How to hair wash in space : भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे अनेक महिन्यांपासून अंतराळात अडकून पडले आहेत. त्यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी वेगाने प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी स्थानिक माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्राध्यक्षांनी सुनीता विल्यम्स यांच्या केसांची प्रशंसा केली. अंतराळातील महिलेचे केस अतिशय सुंदर आणि घनदाट आहेत, असं ट्रम्प म्हणाले. दरम्यान, अंतराळवीर आपल्या केसांना कसे सुरक्षित ठेवतात, अंतराळात केस कापता येतात का, असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. त्याबाबत जाणून घेऊ.
सुनीता विल्यम्स अंतराळात कशा अडकल्या?
जून २०२४ मध्ये सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे दोन्ही अंतराळवीर बोइंगच्या स्टारलायनर यानातून अंतराळात गेले होते. आठ दिवसांच्या अभ्यासानंतर ते अंतराळातून पृथ्वीवर परत येणार होते. मात्र, अचानक यानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते आजवर पृथ्वीवर परत येऊ शकले नाहीत. सध्या अमेरिकन अंतराळात संशोधन संस्था ‘नासा’कडून दोन्ही अंतराळवीरांना पृथ्वीवर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, अवकाशात अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना तुम्ही काय संदेश देणार, असा प्रश्न माध्यमांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना विचारला.
सुनीता विल्यम्स अंतराळातून कधी परतणार?
या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले, “आम्ही तुम्हाला (विल्यम्स आणि विल्मोर) घ्यायला येतोय… मुळात तुम्ही तिथे इतका वेळ राहणंच अपेक्षित नव्हतं. परंतु, त्यांनी (जो बायडेन) तसं होऊ दिलं; पण हा अध्यक्ष तसं करणार नाही. सुनीता आणि विल्मोर यांना परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असून, हे प्रयत्न शेवटच्या टप्प्यात आहेत.” याबाबत पुढे बोलताना ट्रम्प म्हणाले, “आमच्याकडे दोन अंतराळवीर आहेत, जे तिथं अडकून पडले आहेत. त्यामुळे मी एलॉन मस्क यांना म्हटलं की, माझं एक काम करू शकता, त्यांना (अंतराळवीरांना) तिथून पृथ्वीवर परत आणू शकता? यावर त्यांनी मला, हो, असं उत्तर दिलं. आता ते त्याचीच तयारी करीत आहेत.”
आणखी वाचा : Vanuatu Citizenship : ललित मोदींनी वानुअतूचं नागरिकत्व का घेतलं? भारतीय पासपोर्ट परत करण्याचं कारण काय?
ट्रम्पकडून सुनीला विल्यम्स यांचं कौतुक
सुनीता विल्यम्स यांच्या केसांची प्रशंसा करण्यापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष स्वत:ला रोखू शकले नाहीत. ते म्हणाले, “मी त्या महिलेला पाहत आहे. तिचे केस खूप छान आणि दाट आहेत. ही थट्टा नाही. तिच्या केसांबाबत काही गंमत नाही.” दरम्यान, ट्रम्प यांनी दोन्ही अंतराळवीरांविषयी बोलताना अजब वक्तव्य केलं. “मला आशा आहे की, दोन्ही अंतराळवीर एकमेकांना आवडत असतील. कदाचित ते एकमेकांवर प्रेमही करतील. परंतु, त्यांना तिथं सोडून देण्यात आलं आहे. आपण दोघांचाही विचार करायला हवा. अंतराळात खूप धोका आहे. तिथे काहीही होऊ शकतं. त्यांना बाहेर काढावंच लागेल”, असं ट्रम्प म्हणाले.
अंतराळात केसांची कशी काळजी घेतली जाते?
