रशियातील सायबेरियामध्ये एक महाकाय खड्डा आहे. त्याला ‘गेटवे टू हेल’ म्हणजेच नरकाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. या खोल खड्ड्याचा आकार दिवसेंदिवस लक्षणीयरीत्या वाढत चालला आहे आणि त्यामुळे शास्त्रज्ञही चिंतेत आहेत. हा हवामान बदलाच्या धोकादायक परिणामांचा इशारा असल्याचे सांगण्यात येत आहे. हा रहस्यमयी खड्डा काय आहे? या खड्ड्याचा आकार वाढण्याचे मूळ कारण काय? हा पृथ्वीसाठी धोक्याचा इशारा आहे का? याविषयी जाणून घेऊ.
नरकाचे प्रवेशद्वार
सायबेरियाच्या याना हायलँड्स या गोठलेल्या प्रदेशात हा २०० एकर रुंद आणि ३०० फूट खोल खड्डा आहे. ‘एनडीटीव्ही’नुसार याला ‘बटागायका क्रेटर’, असेही म्हणतात. या खड्ड्याचा आकार घोड्याची नाल किंवा खेकड्यासारखा दिसतो. या खड्ड्याला बटागे म्हणूनही ओळखले जाते. हे पृथ्वीवरील दुसरे सर्वांत जुने ‘पर्माफ्रॉस्ट’ (कायमस्वरूपी गोठलेली जमीन) आहे. ‘विओन न्यूज’च्या म्हणण्यानुसार सुमारे २.५८ दशलक्ष वर्षांपूर्वी हिमयुगात जेव्हा ही जमीन पूर्णपणे गोठली तेव्हा तिथे केवळ एक लहान भेग होती.

हेही वाचा : प्रकाशाच्या प्रदूषणाचा मानवजातीला धोका; रात्रीच्या रोषणाईने होतोय स्मृतिभ्रंश, कारण काय?
त्यानंतर १९६० च्या दशकात मिळालेल्या उपग्रह छायाचित्रांमध्ये ही बाब फारच स्पष्टपणे दिसत होती. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे बटागायका खड्डा हा एक ‘रेस्ट्रोग्रेसिव्ह थॉ मेगास्लिंप’ आहे, जो पर्माफ्रॉस्ट विरघळतो तेव्हा उद्भवतो. रशियातील याकुतिया येथे जेव्हा लोकांनी सुरुवातीला बटागेला पाहिले तेव्हा त्यांनी तेथून येणारे भयानक आवाज ऐकले. या खड्ड्यातून त्यांना स्फोटाचे आवाज येत होते. ‘विओन’च्या वृत्तानुसार १९६० च्या दशकात जंगलतोड केल्यामुळे सूर्यप्रकाश थेट खड्ड्यात प्रवेश करू लागला आणि खालील जमीन उबदार होऊ लागली.
खड्डावाढीला हवामानातील बदल कारणीभूत
हा खोल खड्डा अपेक्षेपेक्षा लवकर विस्तारत असल्याचे निदर्शनास आले आहे आणि तो मोठा होण्याला हवामानातील बदल कारणीभूत आहे. हा खड्डा इतका मोठा झाला आहे की, तो अंतराळातून थेट पाहता येतो. ‘मनी कंट्रोल’नुसार, वॉशिंग्टन विद्यापीठाचे भूभौतिकशास्त्रज्ञ रॉजर मायकेलाइड्स यांनी पर्माफ्रॉस्टचा अभ्यास करण्याची ही एक संधी असल्याचे सांगितले आहे, जे बहुतेक वेळा पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली असतात.

त्यांनी ‘बिझनेस इनसाइडर’ला सांगितले, “बहुतांशी भूगर्भातील पर्माफ्रॉस्टला ते उघड झाल्याशिवाय पाहू शकत नाही. त्यामुळे त्याचा अभ्यास करण्याची ही एक संधी आहे.” त्यांनी पुढे सांगितले, “मला वाटते की बटागायकामुळे आपल्याला बरीच माहिती मिळू शकते. बटागायका काळाबरोबर कसा विकसित होईल हे समजून घेण्याबरोबरच त्यातून आर्क्टिक महासागरामध्ये समान वैशिष्ट्ये कशी विकसित होऊ शकतात हेदेखील कळेल.”
पर्माफ्रॉस्टही वितळण्याच्या मार्गावर
या वर्षाच्या सुरुवातीला प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, खड्डा खोलवर वाढत आहे. कारण- पर्माफ्रॉस्टचे वितळणे जवळजवळ तळाशी पोहोचले आहे. ‘न्यू यॉर्क पोस्ट’नुसार हिमनद्या शास्त्रज्ञ अलेक्झांडर किझियाकोक यांनी अभ्यासात लिहिले आहे, “रेट्रोग्रेसिव्ह थॉ स्लम्प (RTS)चा आकार दरवर्षी अंदाजे एक दशलक्ष घनमीटरने वाढत आहे.“

भविष्यातील धोके
या खड्ड्यापासून जवळच असलेली लगतची बटागे नदी जलद वितळल्यामुळे समस्या निर्माण होणार आहेत. संशोधकांनी सावधगिरीचा इशारा देताना स्पष्ट केले आहे की, यामुळे नदीकाठची धूप आणखी वाढेल आणि आसपासच्या पर्यावरणावर त्याचा परिणाम होईल. क्रेटरचा वेगवान विस्तार हरितगृह वायूचे उत्सर्जन वाढण्याची शक्यतादेखील वाढवतो, असे संशोधकांनी सांगितले. कारण- वितळलेला सेंद्रिय कर्ब (ऑरगॅनिक कार्बन) वातावरणात सोडला जातो. त्यांचा अंदाज आहे की, चार ते पाच हजार टन सेंद्रिय कर्ब सध्या दरवर्षी सोडला जातो. दरवर्षी ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : शनी ग्रहाच्या विलोभनीय कडा मार्च २०२५ मध्ये होणार अदृश्य? कारण काय?
एनडीटीव्हीनुसार, काही शास्त्रज्ञांनी असा इशाराही दिला आहे की. हा खड्डा बहुतेक जमीन व्यापू शकतो आणि जवळपासच्या गावांसाठी तो धोकादायक ठरू शकतो. यायत्स्क येथील मेलनिकोव्ह पर्माफ्रॉस्ट इन्स्टिट्यूटमधील संशोधक निकिता तानानाएव यांनी सांगितले की, विवरातून गळती झाल्यामुळे जवळच्या परिसंस्था कायमस्वरूपी बदलत आहेत. “यामुळे नदीच्या अधिवासात लक्षणीय बदल घडतील. ही या परिसरातील प्रमुख नदी आहे,” असे त्यांचे म्हणणे आहे.