अमोल परांजपे
अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीचा बिगूल सोमवारी अधिकृतरीत्या वाजला. आयोवा राज्यात रिपब्लिकन ‘कॉकस’च्या निवडणुकीत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अन्य दोन प्रतिस्पर्ध्यांवर मोठ्या फरकाने मात केली आहे. ही पहिली लढाई जिंकल्यामुळे आता अध्यक्षीय निवडणुकीत पक्षाकडून त्यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित मानली जात आहे. आयोवा कॉकसची निवडणूक महत्त्वाची का ठरली, याचा हा आढावा…
कॉकस आणि प्रायमरीज म्हणजे काय?
अमेरिकेमध्ये राजकीय पक्षाकडून कोणत्याही निवडणुकीत उमेदवारी हवी असेल, तर त्यासाठी आधी पक्षातून निवडून यावे लागते. या पक्षांतर्गत प्राथमिक फेरीच्या निवडणुकांना ‘प्रायमरीज’ किंवा ‘कॉकसेस’ म्हणतात. या दोन्ही प्रकारांमध्ये शक्यतो पक्षाचे नोंदणीकृत सदस्य आपल्या पसंतीच्या उमेदवारासाठी मतदान करतात. दोन्हीमध्ये छोटासा फरक असा की ‘प्रायमरीज’ या त्या-त्या राज्याच्या प्रशासनामार्फत आयोजित केल्या जातात आणि ‘कॉकसेस’ पक्ष स्वत:हून घेतो. या दोन्ही प्रकारच्या पक्षांतर्गत निवडणुकांमध्ये शाळा, चर्च, समाजगृहे आदी ठिकाणी मतदानकेंद्रे उभारली जातात. यात सर्वात आधी होणारी रिपब्लिकन पक्षाची आयोवा कॉकस महत्त्वाची मानली जाते.
आणखी वाचा-विश्लेषण: इंडिगो विमानामध्ये प्रवाशाचे गैरवर्तन… नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे काय सांगतात?
आयोवा कॉकस महत्त्वाचे का?
खरे म्हणजे आयोवा हे अमेरिकेतील एक छोटे राज्य आहे. या राज्यातून रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षीय निवडणुकीत मताला जास्त वजन असलेले ४० डेलिकेट्स (एकूण डेलिकेट्समध्ये हे प्रमाण केवळ दोन टक्क्यांपेक्षाही कमी आहे) जातात. असे असले तरी आयोवा कॉकस हे निवडणूक वर्षातील पहिले मतदान असल्यामुळे त्यामध्ये कोणता उमेदवार बाजी मारतो, याला महत्त्व असते. रिपब्लिकन पक्षातून सध्या आघाडीवर असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी आयोवा कॉकस प्रतिष्ठेची करण्याचे हेच कारण होते. त्यांना या निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा कमी मते मिळतात की ही सीमारेषा ते पार करतात, याकडे लक्ष लागले होते. निम्म्यापेक्षा कमी डेलिकेट्स ट्रम्प यांच्या बाजूने आले असते, तर अखेरपर्यंत त्यांच्या समोर उभ्या राहणाऱ्या उमेदवाराला संधी मानली गेली असती. मात्र आयोवा कॉकसच्या निकालांनी ट्रम्प यांची बाजू अधिक भक्कम केली आहे.
आयोवा कॉकसचा निकाल काय?
मंगळवारी संध्याकाळपर्यंत साधारणत: ९९ टक्के मतदानाचा कल हाती आला असून डोनाल्ड ट्रम्प यांनी ४० पैकी २० डेलिकेट्स आपल्या पदरात पाडून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याखालोखाल रॉन डिसँटिस यांना आठ तर भारतीय वंशाच्या निक्की हॅले यांना सात डेलिकेट्स मिळाले आहेत. आणखी एक भारतीय वंशाचे उद्योजक विवेक रामस्वामी यांना केवळ तीन डेलिकेट्स मिळाल्यानंतर त्यांनी प्रायमरीजमधून माघार घेत ट्रम्प यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. कॉकसमधील पाचवे उमेदवार असा हचिन्सन यांना अवघी १९१ मते मिळाली असून एकही डेलिकेट मिळविता आलेला नाही. त्यामुळे आता रिपब्लिकन पक्षात ट्रम्प, डिसँटिस आणि हॅले असे तीनच उमेदवार राहिले आहेत. आता जुलैमधील पक्षाच्या अधिवेशनापर्यंत ट्रम्प यांच्यासमोर कोणता उमेदवार टिकाव धरतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
आणखी वाचा-विश्लेषण : देशभरात अंड्यांच्या दरात वाढ का?
डिसँटिस आणि हॅले यांच्यापैकी कोण?
आयोवा कॉकस होण्यापूर्वी हॅले या पक्षामध्ये दुसऱ्या क्रमांकावर होत्या. या निवडणुकीत त्यांना डिसँटिस यांच्यापेक्षा जास्त मते मिळाली असती, तर त्यांची उमेदवारी अधिक बळकट झाली असती. मात्र आयोवामध्ये घरोघरी जाऊन केलेल्या प्रचाराचे फळ डिसँटिस यांना मिळाले असून त्यांचे आव्हान अद्याप कायम आहे. गेल्या दोन आठवड्यांत हॅले यांची लोकप्रियता वाढल्याचे आकडेवारीवरून दिसत असले, तरी आयोवामध्ये तिसऱ्या क्रमांकावर गेल्याने याला काहीसा धक्का बसला आहे. आता २३ तारखेला न्यू हॅम्पशायर व ३ फेब्रुवारीला दक्षिण कॅरोलिना (निक्की हॅले या राज्याच्या गव्हर्नर होत्या) या राज्यांच्या प्रायमरीज होणार आहेत. ही दोन्ही राज्ये हॅले यांच्यासाठी अनुकूल आहेत. त्यामुळे ट्रम्प यांच्यासमोर अखेरपर्यंत कोण टिकणार हे ३ फेब्रुवारीनंतर स्पष्ट होईल.
बायडेन विरुद्ध ट्रम्प लढाईची शक्यता किती?
डेमोक्रेटिक पक्षातून बायडेन यांना फारसे आव्हान नाही. त्या पक्षातून बायडेन-कमला हॅरीस ही जोडी पुन्हा निवडणूक रिंगणात असेल, हे जवळजवळ स्पष्ट आहे. आयोवा कॉकसच्या निकालानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे स्थान अधिक भक्कम झाले आहे. आपल्या हक्कांच्या राज्यांमध्ये हॅले किती आघाडी घेतात, हे बघणे महत्त्वाचे असले तरीदेखील अखेरीस ट्रम्प यांच्याच नावावर पक्ष शिक्कामोर्तब करेल, अशी शक्यता सध्यातरी दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नोव्हेंबरमध्ये बायडेन-ट्रम्प लढाई क्रमांक २ बघायला मिळू शकते…
amol.paranjpe@expressindia.com