“काश्मीरचा वाद म्हणजे जीवनाच्या दोन मार्गांचा, राजकीय संघटनेच्या दोन संकल्पनाचा, मूल्यांच्या दोन तराजूंचा, दोन आध्यात्मिक वृत्तींचा बिनधास्त आणि कदाचित तडजोड न करता येणारा संघर्ष आहे, प्राणघातक संघर्ष आहे.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

असे वर्णन जेष्ठ राजकीय विचारवंत जोसेफ कोरबेल यांनी १९५४ साली प्रकाशित केलेल्या ‘डेंजर इन काश्मीर’ या त्यांच्या पुस्तकात सापडते. १९४० च्या दशकापासून काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या संकटाची गुंतागुंत अगदी अचूकपणे त्यांनी या पुस्तकात टिपली आहे. इंग्रजांनी भारत आणि पाकिस्तानच्या विभाजित प्रदेशांवर सत्ता सोपावण्याचा निर्णय जाहीर केला त्यावेळी ५०० हून अधिक संस्थानांचे भवितव्य ठरायचे होते. तरीही या सर्व संस्थांपैकी जम्मू-काश्मीर हे महत्त्वाचे होते. प्रादेशिकदृष्ट्या सर्व राज्यांमध्ये सर्वात मोठे काश्मीर हे नव्याने निर्माण झालेल्या राष्ट्राच्या केंद्रस्थानी होते. १५ ऑगस्ट १९४७ नंतर या प्रदेशाचे भौगोलिक महत्त्व अनेक पटींनी वाढले. या नंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या परराष्ट्रीय धोरणांमध्ये काश्मीरला महत्त्व प्राप्त झाले. हा प्रदेश दोन देशांमधील युद्धाला कारणीभूत ठरला. दोन्ही राष्ट्रांमधील संबंधांचा निर्णय घेणारा हा सर्वात निर्णायक घटक आहे.

राजा हरी सिंग

इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी त्यांच्या ‘इंडिया आफ्टर गांधी’ या पुस्तकात म्हटले आहे की, “मुस्लिम बहुसंख्य लोकसंख्येवर राज्य करणारे हिंदू अशी विसंगती अपघाताने आढळते.” १९४७ मध्ये काश्मीरचा कारभार राजा हरी सिंग यांच्या हातात होता. १९२५ मध्ये राज्य त्यांच्या हातात आले होते, या कालावधीत रेसकोर्स आणि शिकार करण्यात त्यांनी बराच वेळ घालविला. हरी सिंग यांचा मुलगा आणि प्रसिद्ध राजकारणी करण सिंग यांनी त्यांच्या आत्मचरित्रात हरी सिंग विरुद्ध त्यांच्या आईची तक्रार नोंदवली आहे: त्यांच्या आईच्या तक्रारीनुसार “ते फक्त दरबारी आणि आवडत्या लोकांनी वेढलेल्या लोकांसोबत असत आणि बाहेर काय चालले आहे हे त्यांना कधीच कळत नसे”

आणखी वाचा: स्वातंत्र्य दिन विशेष: कुठे गेले होते स्वतंत्र भारतात स्त्रियांना देण्यात येणारे ‘स्वातंत्र्य’?

