अमेरिकेच्या अध्यक्षपदावर दुसऱ्यांदा विराजमान झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी एकामागोमाग एक एग्झेक्युटिव्ह ऑर्डर काढून अमेरिकी प्रशासनाची पाळेमुळेच खिळखिळी करून टाकली आहेत. अमेरिकेत सध्या सेनेट आणि प्रतिनिधिगृह या कायदेमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये रिपब्लिकनांचे बहुमत असल्याचा फायदाही ट्रम्प यांना होतो आहे. मात्र त्यांच्या जवळपास प्रत्येक आदेशाला – नोकरकपात, निधीकपात, स्थलांतरितांची हकालपट्टी, जन्मसिद्ध नागरिकत्व इ. – अमेरिकेतील विविध न्यायालयांनी आव्हान दिले आहे. अमेरिकेच्या सरन्यायाधीशांनीही एकदा ट्रम्प यांना सुनावले होते. अमेरिकेत जादा अधिकार कोणाला आहेत? अध्यक्षांना की न्यायपालिकेला, आणि ट्रम्प यांचे आदेश तेथील न्यायालये कुठवर व कितपत रोखू शकतात किंवा रद्द करू शकतात याचा आढावा…
न्यायालयांविरोधात आघाडी?
अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ट्रम्प यांनी त्यांना न्यायालयांविषयी वाटणाऱ्या तिटकाऱ्याचा वारंवार उल्लेख केला होता. गेले वर्षभर त्यांच्या मागे चार प्रमुख न्यायालयीन खटल्यांचा ससेमिरा लागला होता. आपण (पहिल्या) अध्यक्षीय कार्यकाळात केलेल्या कृतींबद्दल दोषी ठरवण्याचा अधिकार न्यायालयांना नाही. कारण अध्यक्ष या नात्याने घेतलेल्या निर्णयांबद्दल कायद्यापासून संरक्षण असते असे ते सांगत. आता खरोखर दुसऱ्यांदा अध्यक्ष बनल्यानंतर त्यांच्या बेबंदशाहीला पायपोस राहिलेला नाही. त्यांचे सहकारीदेखील न्यायलयांची पत्रास बाळगेनासे झाले आहेत. व्हेनेझुएलाच्या स्थलांतरितांना एल साल्वाडोर येथे पाठवण्याच्या निर्णयाला एक न्यायाधीश जेम्स बोसबर्ग यांनी स्थगिती दिली. तरीदेखील स्थलांतरितांच्या पाठवणीची जबाबदारी असलेले थॉमस होमन यांनी त्याकडे दुर्लक्ष करून स्थलांतरितांना एल साल्वाडोर येथे धाडले. ट्रम्प यांनी तर न्यायाधीश बोसबर्ग यांना ‘वेडसर डावा’ असे संबोधले. त्यांच्या विरोधात महाभियोग चालवावा असेही ट्रम्प म्हणाले. उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी ‘कार्यपालिकेच्या अधिकारांचे नियंत्रण न्यायाधीशांकडे असू शकत नाही’ असे म्हटले. उद्योगपती इलॉन मस्कनेही न्यायाधीशांच्या महाभियोगाची मागणी सातत्याने केली. प्रतिनिधिगृहामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांनी बोसबर्ग आणि इतर चार न्यायाधीशांविरोधात महाभियोग आणण्याचा प्रस्ताव दाखल केला.
सरन्यायाधीशांकडून दखल
महाभियोगाविषयीच्या वाढत्या मागण्यांची दखल अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी घेतली. अशा वादांची परिणती महाभियोगामध्ये होऊ नये अशी परंपरा गेली दोनशे वर्षे या देशात आहे. त्यासाठी अपिलाचा मार्ग असतो, अशा शब्दांत त्यांनी जाहीरपणे ट्रम्प यांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली.
