लोकसभा निवडणुकीचे ढोल-ताशे वाजू लागले आहेत. लोकशाहीचा हा उत्सव अधिक पारदर्शी व्हावा आणि लोकशाही मूल्य अधिक रुजावे म्हणून मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शी करण्यासाठी निवडणूक आयोगाने विविध प्रकारची उपयोजने (ॲप) विकसित केली आहेत. यामध्ये ‘सी- व्हिजिल’, ‘केवायसी-नो युअर कॅन्डिडेट’, ‘सक्षम’, ‘एनकोअर’, ‘व्होटर टर्नआऊट’, ‘व्होटर हेल्पलाइन’ अशी अनेक ॲप निवडणुकीतील विविध प्रक्रियेत क्षणोक्षणी काय घडते आहे त्याची माहिती देणारी आहेत.
‘सी-व्हिजिल’ ॲप म्हणजे काय?
नागरिकांना ‘सी-व्हिजिल’ ॲप कोणत्याही भ्रमणध्वनीवरील ‘प्ले स्टोअर’मधून घेता येऊ शकेल. या ॲपला शुद्ध मराठीत ‘दक्ष नागरिक’ असे म्हणता येईल. निवडणूक प्रक्रियेवर या ॲपच्या आधारे मतदारांना लक्ष ठेवता येते. निवडणुकीची आचारसंहिता अमलात आली की, तिचे पालन करणारी दोन पथके स्थापन होतात आणि कार्यरत केली जातात. त्यात काही फिरती पथके आणि अनेक ठिकाणी पोलीस आणि महसूल तसेच विविध विभागातील कर्मचाऱ्यांची स्थायी पथके नियुक्त केली जातात. निवडणुकीच्या काळात कोणी आचारसंहिता भंग करत असेल तर त्याची तक्रार अगदी छायाचित्रासह या ‘सी-व्हिजिल’ ॲपमधून करता येऊ शकते. मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी कोणी पैसे वाटत असेल किंवा मद्य देत असेल किंवा मौल्यवान वस्तूची अवैध वाहतूक होत असेल तर या ॲपच्या आधारे आता काेणालाही तक्रार करता येईल. केलेल्या तक्रारीचा निपटारा करणाऱ्या विविध यंत्रणाही या ॲपला जोडण्यात आलेल्या आहेत. करण्यात आलेली तक्रार आणि जवळ असणारी यंत्रणा याचा समन्वय साधून तक्रारीची तपासणी लगेच करणे निवडणूक अधिकाऱ्यांना सोपे होईल असा दावा केला जात आहे. याशिवाय पैसा, मद्य, सोने-चांदी किंवा अन्य धातूची अवैध वाहतूक होत असल्यास त्याचा पाठपुरावा करणे या ॲपमुळे सोपे जाणार आहे. हे दक्षता ॲप नागरिकांसाठी वेगळे आणि यंत्रणांंसाठी वेगळे अशा प्रकारे काम करेल, असे निवडणूक अधिकारी सांगतात.
‘नो-युवर कॅन्डिडेट’ हे ॲप कसे उपयोगी पडेल ?
निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते उमेदवाराची इत्थंभूत माहिती या ॲपमध्ये उपलब्ध होऊ शकणार आहे. या ॲपनुसार उमेदवारांनी दिलेली संपत्तीविषयक शपथपत्रे, उमेदवारांनी प्रचारादरम्यान केलेला खर्च आदी माहिती या ॲपमधून मिळू शकते. उमेदवाराबाबतची माहिती लोकांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी या ॲपचा उपयोग होईल, असे सांगण्यात येत आहे.
‘सक्षम’ ॲपमध्ये नक्की काय ?
हे ॲप विकलांग व्यक्तींसाठी उपयोगाचे आहे. विकलांग मतदारास त्याचे मतदार यादीतील नाव शोधण्यापासून ते त्याला मतदान करण्यासाठी उपयोग होईल अशा अनेक सुविधा या ॲपमध्ये देण्यात आल्या आहेत. अंध व्यक्तींना आवाजाच्या आधारे मदत करणारी सुविधा यामध्ये आहे. निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यापासून येणाऱ्या अडथळ्यांबाबत तक्रार करण्याचीही सुविधा या ॲपमध्ये आहे. आवाजाच्या आधारे टंकलेखनाची सोयही यात असून अंध व्यक्तींशिवाय इतर विकलांग व्यक्तींना विविध सोयी यात आहेत. मतदान केंद्रे कोठे आहेत, विकलांग मतदार जेथे आहेत त्यापासून मतदान केंद्र किती दूर आहे तिथपर्यंत जाण्यासाठी मार्गदर्शक सूचनाही यात आहेत.
