DJ Daniels Appointed as US Secret Agent : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी (५ फेब्रुवारी) अमेरिकन संसदेच्या (काँग्रेस) संयुक्त अधिवेशनाला संबोधित केलं. यावेळी राष्ट्राध्यक्षांनी एका १३ वर्षीय मुलाचं सर्वांसमोर तोंडभरून कौतुक केलं. इतकंच नाही तर त्यांनी या मुलाची अमेरिकेच्या गुप्तहेर सेवा एजंटपदी नियुक्तीदेखील केली. डीजे डॅनियल्स असं या मुलाचे नाव असून तो देशातील सर्वात तरुण गुप्तहेर एजंट झाला आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाचं अमेरिकेतील नागरिकांकडून स्वागत केलं जात आहे. दरम्यान, डीजे डॅनियल्स कोण आहे, राष्ट्राध्यक्षांनी त्याला अमेरिकेचा गुप्तहेर सेवा एजंट म्हणून का निवडलं? याबाबत जाणून घेऊ.

डीजे डॅनियल्स कोण आहे?

१३ वर्षीय डीजे डॅनियल्स हा अमेरिकेतील टेक्सास शहरातील रहिवासी आहे. त्याचे वडील एका खासगी कंपनीत काम करतात आणि आई घर सांभाळते. लहानपणापासूनच डीजेला पोलिस अधिकारी होण्याची आवड होती. त्यासाठी त्याने अभ्यासाला सुरुवातही केली. मात्र, २०१८ मध्ये त्याला दुर्मीळ कर्करोगाची लागण झाली. डीजे हा पुढील पाच महिनेही जगू शकणार नाही, असं डॉक्टरांनी त्याच्या आई-वडिलांना सांगितलं. अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन डीजेच्या वडिलांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. काहीही करा पण माझ्या मुलाला वाचवा, अशी विनवणी त्याच्या वडिलांनी डॉक्टरांना केली.

आणखी वाचा : घरात चप्पल आणि बूट घातल्यास काय होतं? विज्ञान काय सांगतं? विवेक रामास्वामी का ट्रोल होत आहेत?

सहा वर्षांपासून देतोय कर्करोगाशी लढा

वडिलांनी डीजे डॅनियल्सला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. गेल्या सहा वर्षांपासून डीजेवर उपचार सुरू असून तो कर्करोगाशी लढा देत आहे. त्याच्या हिमतीने डॉक्टरांनादेखील चकित करून सोडलं आहे. तसेच त्यांनी वर्तविलेला अंदाजही खोटा ठरवला आहे. दरम्यान, डीजेला झालेला कर्करोग हा दुर्मीळ आहे. या आजारावर जगात कुठेही उपचार नाही, असं डॉक्टरांनी डीजेच्या वडिलांना सांगितलं आहे.

अमेरिकेतील स्थानिक वृत्तपत्रानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रप यांना जेव्हा या प्रकरणाची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी डॅनियल कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधला. इतकंच नाही तर त्यांनी डीजेच्या स्वप्नाबद्दलही जाणून घेतलं. बुधवारी सकाळी (भारतीय वेळेनुसार) डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी १ तास ४४ मिनिटांचे विक्रमी भाषण दिले. आपल्या भाषणाची सुरुवात ट्रम्प यांनी ‘अमेरिका इज बॅक’ म्हणजेच अमेरिकेचे युग परत आले आहे अशा शब्दांनी केली.

ट्रम्प यांनी केलं डीजेचं कौतुक

अमेरिकन संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना ट्रम्प म्हणाले की, त्यांनी ४३ दिवसांत जे केले आहे ते अनेक सरकारे त्यांच्या चार किंवा आठ वर्षांच्या कार्यकाळात करू शकली नाहीत. अमेरिकेचे संरक्षण करण्यासाठी गोल्डन डोम मिसाईल डिफेन्स शील्डसाठी निधीची मागणी करत असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी ट्रम्प यांनी आपल्या भाषणात डीजे डॅनियल्सचा आवर्जून उल्लेख केला. राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “डीजे हा अमेरिकेतील सर्वात हिंमतवान मुलगा आहे. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर डॉक्टरांनी त्याला जगण्यासाठी जास्तीत जास्त पाच महिने दिले होते. आज सहा वर्ष झालीत, पण डीजेने जगण्याची हिंमत सोडली नाही.”

डीजेला मिळाला सर्वात मोठा सन्मान

पुढे बोलताना ट्रम्प म्हणाले, “डीजेला पोलिस अधिकारी व्हायचे आहे. त्याचे स्वप्न साकार करण्यासाठी डॅनियल कुटुंबीय प्रयत्नशील आहेत. आज रात्री आम्ही डीजेला सर्वात मोठा सन्मान देणार आहोत. मी आमच्या नवीन गुप्तचर आणि सुरक्षा एजन्सीचे प्रमुख शॉन करन यांना विनंती करतो की, त्यांनी डीजेला अधिकृतपणे अमेरिकेचा गुप्तहेर सेवा एजंट म्हणून नियुक्त करावं.” विशेष बाब म्हणजे, जेव्हा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे डीजेचे कौतुक करीत होते, तेव्हा डॅनियल कुटुंबीयदेखील आजारी मुलासह संयुक्त अधिवेशनात हजर होते.

हेही वाचा : Egg Shortage 2025 : रेंट-द-चिकन म्हणजे काय? अमेरिकेत अंड्यांचा तुटवडा का निर्माण झाला?

राष्ट्राध्यक्षांच्या घोषणेनंतर टाळ्यांचा कडकडाट

ट्रम्प यांनी डीजेच्या नावाची गुप्तहेर एजंट म्हणून घोषणा करताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी डीजेच्या वडिलांनी त्याला खांद्यावर उचलून घेतलं. सर्वांनीच त्याला कौतुकाची थाप देऊन शुभेच्छाही दिल्या. राष्ट्राध्यक्षांसमोर अधिकाऱ्यांनी डीजेला व्यासपीठावर बोलावून घेतलं. त्याला अमेरिकेच्या गुप्तचर आणि सुरक्षा एजन्सीचे प्रमुख शॉन करन यांनी अधिकृत बॅच दिला. डीजेच्या सन्मानासाठी डेमोक्रेटिक रिपब्लिकन पार्टीचे अनेक नेते आणि पाहुणे मंडळी सभागृहात उभे राहिले. लवकरच डीजेला गुप्तचर एजंट म्हणून शपथ दिली जाणार आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी घेतलेल्या या निर्णयाचं अमेरिकेसह युरोपियन देश कौतुक करीत आहेत.

मेलानियांनी केलं होतं खास पाहुण्यांना आमंत्रित

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी आणि अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया यांनी या कार्यक्रमासाठी खास पाहुण्यांना निमंत्रित केलं होतं. यामध्ये अग्निशमन दलात कार्यरत असलेल्या जवानांचे कुटुंब आणि रशियन सरकारने ओलिस ठेवलेल्या अमेरिकन शिक्षकांचा समावेश होता. याशिवाय बेकायदा स्थलांतरितांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तरुण नर्सिंग विद्यार्थिनीचे कुटुंबही ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान काँग्रेसमध्ये उपस्थित होते. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये वादावादी झाली होती. यानंतर झेलेन्स्की यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना एक पत्र लिहिलं. या पत्राचंही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कौतुक केलं. ते म्हणाले की, मला झेलेन्स्कीचे पत्र खूप आवडलं.

Story img Loader