पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान पार पडले. या निवडणुकीत सुमारे १२ कोटी लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. या पार्श्वभूमीवर देशभरात सुमारे ६,५०,००० सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. या निवडणुकीत कोण विजयी होणार याकडे पाकिस्तानातील नागरिकांसह संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
नवाज शरीफ यांचा पाकिस्तानी मुस्लिम लीग पक्ष आणि बिलावल भुट्टो यांचा पाकिस्तान पीपल्स पार्टी यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. पाकिस्तानात लाहोरपासून सिंधपर्यंत घराणेशाहीने वर्चस्व गाजवले आहे. पाकिस्तानातील घराणेशाहीच्या राजकारणावर एक नजर टाकूया.
पाकिस्तानातलं घराणेशाहीचं राजकारण
पाकिस्तानमधील राजकीय सत्ता गेल्या काही वर्षांपासून काही निवडक कुटुंबांच्याच हातात आहे. पाकिस्तानातील दोन मुख्य घराणी म्हणजे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे कुटुंब आणि ज्यांनी दक्षिण सिंध प्रांतावर अनेक दशके राज्य केले ते भुट्टो कुटुंब, असे ‘अरब न्यूज’ने नमूद केले आहे. घराणेशाहीचे राजकारण असलेले हे दोन कुटुंब आमने-सामने पाहायला मिळणार आहेत. या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये नवाझ शरीफ आणि भुट्टो घराण्याचे वंशज बिलावल भुट्टो-झरदारी हे दोघेही पंतप्रधानपदासाठी इच्छुक आहेत.
२०१८ मध्ये क्रिकेटपटू-राजकारणी असलेले इम्रान खान २०२२ मध्ये सत्तेत आले होते. ज्याच्या काही काळानंतर अविश्वास ठरावातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. कॅनडातील फ्रेझर व्हॅली विद्यापीठातील समाजशास्त्रज्ञ डॉ. हसन जाविद यांच्या संशोधनानुसार, पंजाबमधील २०१८ च्या निवडणुकीत इम्रान खान यांचे ८० टक्के विजयी उमेदवार हे वंशवादी कुटुंबातील होते. तुरुंगात असलेल्या आणि या निवडणुका लढवण्यास बंदी असलेल्या इम्रान खान यांना तरुण मतदारांनी पाकिस्तानातील राजकीय घराणेशाहीला पर्याय म्हणून पाहिले होते.
नवाझ शरीफ पुन्हा एकदा पंतप्रधान ठरतील अशी शक्यता पाकिस्तानातील माध्यमांकडून वर्तवण्यात येत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना लष्कराकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. नवाझ शरीफ पंजाबमधील श्रीमंत व्यापारी कुटुंबातील आहेत. लाहोर आणि मानसेरा येथून ते निवडणूक लढवत आहेत. त्यांचे भाऊ माजी पंतप्रधान शहबाज शरीफ हे लाहोर आणि कसूरमधून निवडणूक लढवत आहेत. नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांना त्यांचा पुतण्या हमजा शाहबाज शरीफ यांच्यासह लाहोरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुट्टो आणि पाकिस्तानचे माजी अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांचे पुत्र बिलावल भुट्टो झरदारी हे सिंध आणि पंजाबमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांचा पक्ष पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) २००८ पासून सलग तीनदा या जागेवर निवडून आला आहे. यावेळी पीपीपीने प्रांतातील राष्ट्रीय आणि प्रांतीय विधानसभा निवडणुकांसाठी १९१ उमेदवार उभे केले आहेत. यापैकी बहुतेक उमेदवार सिंधमधील १२ प्रमुख राजकीय घराण्यातील आहेत, अशी बातमी ‘अरब न्यूज’ने दिली आहे. पीपीपीचे सह-अध्यक्ष आसिफ अली झरदारीही निवडणुकीच्या शर्यतीत आहेत. त्यांच्यासह बहिणी – शहीद बेनझीराबाद आणि फरयाल तालपूर यांनाही तिकीट देण्यात आले आहे.
