सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने ४ मे रोजी उत्तराखंड केडरच्या २०११ सालच्या बॅचमधील छवी रंजन या आएएस अधिकाऱ्याला अटक केली आहे. अवैध पद्धतीने जमीन विक्री प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. सध्या रंजन हे समाज कल्याण विभागाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. झारखंडमध्ये अटक झालेले हे दुसरे आएएस अधिकारी आहेत. याआधी मागील वर्षी ११ मे रोजी आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांना मनरेगा आर्थिक घोटाळ्यात अटक करण्यात आली होती. दरम्यान, रंजन यांच्या अटकेनंतर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली असून झारखंडमधील हे कथित अवैध जमीन विक्री प्रकरण नेमके काय आहे? हे जाणून घेऊ या.
छवी रंजन यांना ४ मे रोजी ईडीने अटक केले आहे. त्यांची यापूर्वी १३ आणि २४ एप्रिल रोजी ईडीने चौकशी केली होती. रांची येथील भारतीय लष्कराच्या मालकीची जमीन अवैधपणे विकण्यामध्ये त्यांचा हात असल्याचा आरोप आहे. ही जमीन विकण्यात आली तेव्ह छवी रंजन रांचीचे उपायुक्त होते.
हेही वाचा >>> कर्नाटक निवडणुकीत ‘बजरंग दल’ केंद्रस्थानी; खुनासारखे गंभीर आरोप असलेल्या संघटनेला एवढे महत्त्व का?
नेमके प्रकरण काय? आरोप काय?
रांची येथील लष्कराच्या मालकीची साधारण ४.५ एकर जमीन अवैध पद्धतीने विकल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपप्रकरणी रांची येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्याची दखल घेऊन ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. काही लोकांनी मिळून लष्कराची जमीन पश्चिम बंगालमधील एका कंपनीला विकली आहे. याच प्रकरणात रंजन यांची चौकशी करण्यात आली होती. आता त्यांना अटक करण्यात आली आहे. ४.५ एकर जमीन विक्री प्रकरणासह रांची येथील बारियाटू भागातील चेशायर होम रोडवरील एक एकर जमीन विक्रीचीही चौकशी केली जात आहे. या जमीन विक्री प्रकरणात ईडीला आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे.
आतापर्यंत अवैध जमीन विक्री प्रकरणात किती जणांवर कारवाई?
आयएएस अधिकारी छवी रंजन यांच्या अटकेआधी ईडीने आतापर्यंत सात जणांवर अटकेची कारवाई केली आहे. यामध्ये प्रदीप बागची, एमडी सद्दाम हुसैन, अश्रफ अली, इम्तियाज अहमद, तल्हा खान, भानू प्रताप प्रसाद, फैयाझ खानांगळे यांचा समावेश आहे. भानू प्रताप प्रसाद आणि अश्रफ अली हे झारखंडमध्ये शासकीय सेवेत आहेत. अश्रफ अली हे रुग्णालयात कार्यरत आहेत. तर भानू प्रताप प्रसाद हे महसूल खात्यात उपनिरीक्षक होते.
हेही वाचा >>> Buddha Purnima 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला? जाणून घ्या…
जमीन विक्री प्रकरणात छवी रंजन यांचा सहभाग?
ईडीने अटक केलेल्या या सर्व आरोपींनी जमिनीची विक्री करण्यात मध्यस्थ म्हणून भूमिका बजावल्याचा आरोप आहे. तसेच जमीन विक्रीसाठी खोटी कागदपत्रे तयार करणे, सरकारदरबारी खोट्या नोंदी ठेवणे असेही त्यांच्यावर आरोप आहेत. ११ जुलै २०२२ रोजी जमीन विक्रीचा व्यवहार झाला होता. या वेळी छवी रंजन हेदेखील या अवैध विक्री व्यवहाराचा भाग राहिलेले आहेत, असा ईडीने दावा केला आहे.
ईडीच्या तपासात आणखी काय समोर आले?
ईडीमधील सूत्रांच्या माहितीनुसार कथितपणे अवैध पद्धतीने विक्री केलेली जमीन ही अगोदर बी. ए. लक्ष्मण राव यांच्या मालकीची होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही जमीन राव यांनी लष्कराकडे सोपवली. मात्र या जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करण्यात आली. तसेच प्रदीप बागची यांना या जमिनीचे मालक असल्याचे भासवण्यात आले. त्यानंतर ही जमीन पश्चिम बंगालमधील जगतबंधू टी. इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विकण्यात आली.
हेही वाचा >>> विश्लेषण : कार्ल मार्क्स जयंती २०२३ : आजही मार्क्सवाद सर्वांना पुरून का उरतोय ?
२० कोटींची जमीन ७ कोटींना विकली?
विकण्यात आलेल्या जमिनीची किंमत बाजारमूल्यानुसार २०.७५ कोटी रुपये होती. मात्र या जागेला चांगला भाव असूनही ती अवघ्या ७ कोटी रुपयांना विकण्यात आली. यातील २५ लाख रुपये प्रदीप बागची यांना देण्यात आले. तसेच उर्वरित रक्कम ‘टी इस्टेट’ला चेकद्वारे देण्यात आल्याचे दाखवण्यात आले. जमीन खरेदी आणि विक्रीचा व्यवहार कायदेशीरपणे झाल्याचे भासवण्यासाठी हा खटाटोप करण्यात आला होता.
हेही वाचा >>>भारतीय कुस्तीगीर महासंघात तक्रार निवारण समितीच नाही! वाचा महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधक ‘पॉश’ कायदा सांगतो?
दरम्यान, या प्रकरणात थेट आयएएस असलेल्या छवी रंजन यांना अटक करण्यात आल्यामुळे हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. याच प्रकरणात ईडीने आतापर्यंत अनेकांना अटक केली आहे. त्यामुळे आगामी काळात या कथित गैरव्यवहारात कोणाची नावे समोर येणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.