Donald Trump on Plastic and Paper straws : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी (१० मार्च) कागदी स्ट्रॉच्या वापरावर बंदी घालण्याची घोषणा केली. कागदी स्ट्रॉऐवजी प्लास्टिकच्या स्ट्रॉचा वापर सुरू करावा, असं आवाहनही त्यांनी नागरिकांना केलं. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या तत्कालीन सरकारनं प्लास्टिकच्या स्ट्रॉवर बंदी घातली होती. त्यांनी कागदी स्ट्रॉच्या वापराला प्रोत्साहन दिलं होतं. विशेष म्हणजे सरकारला हा निर्णय घेण्यास ट्रम्प यांनी भाग पाडलं होतं. आता राष्ट्राध्यपदाची सूत्रं हातात येताच ट्रम्प यांनी हा निर्णय बदलला आहे. दरम्यान, कागदी स्ट्रॉच्या वापरावर ट्रम्प यांनी बंदी का घातली? त्यांनी प्लास्टिकचा स्ट्रॉ वापरण्याचं आवाहन का केलं? याबाबत जाणून घेऊ.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून डोनाल्ड ट्रम्प एकामागून एक जलद निर्णय घेत आहेत. आतापर्यंत त्यांनी टॅरिफ, ट्रान्सजेंडर, अमेरिकन गोल्ड कार्ड यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेतले आहेत. सोमवारी राष्ट्राध्यक्षांनी कागदी स्ट्रॉला प्रोत्साहन देणाऱ्या आणि प्लास्टिकच्या स्ट्रॉवर बंदी घालणाऱ्या संघीय खरेदी धोरणांमध्ये बदल करण्यासाठी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. “मी अनेकदा कागदी स्ट्रॉचा वापर केला आहे. ते कधी कधी तुटतात, फाटतात आणि जास्त वेळ तग धरू शकत नाहीत. त्याऐवजी प्लास्टिकच्या स्ट्रॉचा वापर करावा”, असं ट्रम्प यांनी म्हटलं.
ट्रम्प यांच्या निर्णयाचे काय परिणाम?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या आदेशामुळे अमेरिकेतील संघीय एजन्सींना कागदी स्ट्रॉ खरेदी करणं थांबवावं लागणार आहे. तसेच पुन्हा प्लास्टिकचे स्ट्रॉ विक्रीसाठी आणावे लागणार आहे. तसं पाहता, बऱ्याच अमेरिकन लोकांना कागदी स्ट्रॉ वापरायचा निराशाजनक अनुभव आला होता. प्लॉस्टिकच्या स्ट्रॉच्या तुलनेनं कागदी स्ट्रॉ लवकर तुटतात आणि त्यामुळे ते वापरातून काढून टाकावेत, अशी मागणी केली जात होती. त्यावरून काहींनी ट्रम्प यांना लक्ष्यही केलं होतं. त्यामुळेच राष्ट्राध्यक्षांनी प्लास्टिककडे परत जाण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.
आणखी वाचा : America vs India : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावरील संताप नेमका कशासाठी?
दुसरीकडे माजी राष्ट्राध्यक्षांचा निर्णय बदलल्यामुळे पर्यावरणवाद्यांनी पुन्हा ट्रम्प यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. ब्रिटनमधील किंग्ज कॉलेज लंडनमधील शहरी कचरा आणि शाश्वतता तज्ज्ञ व संशोधन सहयोगी रंदा काशेफ म्हणाल्या, “अमेरिकेतील अनेक राज्यं आणि शहरांनी आधीच प्लास्टिकच्या स्ट्रॉवर बंदी घातली आहे. कारण- ते महासागर आणि जलस्रोत प्रदूषित करतात. त्याचबरोबर जलचर प्राण्यांनाही हानी पोहोचवतात. प्लास्टिकवरील बंदी उठवून, राष्ट्राध्यक्ष काय साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत”, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
प्लास्टिकच्या स्ट्रॉवर बंदी का होती?