खैबर पख्तूनख्वा प्रदेशात गफ्फार खानच्या कुटुंबाचा दबदबा आहे. त्यांचा मुलगा खान अब्दुल वली खान आणि नातू अस्फंदयार वली या क्षेत्रात प्रमुख भूमिका बजावत आहेत, असे ‘बीएनएन ब्रेकिंग’ने नमूद केले. मौलाना मुफ्ती मेहमूद यांचे कुटुंब, अट्टकचे खट्टर कुटुंब, बलुचिस्तानचे मेंगाल, बुगती आणि चौधरी हे पाकिस्तानातील काही महत्त्वाची कुटुंबं आहेत, ज्यांचा आपापल्या प्रदेशात दबदबा आहे.
देशातील सर्वात मोठा प्रांत बलुचिस्तान अनेक दशकांपासून कुटुंबे किंवा जमातींद्वारे शासित आहे. या प्रांतातून सार्वत्रिक निवडणूक लढवणाऱ्या ४४२ उमेदवारांपैकी बहुतांश आदिवासी आणि राजकीय पार्श्वभूमी असलेले उमेदवार आहेत, असे ‘अरब न्यूज’ने संगितले आहे.
पाकिस्तानात घराणेशाहीचे राजकारण का फोफावत आहे?
राजकीय पक्षांमधील लोकशाही व्यवस्थेच्या अभावामुळे पाकिस्तानमध्ये घराणेशाहीचे राजकारण फोफावत असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. पत्रकार फाजील जमिलीच्या मते, निवडणुकीच्या राजकारणावर केवळ काही घराणेशाहीचे वर्चस्व असल्याने, अधिक सक्षम आणि जनतेची चांगली सेवा करू इच्छिणार्या राजकीय पक्षांच्या समर्थकांना फारसे स्थान नाही. यामुळे येथील जनता सामन्यांच्या प्रश्नांची जाण नसणार्या श्रीमंत लोकांवर अवलंबून राहते,” असे जमिलीने ‘अरब न्यूज’ला सांगितले.
पत्रकार आणि राजकीय विश्लेषक शाहजेब जिलानी यांनी अरब न्यूजला सांगितले की, दक्षिण आशियातील बहुतांश भागात घराणेशाहीचे राजकारण अस्तित्वात आहे. “पाकिस्तानातही घराणेशाहीचे राजकारण आहे. सिंधमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. कारण इथे एकच पक्ष गेली १५ वर्षे प्रांत चालवत आहे.” ते म्हणाले की, पाकिस्तानमध्ये लोकशाही व्यवस्थेच्या अभावामुळे राजकीय आणि आर्थिक वर्चस्व असलेल्या, मोठी व्होट बँक असलेल्या उमेदवारांवर राजकीय पक्ष अवलंबून आहेत.
हेही वाचा : विश्लेषण: मुख्य निवडणूक आयुक्त निवडण्याची नवीन प्रक्रिया काय आहे? प्रक्रियेत बदल करण्यामागील नेमके कारण काय?
पाकिस्तानच्या लष्कराची भूमिकाही इथे महत्त्वाची आहे. “पाकिस्तानातून घराणेशाहीच्या राजकारणाला आळा घालण्यासाठी आस्थापनेचा राजकीय हस्तक्षेप संपला पाहिजे. बलुचिस्तानच्या आदिवासी समाजासह येथील सिंध आणि पंजाब प्रांतातील लोकांवर राज्य करणारे घराणे जातीय राजकारणावर अवलंबून आहेत, ” असे डॉ. जाविद यांनी ‘अरब न्यूज’ला सांगितले. जिलानी यांच्या म्हणण्यानुसार, “गेल्या ७५ वर्षांत आम्हाला लोकशाही म्हणून काम करण्याची परवानगी नाही. आमच्याकडे हुकूमशाही होती. यामुळेच घराणेशाहीचे राजकारण खोलवर रुजले आहे.”