कॅथलिक ख्रिस्ती धर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना डबल न्यूमोनिया झालेला आहे. फुप्फुसाच्या दाहयुक्त सुजेला न्यूमोनिया (pneumonia) अथवा फुप्फुसशोथ म्हणतात. हा आजार जीवाणू अथवा विषाणू संसर्गामुळे होतो. हे सूक्ष्मजंतू श्वसन तंत्राच्या वरील भागातून अंत:श्वसनाच्या वेळी खालच्या भागातील वायुकोशात शोषले जातात आणि तेथे ते शोथ उत्पन्न करतात. पोप फ्रान्सिस यांना आधीपासून फुप्फुसाचा आजार आहे. त्यांच्या फुप्फुसाचा काही भाग संसर्गामुळे १९५७ मध्ये काढण्यात आला होता. याआधी २०२३ मध्ये न्यूमोनियामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. आता डबल न्यूमोनियामुळे त्यांच्या प्रकृतीला असलेला धोका आणखी वाढला आहे.
डबल न्यूमोनिया म्हणजे काय?
सर्वसाधारणपणे एका फुप्फुसाला संसर्ग होऊन न्यूमोनिया होतो. हा संसर्ग दोन्ही फुफ्फुसांमध्ये असेल तर त्याला डबल न्यूमोनिया म्हटले जाते. त्यामुळे निर्माण होणारा धोकाही अधिक असतो. न्यूमोनियामध्ये फुप्फुसातील वायुकोशांमध्ये दाह निर्माण होऊन ते पू आणि द्रवपदार्थाने भरतात. यातून रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊन रुग्णाला कृत्रिम ऑक्सिजनवर ठेवावे लागते. यात प्रामुख्याने खोकला, कफ, श्वसनास त्रास आणि ताप अशी लक्षणे दिसून येतात. याचबरोबर श्वास घेताना वेदनाही जाणवतात. जगभर आढळणारा न्यूमोनिया आजार वर्षाच्या कोणत्याही ऋतूत आढळतो. अतिथंडी, अतिथकवा, छातीच्या भित्तीची इजा, भुलीच्या औषधांचा वापर, मद्यपानातून विषबाधा आदी कारणांमुळे न्यूमोनिया होण्याचा धोका असतो.
उपचार नेमके काय?
न्यूमोनियावर प्रतिजैविक औषधांच्या साहाय्याने उपचार केले जातात. रुग्णाच्या कफाचा नमुना घेऊ तो प्रयोगशाळेत तपासला जातो. त्यावर विविध प्रतिजैविकांची चाचणी केली जाते. कफातील सूक्ष्मजंतू कोणत्या प्रतिजैविकांमुळे मरतात, हे शोधले जाते. त्यातून योग्य प्रतिजैविक निवडून रुग्णावर उपचार केले जाते. प्रतिजैविकांचा चुकीचा वापर होऊन प्रतिरोध निर्माण होऊ नये, म्हणून सूक्ष्मजंतूचा अचूक शोध घेणे आवश्यक ठरते. त्यातून योग्य औषधोपचार होऊन रुग्ण लवकर बरे होण्याची शक्यता निर्माण होते. पोप फ्रान्सिस यांच्यात वेगवेगळ्या प्रकारचा संसर्ग आढळून आला असून, त्यांच्या फुप्फुसातील दाह आणि दम्याचा त्रास कमी करण्यासाठी स्टेरॉईडचा वापर केला जात आहे.
उपचारात आव्हाने कोणती?
पोप फ्रान्सिस यांना गुंतागुंतीचा श्वसनमार्ग संसर्ग झाला आहे. त्यात जीवाणू, विषाणूंसह इतर घटकांचा समावेश आहे. पोप यांचे वजन जास्त असून, त्यांची बैठी जीवनशैली आहे. या दोन्ही गोष्टी उपचार करणाऱ्या डॉक्टरांना चिंतेच्या वाटत आहेत. कारण यामुळे त्यांच्या प्रकृतीत गुंतागुंत निर्माण होण्याचा धोका अधिक आहे. पोप यांच्या रक्तप्रवाहामध्ये हा संसर्ग पोहोचला नसल्याने ही आशादायी बाब आहे. त्यामुळे पुढील काही आठवडे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी ठेवावे लागेल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
सर्वाधिक धोका कोणाला?
लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये न्यूमोनिया हा आजार अधिक तीव्र स्वरूपाचा दिसून येतो. कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते. तसेच, हृदयविकार आणि आधीपासून फुप्फुसाचा विकार असलेल्या व्यक्तींमध्ये न्यूमोनियाचा धोका अधिक गंभीर बनतो. जगभरात मृत्यू होण्याच्या कारणांमध्ये न्यूमोनिया हे आठव्या क्रमांकाचे कारण आहे. केवळ अमेरिकेचा विचार करता दरवर्षी १० लाखांहून अधिक प्रौढांना न्यूमोनियामुळे रुग्णालयात दाखल करावे लागते. याचबरोबर अमेरिकेत दरवर्षी ५० हजार जणांचा न्यूमोनियामुळे मृत्यू होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, जगात दरवर्षी ५ वर्षांखालील ७ लाख मुलांचा मृत्यू न्यूमोनियामुळे होतो.
काळजी काय घ्यावी?
न्यूमोनियासाठी सूक्ष्मजंतुसंसर्ग कारणीभूत ठरत असल्याने त्यावरील प्रतिबंधात्मक लसीकरण महत्त्वाचे ठरते. त्यात कोविड-१९, फ्लू आणि न्यूमोनियावरील लसीचा समावेश आहे. फ्लूच्या लसीमुळे न्यूमोनिया होण्याचा धोका २५ ते ५३ टक्के कमी होतो. फ्लूच्या संसर्गानुसार न्यूमोनिया होण्याचे प्रकार सर्वसाधारणपणे आढळून येतात. लसीकरणामुळे हा धोका कमी होतो. फ्लू आणि कोविड-१९ हे हवेतून पसरणारे विषाणूजन्य आजार आहेत. त्यामुळे या संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी मास्कचा वापर करणे अधिक योग्य ठरते. ज्येष्ठ नागरिकांमध्ये न्यूमोनियाचा धोका जास्त असल्याने त्यांनी श्वसनास त्रास, ताप यांसारखी लक्षणे दिसून आल्यानंतर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
sanjay.jadhav@expressindia.com