अरबी समुद्रात गुजरातच्या किनारपट्टीजवळ एका व्यापारी जहाजावर शनिवारी (२३ डिसेंबर २०२३) ड्रोन हल्ला झाला. या हल्ल्याचे पडसाद जागतिक पातळीवर उमटले असून अमेरिकेसारख्या देशाने या हल्ल्याचा निषेध केला आहे. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यापासून २०० नॉटिकल मैल (३७० किमी) अंतरावर हा ड्रोन हल्ला झाला आहे. याच पार्श्वभूमीवर हा हल्ला का झाला? या हल्ल्यानंतर भारताने नेमके काय केले? हे जाणून घेऊ या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर नेमके काय घडले?

‘एमव्ही केम प्लूटो’ असे हल्ला झालेल्या जहाजाचे नाव आहे. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, हल्ला होताच भारताच्या तटरक्षक दलातील विक्रम या जहाजाने घटनास्थळी धाव घेत एमव्ही केम प्लूटो या जहाजाला मुंबईकडे घेऊन येण्याची मोहीम आखली. त्यानंतर हे जहाज मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर २५ डिसेंबर रोजी पोहोचले. एमव्ही केम प्लूटो या जहाजावर लायबेरियाचा ध्वज होता. हे जहाज जपानच्या मालकीचे असून नेदरलँड्स देशाकडून ते चालवले जात होते. सौदी अरेबियातील अल जुबैलपासून १९ डिसेंबर रोजी या जहाजाने आपला प्रवास सुरू केला होता. हे जहाज कच्चे तेल घेऊन कर्नाटकातील मंगळुरू येथे २५ डिसेंबर रोजी पोहोचणार होते. त्याआधीच २३ डिसेंबर रोजी त्याच्यावर ड्रोन हल्ला झाला.

जहाजावर हल्ला का झाला?

या जहाजावर हल्ला का झाला? याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, या जहाजाचा इस्रायलशी संबंध असल्याचा संशय आल्यामुळे हा हल्ला करण्यात आला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ॲमस्टरडॅम येथील एस क्वान्टम केमिकल टँकर्स ही कंपनी काही प्रमाणात इस्रायली अब्जाधीश इदान ओफेर यांच्या मालकीची आहे. ओफेर ही जगातील आठव्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती आहे. हल्ला झालेले जहाज याच कंपनीकडून चालवले जात होते.

अनेक दिवसांपासून व्यापारी जहाजांवर हल्ला

ओफेर यांनी नुकतेच हार्वर्डच्या केनेडी स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या बोर्डाचा राजीनामा दिला आहे. इस्रायलविरोधी आंदोलनाला बोर्डाकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नाहीये, असे कारण देत त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता त्यांच्या या जहाजावर हल्ला करण्यात आला आहे. गाझा पट्टीतील हमास संघटना आणि इस्रायल यांच्यात गेल्या काही दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धादरम्यान पॅलेस्टिनींना पाठिंबा म्हणून येमेनच्या हुथी बंडखोरांकडून व्यापारी जहाजांना लक्ष्य केले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा अनेक जहाजांवर हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे एमव्ही केम प्लूटो या जहाजावर करण्यात आलेला ड्रोन हल्ला, याच कारवाईचा भाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या हल्ल्यामागे कोण आहे?

हा हल्ला झाल्यानंतर अमेरिकेने तीव्र नाराजी व्यक्त केली. इराणनेच हा हल्ला केला आहे, असा थेट आरोप अमेरिकेने केला आहे. अनेक जहाजांवर अशा प्रकारची कारवाई झालेली असताना अमेरिकेने पहिल्यांदाच अशी थेट भूमिका घेतली आहे.

अमेरिकेचे आरोप खोटे- इराण

तर दुसरीकडे अमेरिकेच्या आरोपानंतर इराणनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. इराणने अमेरिकेचे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी गाझामधील होत असलेल्या अत्याचाराला अमेरिकेकडून पाठिंबा दिला जात आहे. हाच पाठिंबा झाकण्यासाठी अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत, असे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नासेर कनानी म्हणाले आहेत.

एमव्ही केम प्लूटो जहाजावर हुथी बंडखोरींनीच हल्ला केला असेल तर या गटाने लक्ष्य केलेले हे सर्वांत दूरचे जहाज असेल.

हुथी बंडखोर कोण आहेत?

