर भूमिका घेतली. विविध देशांतून अमेरिकेत घुसलेल्यांना लष्करी विमानांमध्ये बसवून, त्यांच्या मायदेशात परत पाठवण्यात आलं. आतापर्यंत हजारो बेकायदा स्थलांतरितांना देशातून हद्दपार करण्यात आलं आहे. त्यामध्ये भारतातील ३३३ नागरिकांचाही समावेश आहे. एकीकडे ट्रम्प सरकार हद्दपारीच्या मोहिमेला गती देत आहे; तर दुसरीकडे कायदेशीररीत्या अमेरिकेचा व्हिसा मिळविणाऱ्या भारतीयांच्या संख्येतही वाढ झाली आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून किती भारतीयांना अमेरिकेचा व्हिसा मिळाला? याबाबत जाणून घेऊ…
यावर्षी किती भारतीयांना मिळाला अमेरिकेचा व्हिसा
जगभरातील अनेक देशांमधील नागरिक अमेरिकेत नोकरी किंवा व्यवसायासाठी स्थायिक होत असतात. त्यांना अमेरिकेकडून नॉन-इमिग्रंट व्हिसा (NIVs) दिला जातो. हा व्हिसा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. दी इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून अमेरिकेने मागील वर्षाच्या तुलनेत १६ हजार ६७६ अधिक भारतीयांना व्हिसा दिला आहे. २०२४ मध्ये अमेरिकेचा नॉन-इमिग्रंट व्हिसा मिळविणाऱ्या भारतीयांची संख्या एक लाख १४ हजार ४९६ इतकी होती. जानेवारी २०२५ पर्यंत ती वाढून एक लाख ३१ हजार १७२ झाली.
विशेष बाब म्हणजे अमेरिकेने परदेशी नागरिकांना दिलेल्या नॉन-इमिग्रंट व्हिसामध्ये भारतीयांचं प्रमाण १३.७२ टक्के आहे. अमेरिकन दूतावासांच्या वाणिज्य विभागाकडून हा व्हिसा दिला जातो. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होतं की, ट्रम्प सरकारनं बेकायदा स्थलांतरितांना हद्दपार करण्याची मोहीम सुरू केली असली तरी अर्थव्यवस्थेत योगदान देणाऱ्यांना विशेषत: कुशल कामगारांना कायदेशीररीत्या देशात थांबण्याची परवानगी दिली आहे.
आणखी वाचा : Adolescence Web Series : नेटफ्लिक्सवरील ‘या’ वेब सीरिजमुळे विखारी पौरुषत्वाची का होतेय चर्चा?
अमेरिकेत कुशल कामगारांची कमतरता
अमेरिका हा आर्थिकदृष्ट्या प्रगतिशील देश असला तरी तिथे कुशल कामगारांची नेहमीच कमतरता भासते. त्यामुळे येथील उद्योजक व व्यावसायिक अशा कामगारांचा शोध घेत असतात, जे कामगारवर्गातील महत्त्वाची पोकळी भरून काढू शकतील. त्याचबरोबर तंत्रज्ञान, व्यवसाय व उच्च शिक्षण यांसारख्या क्षेत्रात योगदान देऊ शकतील. तज्ज्ञांचं असं मत आहे की, अमेरिकेची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने उद्योग, व्यवसाय, देशातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. त्यामुळेच देशात सुशिक्षित आणि कुशल स्थलांतरितांना खूप महत्त्व दिलं जातं. नॉन-इमिग्रंट व्हिसाच्या आकडेवारीतून ही बाब स्पष्ट होते.
अमेरिकेचा व्हिसा मिळविणाऱ्यांची संख्या कशी वाढली?
जानेवारी २०२५ मध्ये अमेरिकेनं जारी केलेल्या व्यवसाय आणि पर्यटन (B1/B2) व्हिसाची एकूण संख्या ९१ हजार ९६ वर पोहोचली आहे. गेल्या वर्षी हा आकडा ७७ हजार ७६९ इतका होता. त्याचप्रमाणे अमेरिकेने या वर्षी परदेशांतून शिक्षण घेण्यासाठी आलेल्या एक हजार १६७ विद्यार्थ्यांना व्हिसा दिला आहे. मागच्या वर्षी अमेरिकेचा व्हिसा मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फक्त ५९० होती. अमेरिकेत काम करणाऱ्या कुशल कामगारांना दिल्या जाणाऱ्या H1B वर्क व्हिसाची संख्याही वाढली आहे. गेल्या वर्षी १५ हजार ७१० कुशल कामगारांना अमेरिकेचा व्हिसा मिळाला होता. यंदा ही संख्या १७ हजार ८७६ वर पोहोचली आहे. त्याशिवाय H1B व्हिसावर काम करणाऱ्या कुटुंबातील सदस्यांच्या व्हिसाची संख्याही १० हजार ८३३ झाली आहे. गेल्या वर्षी हा आकडा नऊ हजार ८२१ इतका होता.