अंतराळात केसांची काळजी घेणं पृथ्वीपेक्षा वेगळं आहे. तिथे गुरुत्वाकर्षण नसल्यानं केस सहसा हवेतच तरंगतात. २०१३ मध्ये अमेरिकन अंतराळवीर कॅरेन नायबर्ग या अंतराळात गेल्या होत्या. त्यांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) वर १६६ दिवस फ्लाइट इंजिनीयर म्हणून काम केले आणि एकूण १८० दिवस अंतराळात व्यतीत केले. पृथ्वीवर परतल्यानंतर कॅरेन यांनी अंतराळात केसांची कशी काळजी घेतली जाते, याबाबत माहिती दिली होती. “गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे अंतराळवीर सामान्यपणे आपले केस धुऊ शकत नाहीत. अंतराळात पाणी कमी असल्याने ते खूपच जपून वापरावे लागते. साधारणपणे एकदा केस धुण्यासाठी अंतराळावीर सुमारे आठ औंस (०.२ किलो) पाणी वापरतात, असं कॅरेन नायबर्ग यांनी सांगितलं होतं.
अंतराळात केस कसे धुतले जातात?
अंतराळवीरांना केस धुण्यासाठी शॉवर्सचा वापर करता येत नाही. त्याऐवजी त्यांना प्लास्टिकच्या पिशव्या दिल्या जातात, ज्यात स्ट्रॉसारख्या नोजल्स असतात. या नोजल्सचा वापर करून, ते पाणी घेतात आणि केस स्वच्छ करतात. कंगवा किंवा हातानं केसांना पाणी लावल्यानंतर अंतराळवीर टॉवेलद्वारे केस कोरडे करतात. अंतराळात कपडे धुण्याची सोय नसते, ज्यामुळे केस किंवा अंग साफ केल्यानंतर खराब झालेले टॉवेल्स अंतराळवीर कचऱ्यात टाकतात. अंतराळात पृथ्वीसारखी गुरुत्वाकर्षण शक्ती नसल्यानं केस धुण्यासाठी वापरलेलं पाणी आणि साबनाचे थेंब हवेतच तरंगतात. त्यामुळे अंतराळवीरांना त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. हवेत तरंगलेलं पाणी अंतराळवीर पुन्हा गोळा करतात आणि ते फिल्टर करून पिण्यासाठी वापरतात.
हेही वाचा : पीएचडीधारक विद्यार्थ्याचा ६० महिलांवर बलात्कार, व्हिडीओही काढले; घटनेला वाचा कशी फुटली?
अंतराळात केस कापता येतात का?
नासाच्या प्रवक्त्या लोरा ब्लीचर यांनी रॉयटर्सला सांगितलं की, अंतराळात केसही कापता येतात. मात्र, त्यासाठी काही विशिष्ट उपकरणांची आवश्यकता असते. कारण- अंतराळात शून्य गुरुत्वाकर्षणामुळे कोणतीही वस्तू साधारणपणे हवेतच तरंगते. त्यामुळे केस कापण्यासाठी इलेक्ट्रिक क्लिपर्स आणि व्हॅक्युम अटॅचमेंट यांसारख्या संसाधनांचा वापर केला जातो. इलेक्ट्रिक क्लिपर्स केसांना घट्ट पकडून ठेवतात आणि व्हॅक्युम अटॅचमेंट हे कापलेल्या केसांना आतमध्ये शोषून घेतात. तसे न केल्यास कापलेले केस हवेतच फिरू शकतात, ज्यामुळे स्वच्छतेसह आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात, व्हॅक्युमपासून सुटलेले केस हवा परिसंचरण प्रणालीतील अभिसरण प्रणालीतील व्हेंट पोर्टजवळ जमा होतात. अंतराळवीर त्यांच्या देखभाल कर्तव्यांचा भाग म्हणून हे व्हेंट्स नियमितपणे स्वच्छ करतात. ब्लीचरच्या मते, जेव्हा दाढी करण्याचा प्रश्न येतो तेव्हा अंतराळवीर हे पृथ्वीवरील लोकांप्रमाणेच रेझर आणि क्रीमचा वापर करतात.