समस्त जगाला समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेची मूल्ये देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले. मुंबईत दादरच्या समुद्रकिनारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, हा परिसर आज चैत्यभूमी म्हणून ओळखला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी ६ डिसेंबर रोजी या चैत्यभूमीस भेट देतात. या जगाचा निरोप घेण्याच्या काही दिवस अगोदर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनात फक्त या भारतातील दीनदुबळ्या जनतेचे कल्याण कसे होईल, हाच विचार होता. महापरिनिर्वाणाच्या काही तास अगोदर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाबद्दल विचार करत होते. डॉ. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी काय केले? त्यांचे महापरिनिर्वाणाआधीचे काही दिवस कसे होते? हे जाणून घेऊ या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर दोन महिन्यांनी महापरिनिर्वाण

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या लाखो अनुयायांसह १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. डॉ. आंबेडकरांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळात केलेले धर्मांतर ही फार मोठी आणि क्रांतीकारक बाब मानली जाते. धर्मांतर केल्यानंतर डॉ. आंबेडकरांचे अवघ्या दोन महिन्यांच्या आत महापरिनिर्वाण झाले. १६ डिसेंबर १९५६ रोजी आंबेडकर त्यांच्या अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देणार होते. मात्र त्याआधीच ६ डिसेंबर रोजी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. बाबासाहेबांसमोर आणखी बरीच उद्दिष्ट्ये होती. मात्र प्रकृती आणि शरीराने साथ न दिल्यामुळे ती अपूर्णच राहिली.

२० नोव्हेंबर रोजी बुद्ध आणि कार्ल मार्क्स विषयावर व्याख्यान

धनंजय कीर यांनी लिहलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या चरित्रात्मक पुस्तकात आंबेडकरांच्या शेवटच्या काही दिवसांची तपशीलवार माहिती दिलेली आहे. याच पुस्तकातील माहितीनुसार, दीक्षा घेतल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वेगवेगळ्या ठिकाणचे दौरे सुरूच होते. बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर १४ नोव्हेंबर म्हणजेच एका महिन्याने बौद्ध धम्मविषयक एका जागतिक परिषदेसाठी ते काठमांडूला गेले होते. या परिषदेत त्यांनी २० नोव्हेंबर रोजी त्यांनी बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांच्या तत्त्वज्ञानावर एक व्याख्यान दिले होते.

१ डिसेंबर रोजी पुस्तकांच्या दुकानाला भेट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर १ डिसेंबर १९५६ रोजी आपल्या दिल्लीतील निवासस्थानी होते. या दिवशी सायंकाळी ते मथुरा पथावर भरलेले एक प्रदर्शन पाहायला गेले होते. या प्रदर्शनातील बुद्धीस्ट आर्ट गॅलरी पाहून ते बाहेर पडले. तसेच घरी येताना त्यांनी एका पुस्तकाच्या दुकानाला भेट दिली. येथे त्यांनी काही पुस्तके पाहिली. त्यातील काही निवडक पुस्तके त्यांनी आपल्या घरी पाठवण्यास सांगितले.

२ डिसेंबर रोजी डॉ. आंबेडकर अशोक विहारमध्ये दलाई लामांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या एका कार्यक्रमास उपस्थित होते. दलाई लामा तेव्हा बुद्धगया येथे आयोजित केलेल्या २५०० व्या बुद्ध महानिर्वाणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आले होते. डॉ. आंबेडकरांनी सायंकाळी आपल्या निवासस्थानी लोकांशी गप्पा मारल्या. त्यानंतर रात्री १० वाजता ते झोपी गेले.

१४ डिसेंबरची मुंबई भेट झालीच नाही

३ डिसेंबर रोजी सायंकाळी ते थकलेले वाटत होते. डॉ. आंबेडकराच्या निवासस्थानी बागकाम करणाऱ्याची प्रकृती ठीक नव्हती. डॉ. आंबेडकरांनी त्याची भेट घेतली. तसेच त्याची आस्थेवाईकपणे चौकशी केली. १४ डिसेंबर १९५६ रोजी मुंबईत एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डॉ. आंबेडकरांचे अनेक अनुयायी बौद्ध धम्माची दीक्षा घेणार होते. या कार्यक्रमाला डॉ. आंबेडकर उपस्थित राहणार होते. त्यासाठी त्यांनी आपल्या खासगी स्वीय सहायक नानकचंद रत्तू यांना रेल्वे तिकिटासंदर्भात चौकशी करावयास सांगितले. याच दिवशी त्यांनी आपल्या ‘बुद्ध आणि कार्ल मार्क्स’ या ग्रंथाचे शेवटचे प्रकरण लिहून ते टंकलेखणास पाठवले.

