संदीप नलावडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पश्चिम आशियातील इराण, इस्रायल तसेच युरोप-आशया सीमेवरील तुर्कस्तान या देशांनी आपली सामरिक शक्ती वाढवण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानावर भर देण्यास सुरुवात केली आहे. या तीनही देशांनी आपल्या नौदलाचे बळ वाढवण्यासाठी आता ड्रोन प्रक्षेपण सक्षम युद्धनौका विकसित केल्या आहेत. शत्रुराष्ट्रांच्या युद्धनौकांवर लक्ष ठेवणे, त्यांचे निरीक्षण करणे आणि प्रसंगी हल्ला करण्यास मदत करणे आदी कामे ड्रोनद्वारे केली जात आहेत. या तीनही राष्ट्रांच्या ‘ड्रोन’धारी युद्धनौकांचा आढावा…

ड्रोन प्रक्षेपण युद्धनौका कशा असतात?

सध्या प्रत्येक क्षेत्रात ड्रोनचा वापर वाढू लागला आहे. टेहळणी करण्यापासून छायाचित्रे टिपण्यापर्यंत अनेक कामे ड्रोनद्वारे केली जातात. भविष्यात युद्धभूमीत ड्रोन महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याने अनेक देशांनी ड्रोन तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला आहे. नुकत्याच झालेल्या आर्मेनिया-अझरबैजान युद्धात ड्रोनचा वापर करण्यात आला. अझरबैजानी सैनिकांनी आर्मेनियामधील अनेक ठिकाणांवर ड्रोनद्वारे बॉम्बहल्ले केले. त्यामुळे सामरिक बळ वाढवण्यासाठी ड्रोन भविष्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. याच दृष्टीने इराण, इस्रायल आणि तुर्कस्तान या देशांनी ड्रोन प्रक्षेपण सक्षम युद्धनौका तयार करण्यावर भर दिला आहे. या युद्धनौकेवर ड्रोन प्रक्षेपित करण्याची सुविधा असेल. स्फोटकांनी भरलेले हे ड्रोन शत्रुराष्ट्रांच्या सैन्यावर हल्ला करण्यात उपयुक्त ठरतील.

इराणच्या ‘ड्रोन’धारी युद्धनौका कशा आहेत?

इस्रायली आणि तुर्की युद्धनौकांसारख्या इराणच्या युद्धनौका आधुनिक नसल्या तरी इराणच्या ‘ड्रोन’धारी युद्धनौका खोल समुद्रात विनाश घडवून आणण्यास सक्षम आहेत. जुलै महिन्यात इराणी नौदलाने युद्धनौकेवरून ड्रोन प्रक्षेपित करण्याची चाचणी केली. रशियन बनावटीच्या किलो-क्लास पाणबुड्यांवरून रॉकेट बूस्टरचा वापर करून ‘अबाबिल-२’ आणि ‘आराश’ हे इराणी बनावटीची ड्रोन प्रक्षेपित करण्यात आले. शत्रुराष्ट्रांच्या सैन्यांवर बॉम्बहल्ले करण्याची क्षमता असलेले हे आत्मघाती ड्रोन आहेत. दुसऱ्या महायुद्धात शत्रूच्या लक्ष्यावर आपले स्फोटकांनी भरलेले विमान आदळवून ते उद्ध्वस्त करणाऱ्या जपानी वैमानिकांना कामिकाझे असे म्हटले जाते. इराणच्या या दोनही ड्रोनची क्षमता कामिकाझेसारखीच आहे. इराणच्या नौदलाच्या पहिल्या ड्रोन-वाहक विभागामध्ये जहाजे आणि पाणबुडी युनिट्सचा समावेश आहे. हल्ले करणे, टेहळणी करणे यांसाठी या ड्रोनचा वापर केला जाणार आहे.

विश्लेषण : रशियाच्या उरात धडकी भरवणारा ‘डर्टी बॉम्ब’ नेमका आहे तरी काय?