घटनात्मक पेचप्रसंग
ट्रम्प ज्या प्रकारे दिवसाकाठी अध्यादेश जारी करत आहेत, ज्यांतील बहुेकांना न्यायालयांची स्थगिती मिळत आहे. तरीही ट्रम्प आणि त्यांचे सहकारी प्रसंगी या आदेशांकडे दुर्लक्ष दाखवण्याचे धाडस दाखवत आहेत. अमेरिकेतील कायदा विश्लेषकांच्या मते हा गेल्या कित्येक दशकांतील घटनात्मक पेचप्रसंगच आहे. काहींच्या मते यास गेल्या वर्षी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल कारणीभूत आहे. या निकालाअंतर्गत, अमेरिकेच्या अध्यक्षांना फौजदारी खटल्यांपासून अभय हे घटनादत्त असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळी म्हटले. अमेरिकेच्या घटनेमध्ये अभिप्रेत असलेले अध्यक्षांचे म्हणजे कार्यपालिकेचे अधिकार तपासून त्यावर निर्णय करण्याचा न्यायपालिकेचा अधिकार मर्यादित असल्याचा निर्वाळा त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने ६-३ अशा बहुमताने दिला होता. ट्रम्प यांनी मात्र विशेषतः त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात या निर्णयाचा अर्थ अध्यक्षांस अमर्याद अधिकार असाच काढलेला दिसतो. ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात न्यायालयांनी त्यांचे अनेक आदेश रद्दबातल ठरवले होते. याविषयीच्या २४६ खटल्यांपैकी ५४ खटल्यांमध्ये ट्रम्प प्रशासनाच्या बाजूने निकाल लागला. पण १९२ खटल्यांमध्ये विरोधी निकाल लागल्यामुळे संबंधित निर्णय ट्रम्प यांना मागे घ्यावे लागले. मात्र ‘ते’ ट्रम्प आणि ‘हे’ ट्रम्प यांत फरक आहे. गेल्या वर्षीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने ट्रम्प अधिक निर्ढावले असावेत, असा विश्लेषकांचा सूर आहे.
किती आदेशांना स्थगिती?
जवळपास डझनभर आदेशांना न्यायालयांत आव्हान देण्यात आले आहे. यात जन्मसिद्ध नागरिकत्वावर बंदी, सरकारी कर्मचारी कपात, प्रशासकीय कार्यक्षमता विभागाची (डोजे) निर्मिती, सरकारी कार्यालयांत वर्ण-लिंग-वंश समभाव धोरण अंमलबजावणी थांबवणे, पारलिंगी व्यक्तींना सैन्यदलांत जाण्यापासून रोखणे, राजाश्रयाला स्थगिती, परदेशी निधीला स्थगिती, शिक्षण विभाग विसर्जित करणे, व्हॉइस ऑफ अमेरिका नभोवाणी सेवा बंद करणे अशा अत्यंत मूलगामी निर्णयांचा समावेश आहे.
न्यायाधीशांना धमक्या
केवळ महाभियोगाच्या माध्यमातून नव्हे, तर इतरही प्रकारे न्यायाधीशांना धमकावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश एमी कोनी बॅरेट यांच्या बहिणीला धमक्या देण्यात आल्या. न्यायाधीश आणि त्यांच्या नातेवाईकांकडे पिझ्झा वितरण करून त्यांच्या निवासस्थानाविषयी नेमकी माहिती पंचक्रोशीत आहे, हे दाखवून देण्याचे प्रकार घडलेत. जन्मसिद्ध नागरिकत्वाविषयीचा आदेश रोखणाऱ्या न्यायाधीशांच्या घरी कोणत्याही कारणाविना पोलीस धाडण्यात आले.
ट्रम्प अधिक शक्तिमान?
कायदेमंडळ, न्यायालये आणि प्रशासन किंवा सरकार यांनी परस्परांच्या अधिकारांचा आदर करावा आणि स्वतःच्या मर्यादांचे पालन करावे हे तत्त्व वर्षानुवर्षे पाळले गेलेल्या अमेरिकेला सशक्त आणि परिपक्व लोकशाही मानले जाते. पण अध्यक्षांना ‘हात न लावण्या’च्या न्यायालयीन पथ्याचा भलताच अर्थ ट्रम्प यांनी घेतलेला दिसतो. अमेरिकी कायदेमंडळाच्या दोन्ही सभागृहांत रिपब्लिकनांचे बहुमत आहे. याशिवाय अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातही रिपब्लिकन विचारधारेच्या न्यायाधीशांचे प्राबल्य आहे. त्यामुळे एका मर्यादेपलीकडे न्यायालये ट्रम्प यांच्या बेबंदशाहीला रोखू शकणार नाहीत असेच सध्याचे चित्र आहे.
© The Indian Express (P) Ltd