Why Unilever Is Recalling Dry Shampoo: केसाच्या उत्तम आरोग्यासाठी निदान तीन दिवसांचे अंतर ठेवून केस धुण्याचा सल्ला दिला जातो मात्र वेळेअभावी अनेकांना आठवड्यातून दोनदाच काय तर एकदाही केस धुणे शक्य होत नाही. अशावेळी झटपट पर्याय म्हणून ड्राय शॅम्पूचा वापर वाढत आहे. केसाची दुर्गंधी घालवण्यासाठी ड्राय शॅम्पू एक उत्तम मार्ग आहे मात्र यामुळे केसाच्या आरोग्यावर होणारा परिणामही आपण विचारात घ्यायला हवा. तुम्हाला ठाऊक आहे का या ड्राय शॅम्पूचा वापर जितका वेळ वाचवतो तितका दीर्घकालीन वाईट परिणामही करू शकतो. युनिलिव्हर कंपनीच्या विविध ब्रँड्सच्या ड्राय शॅम्पूची सर्वत्र चर्चा आहे. युनिलिव्हर कंपनीच्या ड्राय शॅम्पूची उत्पादने सध्या परत मागवण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आज आपण ड्राय शॅम्पू म्हणजे नेमकं काय? त्याचा वापर कसा करतात? युनिलिव्हरच्या ड्राय शॅम्पूमध्ये नेमकी काय समस्या आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत…
युनिलिव्हरने ड्राय शॅम्पू परत का मागवले?
युनिलिव्हरच्या डव (Dove), नेक्सस (Nexxus), सुआवे (Suave), TIGI (Rokaholic व Bed Head), व TRESemmé या उत्पादनांना कंपनीतर्फे परत मागवण्यात आले आहे. युनिलिव्हर कंपनीच्या विविध शॅम्पूच्या वापरातून कॅन्सरचा धोका निर्माण होत असल्याची माहिती समोर आल्यावर कंपनीने बाजारातील उत्पादने परत मागवली आहेत. प्राप्त माहितीनुसार या उत्पादनांमध्ये बेंझिनचे प्रमाण अधिक असल्याची संभाव्यता होती मात्र याबाबत कंपनीकडून कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. केवळ सुरक्षेच्या कारणांसाठी ही उत्पादने परत मागवली असल्याचे सांगण्यात आले आहे
ड्राय शॅम्पू म्हणजे काय?
कॉलिन्स डिक्शनरीनुसार, ड्राय शॅम्पू हे पावडर किंवा स्प्रे स्वरूपात असलेले उत्पादन आहे जे तुम्ही केस ओले न करता स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता. क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, हे अल्कोहोल किंवा स्टार्च वापरून तयार केलेले असते. तेलकट केसातील चिकटपणा काढून टाकण्यासाठी व पातळ केसाचे व्हॉल्यूम वाढवण्यासाठी ड्राय शॅम्पू वापरला जातो. काही ड्राय शॅम्पूमध्ये एरोसोल स्प्रे वापरलेले असते तर प्रत्येक रंगाच्या केसाप्रमाणे टिंटेड पावडर वापरलेली असते. पण मुळात ड्राय शॅम्पूमुळे केस धुतलेले दिसतात. केस स्वच्छ करण्यासाठी, आपल्याला ते पाण्याने चांगले धुवावे लागतातच.
ड्राय शॅम्पूमुळे आरोग्यावर काय परिणाम होतो?
युनिलिव्हरच्या माहितीनुसार, बेंझिन हे कार्सिनोजेन म्हणून वर्गीकृत आहे. श्वसन प्रक्रियेत मुख्यतः नाक किंवा तोंडावाटे तसेच त्वचेद्वारे बेंझिनशी संपर्क होऊ शकतो. यामुळे ल्युकेमिया, अस्थिमज्जा आणि रक्ताच्या कर्करोगासह अनेक दुर्धर आजार होण्याचा धोका असतो. बेंझिन हे वातावरणातही उपस्थित असते मात्र ड्राय शॅम्पूसारख्या उत्पादनांमुळे त्याचा शरीराशी मोठ्या प्रमाणात व जवळून संपर्क होऊ शकतो.
FDA ने सांगितल्याप्रमाणे, युनिलिव्हरच्या परत मागवलेल्या उत्पादनांमधील बेंझिनचे प्रमाण हे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम करण्याची शक्यता कमी आहे. तरीही बेंझिनच्या वारंवार संपर्कात आल्याने धोका निर्माण होऊ शकतो. क्लीव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार, नियमित ड्राय शॅम्पूचा वापर वापर केल्याने टाळूला त्रास होऊ शकतो तसेच केसगळती, केस तुटणे, केसाची वाढ खुंटणे अशा समस्याही वाढू शकतात.
दरम्यान, स्प्रे ड्राय शॅम्पूच्या धोक्यामुळे यापूर्वीही काही कंपन्यांनी आपली उत्पादने परत मागवली होती. डिसेंबर २०२१ मध्ये, P&G ने Valisure च्या निष्कर्षांनंतर एरोसोल उत्पादनांच्या संपूर्ण पोर्टफोलिओची चाचणी केली होती ज्यानंतर त्यांनी बेंझिन मुळे Pantene आणि Herbal Essences ड्राय शॅम्पू परत मागवले होते. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, गेल्या दीड वर्षात, जॉन्सन अँड जॉन्सन काही उत्पादनांमधून एरोसोल सनस्क्रीन काढण्यात आले आहे.