Kalyan’s Durgadi Fort and Its Role in Trade History: सध्या दुर्गाडी किल्ल्याच्या निमित्ताने ‘कल्याण’ बरंच चर्चेत आहे. दुर्गाडी किल्ल्याची जागा ही राज्य शासनाच्या मालकीची असा निर्णय देत कल्याणच्या दिवाणी न्यायालयाने किल्ल्यावरील ‘मजलिस ए मुशावरीन मस्जिद’ या संघटनेचा दावा फेटाळला. त्याच पार्श्वभूमीवर दुर्गाडी किल्ल्याच्या इतिहासावर चर्चेला जोरदार सुरुवात झाली आहे. कल्याणाच्या इतिहासात या किल्ल्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. परंतु इतिहासात डोकावून पाहताना केवळ किल्ल्याचाच नाही तर त्याच्या सभोवतालच्या संपूर्ण परिसराचा आढावा घेणं गरजेचं ठरतं. म्हणूनच सध्या चर्चेत असलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या निमित्ताने कल्याणच्या किमान २००० वर्ष जुन्या इतिहासाचा घेतलेला हा आढावा!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण बंदराचे आर्थिक महत्त्व Kalyan as an Ancient Trade Hub:

कल्याण या शहराला असलेली ऐतिहासिक परंपरा ही भारताच्या आर्थिक इतिहासाशी संबंधित आहे. उल्हास नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे शहर प्राचीन कालखंडात प्रसिद्ध व्यापारी केंद्र होते. उल्हास नदीची खोली तत्कालीन जहाजांना नदीच्या आतपर्यंत येण्याची मुभा देत होती. नदीचा काठ १० ते २० फूट उंच आणि ताशीव होता. कल्याण बंदराची नदीच्या मुखाशी असलेली भौगोलिक स्थिती बंदरासाठी अनुकूल होती. मागील पाणलोट क्षेत्रामुळे जहाजे थेट इच्छितस्थळी नदीच्या आत नेणे सोपे होते. या बंदराचा संबंध थेट नाशिक, जुन्नर, प्रतिष्ठान, तगर आणि उज्जैन यांसारख्या व्यापारी बाजारपेठांशी होता. त्यामुळेच इतिहासात कल्याण या बंदराला आत्यंतिक महत्त्व होते.

अधिक वाचा: Sambhal mosque dispute:संभल विषयीचे ऐतिहासिक संदर्भ काय सांगतात? मंदिर खरंच बाबराने नष्ट केले होते का?

किमान २५०० वर्षांहून जुना कल्याणचा इतिहास

या बंदराच्या इतिहासाची किमान सुरुवात इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकापासून होते. महाराष्ट्राच्या इतिहासात हा कालखंड सातवाहन राजवंशाचा होता. त्यामुळेच कल्याण हे सातवाहन राजवंशाचे महत्त्वाचे बंदर होते. विविध प्रकारच्या व्यापारी मालाची कल्याणच्या बंदरावरून नाणेघाट मार्गे निर्यात होत असे. जुन्नर हे प्राचीन काळात एक प्रसिद्ध व्यापारी केंद्र (ग्रेट एम्पोरियम) होते. सातवाहन काळापासून जुन्नरचा उल्लेख एक समृद्ध बाजारपेठ म्हणून केला जातो. उज्जैन, महिष्मती तसेच दक्षिणेकडील प्रतिष्ठान (पैठण), तगर, कऱ्हाट, कोल्हापूर यांना जोडणारा महत्त्वाचा व्यापारी मार्ग हा कल्याणहून जात होता. नाणेघाट हा प्राचीन काळात एक महत्त्वाचा घाटमार्ग होता. कल्याण बंदराला जुन्नर या आंतरराज्य व्यापारी केंद्राशी तो जोडत असे. नाणेघाट हा घाट मार्ग पश्चिम घाटातला महत्त्वाचा दुवा होता. हा मार्ग समुद्रकिनाऱ्यावरील व्यापारी बंदरांना आणि अंतर्गत भागातील समृद्ध व्यापारी केंद्रांना जोडण्याचे काम करत असे.

जुन्नर-नाणेघाट-कल्याण व्यापारी मार्गाचे महत्त्व Naneghat trade route

जुन्नर-नाणेघाट या घाटमार्गाचा उपयोग प्राचीन काळात व्यापारासाठी केला जात असे. पश्चिम घाटाच्या कड्यावरून नाणेघाटमार्गे जुन्नरपर्यंत पोहोचणे सोपे होते. त्यामुळे व्यापारी, प्रवासी आणि सैन्यदल या मार्गाचा उपयोग करत असत. जुन्नर हे सातवाहन साम्राज्याच्या काळात एक समृद्ध व्यापारी केंद्र तर होतेच परंतु ते त्यांच्या पहिल्या राजधानीचं स्थान असण्याची शक्यताही काही अभ्यासक वर्तवतात. नाणेघाटाच्या शिलालेखांमधूनही सातवाहन काळातील व्यापारी हालचाली, कर प्रणाली आणि धार्मिक विधींविषयी माहिती मिळते. या घाटाच्या भूमिकेमुळेच जुन्नर आणि कल्याणचा व्यापार वाढला, आणि तो भारताच्या व्यापारी इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग ठरला.

