अमोल परांजपे
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२०मधील अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल फिरविण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले. जानेवारी २०२१मध्ये ‘कॅपिटॉल हिल’बाहेर झालेली दंगल हा या प्रयत्नांचा एक भाग होता. या प्रकरणाची आणखी एक बाजू आता उजेडात आली आहे. सहा राज्यांमध्ये बनावट ‘इलेक्टर्स’ तयार करून तेथे आपला विजय झाला, असे भासविण्याचा प्रयत्न केल्याचा नवा आरोप ट्रम्प यांच्यावर करण्यात आला आहे. यामुळे अध्यक्षपदी राहण्यासाठी केवळ हुल्लडबाजीच नव्हे, तर बनवाबनवीचा प्रकारही झाल्याचे समोर येत आहे.
ट्रम्प यांच्यावर नव्याने झालेले आरोप कोणते?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बुधवारी आणखी चार गुन्हेगारी आरोप निश्चित झाले आहेत. हे सर्व आरोप २०२०च्या निवडणुकीचा निकाल बदलण्यासाठी आखण्यात आलेल्या व्यापक कटाबाबत आहेत. अर्थातच, आपल्या समर्थकांना चिथावणी देऊन अमेरिकेचे प्रतिनिधीगृह असलेल्या ‘द कॅपिटॉल’बाहेर हिंसक निदर्शने घडवून बायडेन यांच्या निवडीस मंजुरी मिळूच नये, असा प्रयत्न केला गेला. त्याचबरोबर नकली ‘इलेक्टर्स’ तयार करून त्यांची मते ट्रम्प यांना मिळाल्याचे दाखविण्यात आले. ‘स्विंग स्टेट’ (दोन्ही पक्षांच्या बाजुने झुकण्याची शक्यता असलेली राज्ये) असलेल्या ॲरिझोना, जॉर्जिया, मिशिगन, न्यू मॅक्सिको, नवादा, पेनसिल्वेनिया आणि विस्कॉन्सिन या राज्यांमध्ये असे नकली मतदार तयार केले गेले.
ट्रम्प गोत्यात, ट्रम्प झोकात..
बनावट ‘इलेक्टर्स’ तयार करण्याचे कारण काय?
अमेरिकेच्या निवडणूक यंत्रणेमध्ये अध्यक्षाच्या निवडीवर दोन पातळ्यांवर शिक्कामोर्तब केले जाते. ‘पॉप्युलर व्होट्स’ म्हणजे सर्वसामान्य मतदारांनी दिलेली मते आणि ‘इलेक्टोरेट व्होट्स’ म्हणजे प्रत्येक राज्यातून निवडून आलेल्या प्रतिनिधींनी दिलेली मते. राज्याच्या लोकसंख्येनुसार तेथील ‘इलेक्टोरेट व्होट्स’ कमी-अधिक असतात. अमेरिकेतील बहुतांश राज्ये ही पारंपारिकरित्या रिपब्लिकन किंवा डेमोक्रॅटिक पक्षासोबत असतात. त्यामुळे निवडणुकीचा निकाल हा ‘स्विंग स्टेट’ची मते कोणाला मिळतात, यावर अवलंबून असतो. त्यामुळेच ही राज्ये आपल्या बाजुने आहेत, असे भासविण्यासाठी ट्रम्प आणि त्यांच्या चमूने हा उपद्व्याप केल्याचा आरोप झाला आहे.
निकाल फिरविण्याची योजना कशी आखली गेली?
नव्या आरोपपत्रानुसार सर्वप्रथम विस्कॉन्सिन या राज्यात ॲटर्नी केनिथ चेसब्रो या ट्रम्प यांच्या वकिलांनी एक निवेदन तयार केले. या निवेदनात चेसब्रो यांनी ट्रम्प यांच्या नावाची प्रमाणपत्रे देण्यास सांगितले. निवडणुकीला आव्हान देणाऱ्या खटल्यात विजय मिळाला, कालांतराने आणखी राज्यांमध्येदेखील हाच प्रकार केला गेल्याचा ठपका आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे. अशा पद्धतीने सहा राज्यांमध्ये बनावट इलेक्टर्सचा समूह तयार केला गेला. त्यानंतर न्यू मॅक्सिको राज्यातही हाच प्रकार करण्यात आला. विशेष म्हणजे या राज्यात बनावट मते जमविल्यानंतर खटला दाखल करून निकाल न्यायप्रविष्ट करण्यात आला. ही सर्व ‘स्विंग स्टेट्स’ असून तेथे ट्रम्प यांच्यावतीने निवडणूक निकालास आव्हान देणाऱ्या याचिका दाखल झाल्या होत्या.
डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीचा निकाल बदलण्यासाठी कट रचला? जाणून घ्या नव्या आरोपात नेमकं काय?
कटामध्ये कोणकोण सहभागी होते?
आरोपपत्रामध्ये सहआरोपींची नावे स्पष्ट करण्यात आली नसली तरी त्यांनी त्यांच्या सहभागाचे वर्णन करण्यात आले आहे. त्यावरून हे कटवाले कोण असावेत, याचे अंदाज तज्ज्ञांनी बांधले आहेत. ॲटर्नी केनिथ चेसब्रो यांच्यासह ट्रम्प यांचे वकील रुडी गुलियानी, चार्ल्स बर्नहॅम, सिडनी पॉवेल, विधिखात्यातील माजी अधिकारी जेफरी क्लार्क यांच्या समावेशाची शक्यता आहे. सहावा आरोपी हा एक राजकीय सल्लागार असल्याचे यात म्हटले आहे. या ‘इलेक्टोरेट व्होट्स’चा वापर केवळ खटल्यात यश आले तरच केला जाईल, असे सांगितले गेले होते. मात्र त्यानंतर उपाध्यक्ष माईक पेन्स आणि काँग्रेसवर दबाव टाकण्यासाठीही केला गेल्याचे उघड झाले आहे.
बनावट मते वापरण्याचा प्रयत्न कसा झाला?
६ जानेवारीला ट्रम्प समर्थक ‘कॅपिटॉल’वर धडकण्यापूर्वी ही बनावट मते वापरून तत्कालिन उपाध्यक्ष माईक पेन्स यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला. ही मते दाखवून बायडेन यांच्या निवडीला काँग्रेसची मान्यता मिळविणे टाळावे, असा सल्ला ट्रम्प समर्थकांनी आपल्या उपाध्यक्षांना दिला होता. एका वकिलाने तर ही मते प्रतिनिधीगृहाच्या तोंडावर फेरावीत आणि ट्रम्प विजयी झाले आहेत, असे जाहीर करावे असा सल्लाच पेन्स यांना देऊन टाकला. ही बनवाबनवी करण्यास नकार दिल्यानंतर ट्रम्प यांनी पेन्स यांचा उल्लेख ‘अतिप्रामाणिक’ असा केल्याचे नव्याने दाखल आरोपपत्रात म्हटले आहे.
amol.paranjpe@expressindia.com