मोहम्मद अब्दुल्ला

१९४० च्या दशकात, शेख मोहम्मद अब्दुल्ला, हे हरी सिंग यांचे दीर्घकालीन टीकाकार होते, ज्यांनी काश्मीरमधील राजकीय वर्तुळावर वर्चस्व गाजवले. उच्च शिक्षित आणि तरीही बेरोजगार अब्दुल्ला यांनी काश्मीरच्या डोग्रा राजवटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “मुस्लिमांसोबत होणारी गैरवर्तणूक हा धार्मिक पूर्वग्रहाचा परिणाम होता,” असे त्यांनी म्हटले होते. १९३० च्या दशकात, अब्दुल्ला अनुयायांच्या मोठ्या गटाला एकत्र करत होते आणि त्यानंतर त्यांनी हिंदू, मुस्लिम आणि शीख यांचा समावेश असलेल्या ‘नॅशनल कॉन्फरन्स’ची स्थापना केली आणि काश्मीरमध्ये प्रातिनिधिक सरकारची मागणी केली. त्याच वेळी, त्यांची जवाहरलाल नेहरू आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) यांच्याशी जवळीक वाढली. १९४० च्या दशकात अब्दुल्ला यांची लोकप्रियता जसजशी वाढत गेली, तसतशी सिंग यांच्याशी असलेली त्यांच्या त्यांच्या आत्मचरित्रात, नात्यातील कटुताही वाढत गेली. ते डोग्रा घराण्याला ‘काश्मीर सोडा’ असे सांगत असताना, राज्याच्या राजाने त्यांना एकापेक्षा अधिक वेळा तुरुंगात टाकले.

१९४० आणि काश्मीर वादाची ठिणगी

करण सिंग यांनी त्यांच्या आत्मचरित्रात असे नमूद केले आहे की, १९४४ च्या आसपास कधीतरी स्वामी संत देव नावाच्या एका धार्मिक व्यक्तीचा डोग्रा राजाच्या घराण्याशी जवळचा संबंध आला होता. “मला वाटते की माझ्या वडिलांच्या वैयक्तिक जीवनावर त्यांचा प्रभाव चांगलाच होता. त्यांनी त्यांना धूम्रपान आणि मद्यपान कमी करण्यास सांगितले. असे असले तरी राजकारणाच्या क्षेत्रात मात्र स्वामीजींचा प्रभाव विनाशकारी ठरला. महत्त्वाकांक्षेवरच स्वामीजी चपळपणे खेळले, त्यांनी वडिलांच्या मनात लाहोरपर्यंत राज्य विस्तार करण्याची इच्छा निर्माण केली. हरी सिंह यांचे स्वतंत्र काश्मीरचे स्वप्न त्यांचे पंतप्रधान रामचंद्र काक यांनी पुढे आणले. सिंग ज्या वेळेस स्वतंत्र काश्मीरचे स्वप्न पाहत होते त्या वेळेस अब्दुल्ला हे काश्मिरी तरुणांशी आणि नेहरूंसोबतचे संबंध अधिक घट्ट करत होते. जेव्हा सिंग यांनी अब्दुल्लाला तुरुंगात टाकले तेव्हा नेहरू त्यांच्या बचावासाठी धावून आले, त्यांना महाराजांच्या माणसांनी प्रवेश करण्यापासून रोखले आणि अब्दुल्ला यांना अटक केली. सिंग लिहितात, “त्यांची अटक राज्याच्या इतिहासातला टर्निंग पॉइंट होता यात मला शंका नाही.

लॉर्ड माऊंटबॅटन यांची भूमिका

एप्रिल १९४७ मध्ये लॉर्ड माऊंटबॅटन यांनी ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय म्हणून पदभार स्वीकारला. ते महाराजा हरी सिंह यांचे जुने परिचित होते,” त्यावर इतिहासकार रामचंद्र गुहा लिहितात,“१९४७ मध्ये जूनच्या तिसऱ्या आठवड्यात, भारताचे विभाजन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, लॉर्ड माऊंटबॅटन हे काश्मीरला रवाना झाले.” माऊंटबॅटन यांच्या काश्मीर भेटीचा विशिष्ट राजकीय हेतू होता. “माऊंटबॅटन, खरेतर, १५ ऑगस्टपूर्वी माझ्या वडिलांचे मन वळवायला आले होते आणि त्यांनी भारतीय नेत्यांकडून असे आश्वासन घेतले होते की ते त्यांना योग्य तो निर्णय योग्य त्या पद्धतीने घेण्यास आक्षेप घेणार नाहीत. अगदी त्यांना जरी त्यांना पाकिस्तानत सामील व्हायचे असले तरी …” श्रीनगरमध्ये, जेव्हा माऊंटबॅटन यांनी काश्मीरच्या निर्णयाबद्दल विचारले तेव्हा पंतप्रधान काक यांनी त्वरित उत्तर दिले की, त्यांना स्वतंत्र राहायचे आहे. त्यानंतर व्हाईसरॉय यांनी महाराजांची भेट निश्चित केली. “ठरलेल्या दिवशी, माऊंटबॅटन यांच्या भेटीच्या शेवटच्या दिवशी, हरी सिंह पोटशूळच्या झटक्याने अंथरुणावर पडून राहिले, हा विकार कदाचित एक अप्रिय चकमक होऊ नये म्हणून एक चाल असावी,” असे गुहा लिहितात.

