Dhammachakra Pravartan Din 2024: १४ ऑक्टोबर १९५६ हा दिवस दलित समाजाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तब्बल ३ लाख ६५ हजार दलित अनुयायांसह हिंदू धर्मातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि बौद्ध धम्म स्वीकारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेणे हा क्षण भारताच्या इतिहासही अत्यंत महत्त्वाचा क्षण होता. या क्षणामुळे देशातील दलित समाजाला एक नवी प्रेरणा मिळाली, एक आवाज मिळाला, जो आजवर हिंदू धर्मातील चातुर्वर्ण व्यवस्थेमुळे दडपला गेला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘धर्मांतर’

डॉ. आंबेडकर हे हिंदू धर्माच्या मूलभूत तत्त्वांमुळे फार पूर्वीपासून निराश झाले होते. त्यांनी हिंदू धर्मातील अंगभूत वैशिष्ट्ये, विशेषत: ‘जातिव्यवस्था’ ही ब्रिटिशांपेक्षा भारतीय समाजाच्या स्वातंत्र्यासाठी मोठा धोका असल्याचे मानले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते दलित समाजाला भारतीय समाजात स्वत:साठी स्थान मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ‘धर्मांतर’ हा होता, तर त्याच वेळी चातुर्वर्ण्य व्यवस्थेत सुधारणा करून पुढे गेले पाहिजे, असे गांधीजींचे मत होते.
१९३६ सालच्या मे महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईत महार जातीच्या एका मोठ्या मेळाव्याला संबोधित केले होते, या मेळाव्यातील भाषणामध्ये त्यांनी आपले धर्मांतराबद्दलचे विचार जाहीर केले. तसेच धर्मांतर हाच मार्ग मुक्तीचा सर्वोत्तम मार्ग असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले “मी तुम्हा सर्वांना अगदी स्पष्टपणे सांगतो, ‘धर्म हा माणसासाठी असतो, माणूस धर्मासाठी नाही’. माणसासारखी वागणूक मिळवण्यासाठी स्वतःचे धर्मांतर करा.

आणखी वाचा: विश्लेषण: आधुनिक फॅशन ट्रेण्डमध्ये ‘इंडिगो ब्लू’ आला कुठून?

भारतीयत्व महत्त्वाचे

असे असले तरी प्रारंभिक कालखंडात बौद्ध धर्माकडे वळणे हे बाबासाहेबांसाठी फारसे उत्स्फूर्त नव्हते. त्यांनी पुढील २० वर्षे कोणता धर्म त्यांच्या गरजेनुसार अनुकूल होईल यावर सखोल विचार केला. तसेच इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्म त्यांच्याशी संलग्न असलेल्या परकीयतेमुळे स्वीकारण्याचा विचार फेटाळून लावला. प्रोफेसर गौरी विश्वनाथन यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे, बाबासाहेबांनी वेगळ्या धर्मात धर्मांतर करण्याचा निर्णय घेतला तरीही त्यांना आपल्या मूळच्या ‘भारतीयत्वा’चा त्याग करायचा नव्हता. कोणता धर्म योग्य या विषयावरील प्रदीर्घ चिंतनानंतर त्यांनी बौद्ध धम्माची निवड केली, यानंतर प्रत्यक्षात बौद्ध धम्माची त्यांची स्वतःची आवृत्ती पुढे आली, जिथे त्यांनी तर्कसंगत नसणाऱ्या बौद्ध धर्माच्या काही पैलूंमध्ये सुधारणा केली. दुर्दैवाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निर्वाण लगेचच झाले. त्यामुळे ते फार काळासाठी बौद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानाचे पालन करू शकले नाहीत. त्यांच्या निर्वाणानंतर आजतागायत बरेच अभ्यासक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा का घेतली याची कारणमीमांसा धुंडाळण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रस्तुत विश्लेषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म का स्वीकारला, यामागे वेगवेगळ्या अभ्यासकांनी दिलेल्या तीन कारणांचा आढावा घेतला आहे.

राजकीय निषेध

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले धर्मांतर ही राजकीय खेळी होती, अशी टीका एका अभ्यासकांच्या गटाकडून होते. बाबासाहेबांनी हिंदू बहुसंख्य लोकांच्या प्रशासनापासून संरक्षणाचा उपाय म्हणून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली होती. परंतु त्यांनी मदन मोहन मालवीय यांच्या सोबत १९३२ सालच्या ‘पूना पॅक्ट’ वर सही करून मागणी सोडली, परंतु या करारातून विधिमंडळात अस्पृश्यांच्या राखीव जागा ठेवण्यासंबंधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात करार झाला. यामागे गांधीजींचे उपोषण हे कारणीभूत होते. समाजशास्त्र अभ्यासक गेल ओमवेद या सारख्या अनेक समिक्षकांच्या मतानुसार, डॉ. आंबेडकरांचे बौद्ध धर्मात होणारे धर्मांतर हा एक राजकीय निषेध होता, अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघ न मिळाल्याने त्यांची निराशा झाली होती.

आणखी वाचा: विश्लेषण: बुद्ध पौर्णिमा २०२३- भारतात सर्वाधिक बौद्ध लेणी का आढळतात?