२०१५ मध्ये अमेरिकेत एका कासवाच्या नाकात प्लास्टिकच्या स्ट्रॉ अडकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पशुवैद्यकीय डॉक्टर हा तुकडा काढत असताना कासवाच्या नाकातून रक्त वाहत होतं. त्याला प्रचंड वेदनाही होत होत्या. या व्हिडीओमुळे अमेरिकन नागरिकांच्या मनात संतापाची लाट उसळली. माणसानं स्वत:च्या स्वार्थासाठी वापरलेल्या वस्तूंमुळे मुक्या प्राण्यांना त्रास सहन होत आहे, अशा भावना अनेकांच्या मनात निर्माण झाल्या. त्यातून सोशल मीडियावर प्लास्टिक बंदीची चळवळ उभी राहिली. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनीही या मुद्द्यावरून तत्कालीन जो बायडेन सरकारला लक्ष्य केलं होतं. त्यानंतर अमेरिकन सरकारनं प्लास्टिकला पर्याय म्हणून कागदी स्ट्रॉचा वापर करण्याचं आवाहन नागरिकांना केलं. इतकंच नाही, तर २०३५ पर्यंत सर्व सरकारी कार्यालयांमध्ये प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्याचं बायडेन प्रशासनाचं ध्येय होतं.
प्लास्टिकमुळे पर्यावरणावर काय परिणाम?
दरवर्षी मानव अंदाजे ३८० दशलक्ष टन प्लास्टिक कचरा निर्माण करतो, ज्यामध्ये ४३ दशलक्ष टन एकदाच वापरता येणाऱ्या वस्तू जसे की त्यामध्ये स्ट्रॉचाही समावेश आहे. त्यापैकी बऱ्याच प्लास्टिक वस्तूंमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. अंदाजानुसार आठ अब्जांहून अधिक प्लास्टिक स्ट्रॉ जगभरातील किनारपट्ट्यांवर पसरले आहेत. प्लास्टिकचे विघटन होण्यास शेकडो वर्षं लागू शकतात; परंतु ते कधीही पूर्णपणे विघटित होत नाहीl. त्याचे छोटे कण पाणी, माती, हवा, अन्नसाखळी आणि अगदी आपल्या शरीरातही आढळले आहेत. अनेक अभ्यासांतून असे दिसून आले की, प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमता कमी होते आणि कर्करोगासारख्या गंभीर आरोग्य समस्या उद्भवतात.
प्लास्टिकचे स्ट्रॉ किती हानिकारक?
अंदाजानुसार प्लास्टिकचे स्ट्रॉ हे समुद्रातील प्लास्टिक कचऱ्याच्या वजनाच्या १% पेक्षा कमी असतात, परंतु त्यांचा हलक्यापणा आणि आकारामुळं ते मोठ्या प्लास्टिकच्या वस्तूंपेक्षा लवकर तुटतात, ज्यामुळे त्यांना गोळा करणं खूपच कठीण जातं, असं रंदा काशेफ यांनी सांगितलं. प्लास्टिक संकट या मोठ्या आव्हानाला तोंड देण्यासाठी उपाययोजना करणं आवश्यक आहे, असंही त्या म्हणाल्या. अलीकडच्या काही वर्षांत पर्यावरणीय चिंतांमुळे अनेक अमेरिकन शहरं आणि राज्यांनी प्लास्टिकवरील व्यापक नियंत्रणाचा भाग म्हणून स्ट्रॉचा वापर मर्यादित केला आहे.
प्लास्टिकच्या स्ट्रॉला कोणकोणते पर्याय?
प्लास्टिकच्या स्ट्रॉच्या हानिकारक परिणामांबद्दल जागरूकता वाढल्यानं धातू, काच, बांबू आणि अर्थातच कागद यांसारख्या पदार्थांपासून तयार पर्यायांमध्ये वाढ झाली आहे. “पेपर स्ट्रॉच्या बाबतीत, डोनाल्ड ट्रम्प हे एकटेच टीकाकार नाहीत. कोणालाही कागदी स्ट्रॉ आवडत नाहीत. त्याचं डिझाइन चांगलं नव्हतं, हे मी मान्य करते”, असं काशेफ म्हणाल्या. “जलरोधक राहण्यासाठी कागदी स्ट्रॉमध्येही बहुतेकदा प्लास्टिकचा वापर केला जातो. काही अभ्यासांतून असं दिसून आलं की, प्लास्टिकपेक्षा कागदी स्ट्रॉमध्ये पाणी दूषित करणारी आणि आरोग्याला हानी पोहोचवणारी विविधं रसायनं असतात”, असंही काशेफ यांनी सांगितलं आहे.
