अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे २०२०मधील अध्यक्षीय निवडणूक हरल्यानंतरही रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या संपर्कात होते. त्यांनी कोविड काळात पुतिन यांच्याकडे ‘टेस्टिंग किट’ही पाठवले होते, अशी नवी माहिती एका पुस्तकरूपाने उजेडात आली आहे. विख्यात पत्रकार बॉब वुडवर्ड यांनी याविषयी त्यांच्या ‘वॉर’ या नवीन पुस्तकात दावे केले आहेत. अमेरिकेचा शत्रू क्रमांक एक असलेल्या पुतिन यांच्याशी अमेरिकेचे माजी अध्यक्ष सातत्याने संपर्कात राहूच कसे शकतात, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. युक्रेनला मदत पाठवण्याच्या प्रस्तावांची ट्रम्प यांनी नेहमीच खिल्ली उडवली होती आणि रिपब्लिकन सदस्यांनी अमेरिकी प्रतिनिधिगृहात मदत प्रस्ताव वारंवार रोखून धरले होते. या घडामोडींची आणि ट्रम्प यांच्या कथित पुतिनमैत्रीची संगती आता लावली जात आहे.
ट्रम्प सतत पुतिन यांच्या संपर्कात?
नोव्हेंबर २०२०मध्ये झालेली अध्यक्षीय निवडणूक ट्रम्प जो बायडेन यांच्यासमोर हरले. त्यानंतर जानेवारी २०२१मध्ये ते व्हाईट हाउस सोडून निघून गेले. त्यानंतरच्या काळात ट्रम्प यांनी तब्बल सात वेळा पुतिन यांच्याशी संपर्क साधल्याचा दावा पत्रकार बॉब वुडवर्ड यांनी ट्रम्प यांच्या काही सहायकांच्या हवाल्याने केला आहे. यासंबंधी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली, पण यास अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. पुतिन यांनी २०१६मधील अध्यक्षीय निवडणुकीत ढवळाढवळ केल्याचे पुरावे स्पष्ट असताना आणि युक्रेनवरील आक्रमणाच्या तसेच नाटो विस्ताराच्या मुद्द्यावरून अमेरिकेचे रशियाशी गंभीर मतभेद असताना, ट्रम्प मात्र सतत पुतिन यांच्या संपर्कात होते, या दाव्यामुळे रिपब्लिकन पक्ष अडचणीत येऊ शकतो.
ट्रम्प-पुतिन संपर्कात आक्षेपार्ह काय?
२०१६मधीय अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक ट्रम्प जिंकले. त्यांनी डेमोक्रॅटिक उमेदवार आणि माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला. त्या निवडणुकीत रशियन गुप्तचरांनी सायबर हल्तक्षेप केल्याचा आरोप अमेरिकी तपासयंत्रणांनी केला होता आणि तसे पुरावेही सादर केले. त्यावेळी पुतिन यांनी ट्रम्प यांची ‘साथ’ केल्याचा दावा काही विश्लेषकांनी केला होता आणि तसा ते आजही करतात. अध्यक्षपद संपुष्टात आल्यानंतर त्यांनी इतर देशाच्या कोणत्याही प्रमुखाशी बोलण्यापूर्वी व्हाईट हाउस किंवा परराष्ट्र विभागाला तशी कल्पना देण्याचा संकेत आहे. सध्याच्या बायडेन प्रशासनासाठी पुतिन हे शत्रू क्रमांक १ ठरतात. रशियाविरुद्ध लढणाऱ्या युक्रेनसाठी बायडेन प्रशासनाने आतापर्यंत अब्जावधी डॉलरची आर्थिक आणि लष्करी मदत पाठवलेली आहे.
पुतिन… शत्रू नव्हे, मित्र?
युक्रेनला मदत करणे किंवा नाटो देशांना मदत करणे ट्रम्प यांना कधीही पसंत नव्हते. युक्रेनच्या रक्षणाची जबाबदारी अमेरिकेची नाही ही त्यांची पहिल्यापासूनची भूमिका आहे. आपण अध्यक्षपदी असतो, तर पुतिन यांनी युक्रेनवर हल्लाच केला नसता असे ट्रम्प सांगत असतात. युक्रेन हल्ल्यानंतर त्यांनी पुतिन यांचे वर्णन ‘जिनियस’ असे केले होते. गेल्याच आठवड्यात ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवर, ‘मी निवडून आल्यावर २४ तासांमध्ये युक्रेन युद्धात शांतता प्रस्थापित करेन. कारण पुतिन यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत’, असा दावा केला. यासाठी आपण शपथविधीपर्यंतही वाट पाहणार नाही, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. यंदा प्रचारसभांमध्ये त्यांनी पुतिन यांचा ४१ वेळा एकेरी उल्लेख केला. त्यांना युक्रेनविषयी अजिबात ममत्व नाही हेही यानिमित्ताने स्पष्ट झाले.
हेही वाचा : विश्लेषण: शेतमालाची नासाडी केव्हा थांबणार?
ट्रम्प यांना युक्रेनचे वावडे…
पत्रकार वुडवर्ड यांच्या पुस्तकामुळे ट्रम्प-पुतिन मैत्रीवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्याचबरोबर, ट्रम्प खरोखरच निवडून आले, तर युक्रेनचे काय होणार ही शंका शांतताप्रिय देश, विश्लेषकांना सतावू लागली आहे. ट्रम्प युक्रेनची मदत बंद करू शकतात, त्या देशाच्या नाटो प्रवेशाचे मार्गही रोखून धरू शकतात. सर्वांत गंभीर बाब म्हणजे, रशियाच्या ताब्यात असलेल्या युक्रेनच्या भूभागाला रशियाचा भाग म्हणून जाहीरही करू शकतात.