हुथी चळवळीला अधिकृतपणे अन्सार अल्लाह म्हटले जाते आणि हुथी ही एक इस्लामिक राजकीय आणि सशस्त्र चळवळ आहे, जी १९९० च्या दशकात उत्तर येमेनमधील सादा येथून उदयास आली. हुथी चळवळ ही मुख्यत्वे झैदी शिया शक्ती आहे, ज्याचे नेतृत्व मुख्यत्वे हुथी टोळी करते. येमेनच्या उत्तरेकडील भागातील शिया मुस्लिमांची ही सर्वांत मोठी आदिवासी संघटना आहे. उत्तर येमेनमध्ये सुन्नी इस्लामच्या सलाफी विचारसरणीच्या विस्ताराला हुथींचा विरोध आहे.

हुथी बंडखोरांना इराणचा पाठिंबा

हुथी बंडखोर आणि येमेन सरकार यांच्यात साधारण दशकभरापासून गृहयुद्ध सुरू आहे. येमेनची अधिकृत राजधानी सानासह उत्तर येमेनमध्ये हुथी बंडखोरांची सत्ता आहे. हुथी हे झैदी सिया आहेत. हुथी बंडखोरांना इराणचा पाठिंबा आहे, तर येमेनचे सरकार हे इराणचे प्रतिस्पर्धी सौदी अरेबिया तसेच पश्चिमेतील देशांना पाठिंबा देते.

हुथी बंडखोरांकडे हजारो सैनिक

हुथी बंडखोर हे इस्रायलचा विरोध करतात, याच कारणामुळे हे बंडखोर पॅलेस्टिनी नागरिकांना पाठिंबा देतात. हुथी बंडखोरांकडे हजारो सैनिक आहेत. तसेच त्यांच्याकडे बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, शस्त्राने सज्ज असलेले ड्रोन्स आहेत.

या हल्ल्याचा अर्थ काय?

इस्रायलकडून गाझामध्ये केल्या जात असलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून जहाजांवरील हल्ल्यांकडे पाहिले जात आहे. गेल्या महिन्यापासून हुथी बंडखोर इस्रायलशी संबंधित असलेल्या जहाजांना लक्ष्य करत आहेत. इस्रायलकडून गाझावर केल्या जात असलेल्या हल्ल्यांमुळेच आम्ही जहाजांना लक्ष्य करत आहोत, अशी हुथी बंडखोरांची भूमिका आहे. गेल्या महिन्यात ‘गॅलेक्सी लीडर’ या व्यापारी जहाजाला हुथी बंडखोरांनी ताब्यात घेतले होते. या कारवाईनंतर हुथी बंडखोरांचे प्रवक्ते मोहम्मद अब्दुल सलमान यांनी प्रतिक्रिया दिली होती. ही तर फक्त सुरुवात आहे. इस्रायलला फक्त बळाचीच भाषा समजते, असे सलमान म्हणाले होते.

जहाजांवरील हल्ले चिंताजनक का आहेत?

जहाजांवर झालेले बहुतांश हल्ले हे तांबड्या समुद्रात झालेले आहेत. २००० किमी लांबीचा हा तांबडा समुद्र सुएझ कालव्याच्या माध्यमातून भूमध्य समुद्र आणि हिंद महासागर यांना जोडतो. या मार्गावर जगातील साधारण १२ टक्के सागरी व्यापार होतो. हल्लेखोरांकडून व्यापारी जहाजांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे या हल्ल्यांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम पडू शकतो.

इंधनाचा खर्च वाढला

सध्या होत असलेले हे हल्ले लक्षात घेऊन AP Moller-Maersk या व्यापारी कंपनीने तसेच तेल आणि वायूच्या व्यापारातील ब्रिटिश पेट्रोलियमसारख्या दिग्गज कंपन्यांनी या मार्गाने व्यापार करणे थांबवले आहे. या कंपन्यांना आपला व्यापार करण्यासाठी लांबच्या मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. परिणामी इंधनाचा खर्च वाढलेला असून मालवाहतुकीसाठी अधिक वेळ लागत आहे.

जगाने काय भूमिका घेतली?

या हल्ल्याचा अमेरिकेने निषेध केला आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी १९ डिसेंबर रोजी हुथी बंडखोरांना रोखण्यासाठी बहुराष्टीय सुरक्षा उपक्रमाची घोषणा केली आहे. यामध्ये अमेरिका, बहरीन, कॅनडा, फ्रान्स, इटली, नेदरलँड्स, नॉर्वे, स्पेन अशा देशांचा समावेश आहे. या देशांकडून समुद्री मार्गावर गस्त घातली जाणार आहे. त्यासाठी नौदलाची जहाजे पाठवली जाणार आहेत. या जहाजांकडून व्यापारी जहाजांना संरक्षण दिले जाणार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drone attack on ship at gujarat coast know what is is hamas and israel war connection prd
Show comments