हेही वाचा : चीनची ‘डिलीट अमेरिका’ मोहीम काय आहे? ‘डॉक्युमेंट सेव्हंटी नाईन’ म्हणजे काय?
‘एनकोअर’ ॲपमधील सुविधा कोणत्या?
हे ॲप निवडणूक यंत्रणेतील अधिकारी आणि प्राधिकृत अधिकाऱ्यांसाठी समन्वयासाठी तयार करण्यात आले आहे. निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांच्या प्रचार सभा, रोड शो तसेच विविध उपक्रमांना परवानगी द्यायची किंवा प्रलंबित अर्जाबाबतची माहिती या ॲपमध्ये असणार आहे. निवडणूक आयोगाने ज्यांना प्राधिकृत केलेले आहे अशा यंत्रणेतील व्यक्तींना हे ॲप वापरता येईल. या ॲपमुळे अधिकाऱ्यांचा वेळ वाचेल, असा दावा केला जात आहे.
‘व्होटर टर्नआऊट’ ॲपचे स्वरूप काय?
मतदानाच्या दिवशी कोठे, किती मतदान झाले. त्याचे शेकडा प्रमाण किती, महिला-पुरुषांचे प्रमाण काय, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे या ॲपमध्ये उपलब्ध होऊ शकतील. मतदान केंद्रनिहाय, विधानसभानिहाय मतदानाबाबतची माहिती या ॲपमध्ये उपलब्ध असणार आहे.
‘व्होटर हेल्पलाइन’ ॲपमध्ये कोणत्या सुविधा आहेत?
मतदारयादीमध्ये आपले नाव कोणत्या मतदारसंघात आहे. कोणत्या मतदान केंद्रावर आहे याची माहिती निवडणूक ओळखपत्राच्या अधारे किंवा नावाच्या आधारे शोधता येते. या ॲपमधून मतदार छायाचित्र, पोलचीट आदींची माहिती मतदारास मिळू शकते. त्यामुळे मतदारांना मतदानादिवशी फारशी पळापळ करावी लागणार नाही. या ॲपचा उपयोग या पूर्वीच्या विधानसभा निवडणुकीमध्येही करण्यात आला होता. आता निवडणुकाचा सर्व कारभार डिजिटल झाला असल्याने निवडणुकीतील पारदर्शकता वाढेल आणि मतदारांच्या सहभागामुळे लोकशाही मूल्य अधिक रुजेल, असा दावा भारत निवडणूक आयोगाने केला आहे. या प्रत्येक ॲपमध्ये मतदान केंद्रनिहाय माहिती भरणे, त्याचा उपयोग वाढावा यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणांचा जोर आता वाढू लागला आहे.
हेही वाचा : विश्लेषण : शाळेतले नवे प्रगती पुस्तक कसे असेल?
‘ईएसएमएस’ हे ॲप कशासाठी ?
निवडणुकीदरम्यान भरारी पथके आणि स्थायी पथके नियुक्त केल्यानंतर होणाऱ्या विविध प्रकारच्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी या ॲपचा उपयोग केला जाणार आहे. पैसे, मद्य, बँकांमधून निघालेली रक्कम याचा जलद प्रतिसाद संकेतांक तपासणी तसेच सोने-चांदीचे व्यवहार याचा विविध यंत्रणा या ॲपच्या माध्यमातून मागोवा घेऊ शकतील. समजा एखादी गाडी पकडली आणि त्यात रक्कम सापडली तर त्या रकमेचा स्रोत रक्कम बाळगणाऱ्यास सांगावा लागणार आहे. तसे न केल्यास प्राप्तिकर, पोलीस, राज्य उत्पादन शुल्क यासह विविध यंत्रणा या ॲपआधारे काम करणार आहेत. त्यामुळे यंत्रणेसाठी हे ॲप महत्त्वाचे मानले जाते.
suhas.sardeshmukh@expressindia.com