जुलै २०२१ मध्ये इस्रायली अधिकाऱ्यांनी असा दावा केला की, इस्रायली कंपनीच्या मालकीच्या तेलटँकरवर इराणीनिर्मित अनेक ड्रोनचा वापर करण्यात आला. हा तेलटँकर अरबी समुद्रात ओमानच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर असताना हा हल्ला करण्यात आला, ज्यात दोन खलाशांचा मृत्यू झाला. इराण ड्रोनचा वापर करून अशा प्रकारे हल्ले करत असून ते धोकादायक असल्याचे इस्रायलने म्हटले होते.

इस्रायलची कामिकाझे ड्रोन काय आहेत?

आर्मेनिया-अझरबैजान युद्धात मोठ्या प्रमाणात इस्रायली ड्रोनचा वापर करण्यात आला होता. ही कामिकाझे ड्रोन इस्रायलच्या एल्बिट सिस्टमद्वारे विकसित केली गेली आहेत. २०१७मध्ये इस्रायलने हॅरोप हे कामिकाझे ड्रोन विकसित केले, जे लक्ष्याचा अचून वेध घेते. स्फोटकांनी भरलेला हॅरोप ड्रोन आपल्या लक्ष्याच्या ठिकाणाचे संपूर्ण निरीक्षण करते आणि योग्य वेळी लक्ष्याचा वेध घेते. लक्ष्याच्या ठिकाणी जाऊन स्फोट घडवून आणत असल्याने त्यांना आत्मघाती ड्रोन असेही म्हटले जाते. पाळत ठेवणे आणि हल्ला करणे अशी दोन्हीही कामे हॅरोपद्वारे केले जात असून शत्रूच्या लक्ष्यावर तात्काळ हल्ला करण्याची क्षमता या ड्रोनमध्ये आहे. लक्ष्य शोधणे आणि त्यानंतर क्षेपणास्त्र सोडणे किंवा दुरून लढाऊ विमान वेधणे यापेक्षा ते अधिक सोयीचे आहे. भारताने नुकतेच इस्रायलकडून १०० सामरिक ड्रोन खरेदी करण्यास मंजुरी दिली असून लवकरच इस्रायलकडून त्याचा पुरवठा केला जाणार आहे.

विश्लेषण: पाकिस्तानी पत्रकाराच्या मृत्यूचं गूढ; अर्शद शरीफ नैरोबीत कसे पोहोचले? नेमकं काय आहे प्रकरण?

तुर्कस्तानचे धोकादायक ड्रोन कसे कार्य करतात?

तुर्कस्तानने २०२० मध्ये स्वस्त आणि धोकादायक ‘बायरॅक्टर टीबी २’ ड्रोन विकसित केले. सीरियामध्ये आपली उपयुक्तता दाखवणाऱ्या या ड्रोनमुळे अमेरिका, रशिया आणि ब्रिटननेही त्या वेळी चिंता व्यक्त केली होती. या ड्रोनला चार लेझर क्षेपणास्त्रे बसवली जातात आणि ३२० किलोमीटरवरूनही ते लक्ष्याचा वेध घेते. विशेष म्हणजे तुर्कस्तानच्या या क्षेपणास्त्रांच्या खरेदीची तयारी अनेक देशांनी दाखवली असून त्यात कतार आणि युक्रेन या देशांचाही समावेश आहे. आता तुर्कस्तानने ‘टीबी ३’ ड्रोन विकसित केला असून ‘बायरॅक्टर टीबी २’पेक्षाही तो अधिक धोकादायक असल्याचे बोलले जाते. सहा हार्ड पॉइंटसह विविध युद्धसामग्री वाहून नेण्याची आणि लक्ष्यावर अचूक हल्ला करण्याची क्षमता या नव्या ड्रोनमध्ये आहे. एकेरी आत्मघाती हल्ल्याऐवजी वारंवार वापर करता येणारा हा पहिलाच ड्रोन आहे. जगातील अनेक देश त्यांच्या नौदलासाठी सशस्त्र ड्रोन वापरतात. त्यामुळे अद्वितीय क्षमतेमुळे ‘टीबी ३’ला अधिक प्रसिद्धी मिळत असून त्याची मागणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drones on warships increase demand for iran israel print exp pmw
Show comments