Donald Trump Rally Firing : सलग तिसऱ्यांदा रिपब्लिकन पक्षाकडून अध्यक्षीय निवडणुकीत उमेदवारीची केवळ औपचारिकता बाकी असताना अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न झाला. शनिवारी पेनसिल्व्हेनिया येथील सभेदरम्यान झालेल्या या घटनेचा केवळ अमेरिकाच नव्हे, तर जगभरातून निषेध होत आहे. या घटनेमागे कोण असेल? याचा ट्रम्प यांच्या उमेदवारीवर आणि निवडणुकीवर परिणाम होईल का?
सभेमध्ये नेमके काय घडले?
शनिवारी पेनसिल्व्हेनिया राज्यातील बटलर येथे ट्रम्प यांच्या ‘फार्म शो’चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमस्थळाच्या बाहेर उंच ठिकाणी लपून बसलेल्या हल्लेखोराने ट्रम्प यांच्यावर गोळीबार केला. गोळीबाराच्या अनेक फैरी झाडल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ट्रम्प यांच्या उजव्या कानाला गोळी चाटून गेली. हल्लेखोराचा नेम चुकला नसता, तर थेट त्यांच्या डोक्यात गोळी लागण्याचा धोका होता. गोळीबाराच्या घटनेनंतर सभेमध्ये गोंधळ माजला आणि ट्रम्प यांच्या सुरक्षा रक्षकांनी (सिक्रेट सर्व्हिस) त्यांच्याभोवती कडे केले व त्यांना सुरक्षितरित्या वाहनाकडे नेले. ट्रम्प यांच्या कानातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. ट्रम्प यांच्या प्रचारविभागाने त्यांच्या जिवाला धोका नसल्याचे स्पष्ट केले असून त्याला एफबीआयनेही दुजोरा दिला आहे. सभेला उपस्थित असलेल्या एकाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी आहेत. गोळीबारानंतर सिक्रेट सर्व्हिसच्या सैनिकांनी घटनास्थळीच हल्लेखोराला गोळ्या घालून ठार केले.
हेही वाचा…अमेरिकी पोलिसांचा हलगर्जीपणा: बंदूकधारी असल्याचे सांगूनही दुर्लक्ष; प्रत्यक्षदर्शीचा आरोप
ट्रम्प यांच्यावरील हल्लेखोर कोण?
एफबीआयला हल्लेखोराची ओळख पटली असून थॉमस मॅथ्यू क्रूक्स (२०) असे त्याचे नाव आहे. तो पेनसिल्व्हेनियाच्या बेथेल पार्क येथील राहणारा असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याने हा हल्ला का केला, त्याच्याबरोबर आणखी कुणी होते की तो एकटाच होता याचा तपास सुरू आहे. हल्लेखोर हा रिपब्लिकन पक्षाचाच नोंदणीकृत सदस्य असल्याचे वृत्त ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने दिले आहे. पेनसिल्व्हेनियाच्या मतदार नोंदींनुसार याला दुजोरा मिळत असला, तरी अद्याप तपास यंत्रणा किंवा रिपब्लिकन पक्षाकडून तसे जाहीर करण्यात आलेले नाही. थॉमस क्रूक्स हा अमलीपदार्थांच्या आहारी गेला असावा, अशी शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
अमेरिका, जगभरातून प्रतिक्रिया…
अमेरिकेचे अध्यक्ष आणि ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी जो बायडेन यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. अमेरिकेच्या राजकारणात हिंसाचाराला थारा नसल्याचे त्यांनी म्हटले. त्यांनी दूरध्वनीद्वारे ट्रम्प यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली. याखेरीज पंतप्रधान नरेंद्र मोदी, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल माक्राँ, इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिज यांच्यासह जगभरातील अनेक नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. असे असले तरी रिपब्लिकन पक्षाच्या काही नेत्यांनी मात्र हल्ल्याला राष्ट्राध्यक्ष जबाबदार असल्याचा आरोप करून टाकला आहे. लोकशाहीला धोका असल्याचे सातत्याने लोकांच्या मनावर बिंबवून बायडेन यांनी वातावरण कलुषित केल्याचे या ट्रम्प समर्थकांचे म्हणणे आहे. विशेषत: ८ जुलै रोजी देणगीदारांच्या एका कार्यक्रमातील बायडेन यांचे विधान अधोरेखित केले जात आहे. “ट्रम्प यांना ‘बुल्सआय’मध्ये ठेवण्याची वेळ आली आहे,” असे बायडेन कथितरित्या म्हणाले होते. (बुल्सआय म्हणजे नेमबाजीमध्ये लक्ष्याच्या वर्तुळात केंद्रस्थानी असलेला, सर्वाधिक गुण मिळवून देणारा बिंदू.)
हेही वाचा…डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अवघ्या २० वर्षीय तरुणाकडून गोळीबार, FBI ने पटवली ओळख!…
निवडणुकीवर काय परिणाम होईल?
सोमवारी रिपब्लिकन पक्षाचे अधिवेशन होणार असून त्यात ट्रम्प यांच्या उमेदवारीवर अधिकृत शिक्कामोर्तब होणे अपेक्षित आहे. या हल्ल्यानंतरही अधिवेशनाच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला नसल्याचे आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जिवाचा धोका टळला असला तरी अधिवेशनात ट्रम्प स्वत: उपस्थित राहणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अर्थात, तेथे केवळ उमेदवारीची औपचारिकता बाकी असली, तरी या घटनेचा खरा परिणाम प्रत्यक्ष निवडणुकीत दिसू शकतो. एकीकडे डेमोक्रेटिक पक्षात बायडेन यांच्याच उमेदवारीवरून संभ्रमाची स्थिती आहे. त्यांचे वय आणि प्रकृतीबाबत अनेक स्वपक्षियांनाच शंका असताना ताज्या सर्वेक्षणांमध्ये ट्रम्प यांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. हत्येच्या प्रयत्नानंतर ट्रम्प यांना ‘सहानुभूती मते’ (सिम्पथी व्होट्स) मिळण्याची शक्यता बळावल्याचे मानले जात आहे. या निवडणुकीतील ध्रुवीकरणामध्ये गोळीबाराच्या घटनेने मोठी भर पडणार असून याचा पुरेपूर वापर प्रचारात केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोळीबारातून ट्रम्प यांच्यावर झाला असला, तरी ‘इजा’ बायडेन यांच्या प्रचारयंत्रणेला होण्याचा संभव आहे.
amol.paranjpe@expressindia.com