कल्याण- ऐतिहासिक बंदर आणि व्यापारी केंद्र

कल्याणचा इतिहास नेमका किती प्राचीन आहे ,याविषयी संशोधन सुरु आहे. कल्याणच्या दुर्गाडी परिसरात पुरावस्तूच्या अवशेषांसारखे इतिहासपूर्व काळातील अवशेष सापडले आहेत. पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी (इसवी सन पहिले शतक) या ग्रीक नोंदीत कोकणातील एक महत्त्वाचे आंतरदेशीय बंदर म्हणून कल्याणचा उल्लेख आहे. इ.स.पू. २ ऱ्या शतकाच्या अखेरीस कल्याण महत्त्वपूर्ण स्थळ म्हणून उदयास आले अशी नोंद सापडते. पेरिप्लस मधील माहिती ही कल्याणचे समकालीन महत्त्व सिद्ध करणारे आहे. या स्थळाची प्राचीनचा किमान सातवाहन काळापर्यंत तरी मागे जाते.

कान्हेरी, नाशिक आणि जुन्नर येथील मोठ्या संख्येने असलेल्या शिलालेखांमुळे या प्राचीन शहराच्या महत्त्वाला अधिक बळकटी मिळते. कान्हेरी शिलालेखांमध्ये कल्याणसाठी ‘कलियान’ आणि ‘कलियन’ असे उल्लेख सापडतात. कल्याण हे बंदर सातवाहन काळापासून सक्रिय होते, त्यामुळेच क्षत्रपांनीही या बंदरावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. कल्याण एक समृद्ध व्यापारी केंद्र होते. विविध व्यापारी समुदाय येथे वास्तव्य करत होते. ज्याचा पुरावा शिलालेखांमध्ये आढळतो. इ.स. ६ व्या शतकातील कॉसमॉसमध्ये (इ.स. ५३५) कल्याणचा उल्लेख पाच प्रमुख व्यापारी केंद्रांपैकी एक म्हणून केला आहे. जिथे तांबे, काळ्या लाकडाचे ओंडके आणि वस्त्रव्यवसायाचा मोठा व्यापार होत असे अशीही नोंद सापडते.

कल्याण बौद्ध विहाराचे स्थान Buddhist Influence in Kalyan:

कल्याणमधील अंबालिका बौद्ध विहाराचा उल्लेख विविध शिलालेखांमध्ये वारंवार सापडतो. अंबालिका विहाराची ओळख कल्याणच्या पूर्वेला काही अंतरावर असलेल्या आंबीवले या गावाबरोबर पटविण्यात आली आहे. प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ डॉ. शोभना गोखले यांच्या मते कल्याणला सातत्याने भेट देणाऱ्या व्यापाऱ्यांचा या विहाराला आश्रय असणे साहजिक आहे. येथील बौद्ध भिक्षु आणि भिक्षुणींचे संदर्भ आपल्याला शिलालेखांमध्ये सापडतात. याशिवाय कान्हेरीच्या गुंफा क्रमांक २१ मध्ये व्यापाऱ्यांनी दिलेल्या दानाचा उल्लेख आहे. त्यामुळे कल्याण हे प्रारंभिक ऐतिहासिक काळापासून व्यापाऱ्यांचे निवासस्थान असलेले एक महत्त्वाचे ठिकाण होते हे लक्षात येते.

अधिक वाचा: Fossilized Dinosaur Dung: डायनासोरची विष्टा आणि उलटी सांगतेय त्याच्या अस्तित्त्वाची कथा; नवीन संशोधनाने ज्युरासिक कालखंडाचे कोणते रहस्य उलगडले?

शिलालेखांतील संदर्भ

कान्हेरी येथील गुंफा क्रमांक ३६ मधील दोन शिलालेखांमध्ये स्वतःची ओळख विष्णूनंदीचा पुत्र म्हणून करणाऱ्या कल्याणच्या व्यापाऱ्याची नोंद आहे. त्याच लेणीमधील दुसऱ्या शिलालेखात स्वामीदत्त या कल्याणाच्या व्यापाऱ्याने दिलेल्या दानाची नोंद आहे. धम्म या कल्याणच्या व्यापाऱ्याने कान्हेरी येथील १२ क्रमांकाच्या लेण्यातील शिलालेखात आपल्या देणगीची नोंद केली आहे. कान्हेरीलाच नंद या लोखंडाच्या व्यावसायिकाने १४ आणि १५ क्रमांकाच्या लेणींमध्ये भिंतींवर देणगी कोरवली आहे. याशिवायही अनेक शिलालेखांमधून कल्याणच्या व्यापाऱ्यांनी दिलेल्या दानाचे संदर्भ सापडतात.

कल्याण हे बंदर सातवाहनांच्या आधीपासूनच वापरात होते. सातवाहनांच्या कालखंडात या बंदराला आर्थिक महत्त्व प्राप्त झाले. कॉसमॉसने सहाव्या शतकात कल्याणला भेट दिली होती. तो येथील एका बलशाली राजाचा उल्लेख करतो. हा राजा कोण असावा याविषयी अभ्यासकांमध्ये एकमत नाही. तरी हा राजा कोकण मौर्य घराण्यातील असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. कान्हेरीच्या शिलालेखांमध्ये गंधारिकाभूमी असा उल्लेख आढळतो. हा भागाची ओळख कल्याणमधील गांधारी या भागाशी केली जाते. मध्ययुगीन अनेक मुस्लिम प्रवाशांच्या नोंदीमध्ये कल्याणचा उल्लेख आढळतो. असे असले तरी इ.स. १५३६ मध्ये पोर्तुगीजांनी कल्याण काबीज केले. तर इ.स. १६३६ मध्ये कल्याण बिजापूरच्या आधिपत्याखाली गेले. इ.स. १६४८ मध्ये ते मराठ्यांच्या ताब्यात आले. शेवटी, १८व्या शतकात कल्याण ब्रिटिश साम्राज्याचा भाग झाले. कल्याणला अशाप्रकारे सुमारे दोन हजारांहून अधिक वर्षांचा समृद्ध इतिहास आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Durgadi fort kalyan 2000 years history svs