४ डिसेंबर रोजी राज्यसभेत गेले

४ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर काही तासांसाठी राज्यसभेत गेले होते. येथे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांशी अनौपचारिक गप्पाही मारल्या. आंबेडकरांची ही राज्यसभेची शेवटची भेट ठरली. ४ डिसेंबरच्या रात्री आंबेडकरांनी आचार्य प्र. के. अत्रे आणि एस. म. जोशी यांना पत्रे लिहिली होती. हे दोन्ही नेते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील आघाडीचे नेते होते. या दोन्ही नेत्यांनी रिपब्लिकन पक्षाला येऊन मिळावे, अशी विनंती डॉ. आंबेडकर यांनी या पत्रात केली होती.

नानकचंद रत्तू घरी गेले नाहीत

आंबेडकर व त्यांचा परिवार १४ डिसेंबर रोजी मुंबईला जाणार होता. प्रकृती ठीक नसल्यामुळे रेल्वेने प्रवास न करता त्यांनी विमानाने मुंबईला जाण्याचे ठरवले. ४ डिसेंबरच्या रात्री नानकचंद रत्तू यांनी टंकलेखनाचे काम रात्री एक वाजेपर्यंत केले आणि आंबेडकरांच्याच निवासस्थानी ते राहिले.

नव्याने आणलेले ग्रंथ…

५ डिसेंबर रोजी आंबेडकर सकाळी आठ वाजता उठले. त्यानंतर नानकचंद रत्तू आंबेडकरांचा निरोप घेऊन आपल्या घरी गेले. पाच डिसेंबरच्या रात्री त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. आंबेडकरांनी त्या रात्री थोडा भात खाल्ला होता. रात्री घरी नव्याने आणलेले ग्रंथ घेऊन बाबासाहेब बसले होते. काही ग्रंथ चाळून त्यांनी ते तसेच टेबलावर ठेवले. डॉ. आंबेडकरांनी रत्तू यांना हळूहळू पाय रगडावयास सांगितले होते. त्यावेळी साधारण रात्रीचे अकरा वाजले असतील. नानकचंद रत्तू हे ४ डिसेंबरपासून घरी गेले नव्हते. बाबासाहेबांचा डोळा लागलेला पाहून ते घरी निघाले होते. पण पुन्हा डॉ. आंबेडकरांनी तुम्हाला बोलावले आहे, असा निरोप रत्तू यांना आला. आंबेडकरांनी रत्तू यांना ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचा उघोद्पात आणि प्रस्तावनेच्या टंकलिखीत प्रती कपाटातून बाहेर काढण्यास सांगितले होते. आंबेडकरांना बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची प्रस्तावना पुन्हा एकदा वाचायची होती.

६ डिसेंबरची काळरात्र

डॉ. आंबेडकरांच्या पत्नी सविता आंबेडकर या ६ डिसेंबरच्या सकाळी नेहमीप्रमाणे उठल्या. सकाळी साडेसहा वाजता त्यांनी आपल्या पतीकडे पाहिले. त्यांना आंबेडकरांचा एक पाय उशीवर टेकलेला दिसला. बागेत चक्कर मारून नेहमीप्रमाणे त्या बाबासाहेबांना उठविण्यास गेल्या. त्यांनी आंबेडकरांना उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. डॉ. आंबेडकरांना मधुमेहामुळे मज्जातंतूचा आजार झाला होता. याच कारणामुळे गेल्या दोन वर्षांपासून त्यांची हृदयक्रिया क्षीण होत चालली होती. ६ डिसेंबर रोजी लाखो लोकांचा नायक, कैवारी या जगाला सोडून गेला होता.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr babasaheb ambedkar death anniversary know what ambedkar did in his last days prd