कुशल कामगारांचे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत योगदान
भारतासारख्या देशांमधून आलेले स्थलांतरित कुशल कामगार अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतात, असं जालंधरमधील ‘ज्युपिटर अकादमी’चे व्यवस्थापन करणारे अमेरिकन इमिग्रेशन सल्लागार नरपत सिंग बब्बर यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं. ते म्हणाले, “भारतातील अनेक नागरिक अमेरिकेतील गूगल, मायक्रोसॉफ्ट आणि इतर तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांमध्ये काम करतात. त्यामुळे अमेरिकेतील तंत्रज्ञान आणि व्यवसाय आघाडीवर आहे. जागतिक स्तरावर अमेरिकेला ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.” दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारनं देशातील बेकायदा स्थलांतरितांना हद्दपार करण्यासाठी कठोर भूमिका घेतली असली तरी कायदेशीर व्हिसा देण्याच्या बाबतीत त्यांचा कल दिसून येत आहे. अमेरिकेची जागतिक स्पर्धात्मकता टिकवून ठेवण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत.
हेही वाचा : India Remittances : अमेरिकेतून भारतात येणारा पैसा अचानक कसा वाढला? त्यामागची कारणं काय?
अमेरिकेतील इमिग्रेशनसाठी भविष्यातील दृष्टीकोन
नरपत सिंग बब्बर यांच्या मते, “डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात अमेरिकेत कायदेशीर स्थलांतराचा मुद्दा सुरूच राहणार आहे. कदाचित ट्रम्प बेकायदा घुसखोरांना हद्दपार करण्यासाठी आणखी कठोर भूमिका घेऊ शकतात. मात्र, अर्थव्यवस्थेत योगदान देणाऱ्या कायदेशीर स्थलांतरितांवरही त्यांचं लक्ष असेल. त्यानुसार सुशिक्षित आणि कुशल कामगारांना अमेरिकेत थांबण्याची परवानगी दिली जाईल. ही तेथे स्थायिक झालेल्या भारतीयांसाठी आनंदाची बाब आहे.”
डोनाल्ड ट्रम्प यांचा पुढचा दृष्टीकोन काय?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे देशातील बेकायदा स्थलांतर रोखण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहेत. परंतु, कायदेशीर स्थलांतर हा अमेरिकेच्या आर्थिक धोरणाचा प्रमुख आधारस्तंभ आहे. कारण- भारतासारख्या देशांतून आलेले कुशल आणि सुशिक्षित कामगार अमेरिकेच्या विकासात, तसेच जागतिक स्थितीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. “बेकायदा स्थलांतरितांना हद्दपार करणे आणि कायदेशीर स्थलांतर वाढवणे हेच ट्रम्प प्रशासनाचे धोरण आहे. यामागे अमेरिकेच्या सीमांचे रक्षण करणे आणि देशाच्या सततच्या यशात योगदान देऊ शकतील अशा कुशल व्यावसायिकांना आकर्षित करणे हा उद्देश आहे,” असे बब्बर यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेचा व्हिसा कसा मिळवायचा?
अमेरिकेचा व्हिसा मिळविण्यासाठी http://www.ustraveldocs.com/in ही वेबसाईट अत्यंत उत्तम आहे. या वेबसाईटवर सर्व नियम दिलेले आहेत. अर्जदाराला अमेरिकेत नोकरीसाठी जायचे असल्यास संबंधित कंपनीचे निमंत्रण पत्र, बँक स्टेटमेंट, नोकरीची कागदपत्रे, सरकारी नोकरीत असल्यास त्यांच्या ‘ना हरकत’ पत्रासह वेबसाईटवर माहिती भरावी लागते. त्यानंतर अर्जदाराला वेबसाईटवरच मुलाखतीची तारीख आणि वेळ दिली जाते. व्हिसासाठी मुलाखतीला जाताना अर्जदाराने सर्व कागदपत्रांची फाईल तयार ठेवणे गरजेचे असते. इंटरनेटवरून ज्या अर्जांचे प्रिंटआऊट्स काढले त्यांच्या, तसेच पासपोर्टवर सांगितलेल्या कागदपत्रांच्या तीन झेरॉक्स काढून ठेवाव्यात. मुलाखत देताना जेवढे विचारले जातील, तेवढ्याच प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्यावीत. मुलाखत झाल्यावर व्हिसा मिळणार की नाही हे दूतावासाचे अधिकारी लगेचच सांगतात.