पर्यावरणवादी काय म्हणाले?
“प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी कोणताही पर्याय परिपूर्ण नाही. मात्र, एकदा वापरता येणारं प्लास्टिक हा अजूनही सर्वांत वाईट पर्याय आहे. वर्षभरापूर्वी मी वापरलेला प्लास्टिकचा स्ट्रॉ अजूनही तसाच आहे, त्याचं विघटन झालं नाही. जोपर्यंत तो जाळला जात नाही, तोपर्यंत त्याचं विघटन करणं अशक्य आहे. काही वैद्यकीय परिस्थितीत किंवा अपंगत्व असलेल्या लोकांसाठी स्ट्रॉ आवश्यक आहेत. परंतु, प्लास्टिकचे स्ट्रॉ पुन्हा वापरण्यास सुरुवात करणं हे पर्यावरणासाठी धोकायदायक ठरू शकतं”, या गोष्टीवरही काशेफ यांनी प्रकाश टाकला. प्लास्टिक किंवा कागदी स्ट्रॉ वापरण्यापेक्षा नागरिकांनी स्टीलचा स्ट्रॉ वापरला पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.
हेही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मॉरिशस दौरा; मॉरिशसला का म्हटले जाते Land of the Ramayana?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाचा काय परिणाम?
सेंटर फॉर इंटरनॅशनल एन्व्हायर्न्मेंटल लॉ (CIEL) येथील पर्यावरण आरोग्य प्रचारक राहेल रॅडव्हानी म्हणाल्या, “डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशाचा अर्थ असा होतो की, अमेरिकन सरकारी इमारती आणि मालमत्ता, ज्यामध्ये राष्ट्रीय उद्यानं समाविष्ट आहेत. आता ते कागदी स्ट्रॉऐवजी प्लास्टिकच्या स्ट्रॉचा वापर सुरू करतील, ज्यामुळे प्लास्टिकच्या कचऱ्यात मोठी वाढ होईल आणि पर्यावरणाला हानी पोहोचेल.” दुसरीकडे प्लास्टिक इंडस्ट्री असोसिएशनचे सीईओ मॅट सीहोम म्हणाले, “स्ट्रॉ ही फक्त सुरुवात आहे – ‘प्लास्टिककडे परत जा’ ही एक चळवळ आहे, ज्याला आपण सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे.”
जगभरातील बहुतांश देशांमध्ये प्लास्टिक बंदी
जगभरातील अनेक देशांनी प्लास्टिकबाबत कडक नियम लागू केले आहेत. युरोपियन युनियननं २०२१ मध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांसह इतर वस्तूंवर बंदी घातली होती. कॅनडामध्ये २०२३ मध्ये एकदा वापरता येणाऱ्या प्लास्टिक पिशव्या, स्ट्रॉ व कटलरींवर बंदी घालण्यात आली. भारतानं २०२२ मध्ये प्लास्टिक पिशव्या आणि स्ट्रॉसह १९ प्रकारच्या एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घातली. केनियानं २०१७ मध्ये प्लास्टिकच्या वापराबाबत सर्वांत कठोर कायदा आणला, ज्यामध्ये प्लास्टिक पिशव्यांच्या वापर आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. नियमांचं उल्लंघन करणाऱ्याला मोठा दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाईल, अशी तरतूद कायद्यात करण्यात आली.
ऑस्ट्रेलियातील अनेक राज्यांनी हळूहळू प्लास्टिक बंदी लागू केली आहे; तर न्यूझीलंडने २०२३ पासून प्लास्टिकच्या वस्तूंवर कडक बंदी घालण्यास सुरुवात केली आहे. चीननंदेखील प्लास्टिकच्या पिशव्या, तसेच इतर वस्तूंवर बंदी घालण्याच्या विचारात आहे. एकंदरीत प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणाचा ऱ्हास आणि प्रदूषण कमी करण्याचा सर्व देशांचा मानस आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कागदी स्ट्रॉवर बंदी घालण्याच्या निर्णयावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे अमेरिकेत प्लास्टिकचा सर्रास वापर सुरू होण्याची शक्यता आहे. त्यांच्या या निर्णयानंतर इतर देशही हेच धोरण अवलंबणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.