“कठीण परिस्थितीला सामोरे जाणे टाळणे ही एक सामान्य सरंजामशाही प्रतिक्रिया आहे आणि माझे वडील विशेषतः याचा अवलंब करण्यास प्रवृत्त होते,” करण सिंग यांनी माऊंटबॅटनशी भेट टाळण्याच्या त्यांच्या वडिलांच्या निर्णयाबद्दल लिहिले आहे. “अशा प्रकारे व्यवहार्य राजकीय तोडगा काढण्याची शेवटची खरी संधी गमावली, त्यांनी गमावली,” असेही ते नमूद करतात.

आणखी वाचा: तृतीयपंथीयांचे संदर्भ सांगणाऱ्या पौराणिक कथा !

१५ ऑगस्ट १९४७

१५ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरने भारत किंवा पाकिस्तान कुठएही सामील होण्याचा निर्णय घेतलेला नव्हता. “ पाकिस्तानात सामील होण्याचा निर्णय घेतला असता तर त्या वेळी संपूर्ण उत्तर भारतात पसरलेल्या जातीय उन्मादाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील हिंदू क्षेत्रे अक्षरशः नष्ट झाली असती,” असे सांगून सिंग पुढे लिहितात. “दुसरीकडे, त्यांनी यापूर्वी भारतात प्रवेश केला असता तर आपल्या मुस्लिम प्रजेच्या मोठ्या वर्गापासून दूर जाण्याचा धोका त्यांना पत्करावा लागला असता”. या अनिश्चिततेच्या वातावरणात काश्मीरमध्ये स्वातंत्र्याचा उत्सव साजरा होणे, क्वचितच घडणारे होते. “स्वातंत्र्यदिनी काश्मीरमध्ये अंधारच होता. सचिवालयात फक्त शेख अब्दुल्ला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. त्यांच्याशिवाय, इतर कोणीही त्यांच्या घरातून बाहेर पडू शकत नव्हते,” असे काश्मिरी कवी झरीफ अहमद झरीफ म्हणतात, १५ ऑगस्ट १९४७ रोजी ते केवळ दहा वर्षांचे होते.

काश्मीर पोरके झाले

दोन महिन्यांनंतर, २२ ऑक्टोबर रोजी, हजारो सशस्त्र लोकांचे सैन्य राज्यात दाखल झाले. हल्लेखोरांपैकी बहुतेक पाकिस्तानच्या प्रांतातील पठाण होते. मात्र, ते कसे आले आणि त्यांना पाठिंबा कसा दिला, कुणी दिला याबाबत अद्यापही वाद आहे. हल्लेखोरांनी लवकरच काश्मीरचा काही भाग ताब्यात घेतला. या आक्रमणामुळे काश्मीर राज्याच्या सामाजिक एकात्मतेला जबर धक्का बसला. याचा उल्लेख करताना करण सिंग लिहितात, “हल्लाखोर सीमेपलीकडून आत येत होते, लुटालूट करत होते, बलात्कार करत होते,” राजा हरी सिंह यांनी आपल्या कुटुंबासह लवकरच जम्मूमध्ये आश्रय घेण्यासाठी श्रीनगर येथील त्यांचे निवासस्थान सोडले. “दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ते जम्मूला पोहचले आणि राजवाड्यात आले त्यावेळेस त्यांनी एकच वाक्य उच्चारले ते म्हणजे ‘आम्ही काश्मीर गमावले आहे!’

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: During the first day of independence day of india what happend in kashmir svs