हिंदू धर्माविरुद्ध आयुष्यभराची लढाई

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जातीवर आधारित वेगळेपणाचा पहिला अनुभव ते शाळेत असताना आला. तेव्हापासून ते जगभरातील अनेक ठिकाणांहून शैक्षणिक पात्रता संपादन करून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जातिव्यवस्थेच्या अत्याचारांशी झुंज देत मोठे झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बौद्ध धम्मातील धर्मांतर हे त्यांच्या जीवनानुभवाचे आणि त्यांच्यावरील सांस्कृतिक प्रभावांचा परिणाम म्हणून पाहिले जाणे आवश्यक आहे असे अनेक इतिहासकारांचे मत आहे.

“हिंदू धर्म मूलभूत मानवी हक्क मिळवण्यात अपयशी ठरला आहे. हिंदू समाज समानतेची वागणूक देत नाही, परंतु धर्मांतराने ते सहज साध्य होते,” असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईतील भाषणात व्यक्त केले होते. पुढे, येणाऱ्या वर्षांमध्ये, त्यांच्या निर्णयावर प्रभाव टाकणारी अनेक सांस्कृतिक प्रतिके पुढे आली. गौरी विश्वनाथन यांनी नमूद केल्याप्रमाणे दक्षिण भारतातील १२ व्या शतकातील दलित शहीद ‘नंदनार’ यांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. त्यांनी मंदिरातील उपासनेच्या अस्पृश्यांच्या अधिकाराबाबत आवाज उठविला होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर प्रभाव पाडणारी आणखी एक ऐतिहासिक व्यक्ती म्हणजे मौर्य राजा सम्राट अशोक, ज्याचे कलिंगाच्या युद्धानंतर मतपरिवर्तन होऊन बौद्ध धम्माचा स्वीकार केला, त्याचे हे परिवर्तन सहिष्णुता आणि मानवतेच्या युगाची सुरुवात मानली जाते.

आधुनिकता जपणारा म्हणून बौद्ध धम्म

बौद्ध धर्माला बाबासाहेबांनी सर्वात आधुनिक आणि तर्कसंगत धर्म म्हणून पाहिले, हे विद्वानांमध्ये सर्वात लोकप्रिय मत आहे. या सिद्धांताचा सर्वात मजबूत समर्थक म्हणजे धर्म अभ्यासक, ख्रिस्तोफर क्वीन. ख्रिस्तोफर क्वीन यांनी नमूद केल्याप्रमाणे, बौद्ध धम्मात परिवर्तन करून डॉ. आंबेडकरांनी आधुनिकता प्राप्त करण्याच्या सर्वात मूलभूत आवश्यकतांपैकी एक आवश्यकता पूर्ण केली, ती म्हणजे कारण आणि ऐतिहासिक जाणीवेवर आधारित वैयक्तिक निवड. या सिद्धांतानुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चिंतन केल्यानंतर बौद्ध धम्म हा धर्म म्हणून निवडला, हा निर्णय त्यांच्या तर्क, नैतिकता आणि न्यायाच्या जटिल आवश्यकता पूर्ण करतो. “आंबेडकरांसाठी बुद्धाच्या धम्माचे आवाहन हे तर्कसंगत निवडीवर भर देणारे होते,” असे गौरी विश्वनाथन यांनी नमूद केले आहे.

मूलतः डॉ. आंबेडकरांची बौद्ध धम्माची कल्पना ही बौद्ध धम्माच्या प्राचीन स्वरूपापेक्षा अधिक आधुनिक मानली जात होती. १९९६ साली ख्रिस्तोफर क्वीन यांनी नमूद केल्याप्रमाणे, “आंबेडकरांच्या उत्तरार्धात बौद्ध धम्म प्राचीन बौद्ध धर्माच्या मध्यवर्ती तत्त्वांची पुनरावृत्ती करतो. त्यांनी बौद्ध धम्मातील काही भाग नाकारले, विशेषत: चार आर्य सत्ये, त्यांच्या नुसार हिंदू धर्माच्या प्रभावामुळे या आर्य सत्यांची बुद्धाच्या शिकवणींमध्ये भर पडली. काही विद्वानांनी असा युक्तिवाद केला आहे की, डॉ.आंबेडकरांची बौद्ध धर्माची कल्पना ही फ्रेंच क्रांतीशी संबंधित ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुता’ या मूल्यांशी संबंधित आहे.

आणखी वाचा: विश्लेषण: बुद्ध पौर्णिमा २०२३- बुद्धमूर्तीमुळे प्रकाशात आले पहिल्या शतकातील प्राचीन जागतिकीकरण !

आंबेडकरांच्या धर्मांतराबद्दल त्यांच्या हेतूंवर विद्वानांनी वादविवाद सुरू ठेवले असले तरी, भारतातील दलित चळवळ आणि बौद्ध धर्म या दोघांनाही यामुळे गती मिळाली हे निश्चित होते. १९५० आणि ६० सालच्या दशकातील जनगणनेनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुसरण करत दलित समाजाने मोठ्या प्रमाणात धर्मांतरण केले, भारतातील बौद्धांची संख्या १९५१ सालामध्ये १४१,४२६ होती, ती १९६१ सालामध्ये ३,२०६,१४२ पर्यंत वाढली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr bababsaheb ambedkar october 14 dr babasaheb ambedkar conversion day why did they initiate buddhism svs