सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई केली आहे. खरं तर हे प्रकरण बिटकॉइनच्या वापराद्वारे गुंतवणूकदारांच्या निधीची फसवणूक करण्याशी संबंधित आहे. मनी लाँड्रिंगच्या चौकशीचा एक भाग म्हणून अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांचा पुण्यातील बंगला, मुंबईतील जुहू येथील एक निवासी सदनिका, जी सध्या शिल्पा शेट्टीच्या नावावर आहे आणि इक्विटी शेअर्ससह ९८ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे, असंही अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी सांगितले.
कथित गेन बिटकॉइन पॉन्झी स्कीम फसवणूक काय?
२०१७ मध्ये जेव्हा बिटकॉइन मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना आकर्षित करीत होते, तेव्हा अमित भारद्वाज, अजय भारद्वाज आणि महेंद्र भारद्वाज यांच्यासह काही व्यक्तींनी व्हेरिएबल टेक पीटीई लिमिटेड नावाच्या कंपनीद्वारे गेन बिटकॉइन पॉन्झी योजना सुरू केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या प्रवर्तकांनी क्रिप्टो संपत्तीमध्ये दरमहा १० टक्के परतावा मिळविण्यासाठी बिटकॉइन मायनिंगसाठी वापरण्याचे आश्वासन देऊन ६,६०० कोटी रुपये किमतीचे बिटकॉइन जमा केले. पॉन्झी योजनांच्या सुरुवातीला गुंतवणूकदारांना उच्च परताव्याचे वचन देण्यात आले, परंतु नंतर ते डिफॉल्ट होऊ लागले.
ईडीची कारवाई कधी आणि कशी सुरू झाली?
डिफॉल्ट सुरू झाल्यानंतर कथित फसवणूक झालेल्या काही जणांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि २०१८-१९ मध्ये महाराष्ट्र पोलीस आणि दिल्ली पोलिसांमध्ये अनेक FIR नोंदवले गेले. व्हेरिएबल टेक पीटीई लिमिटेड आणि तिचे प्रवर्तक अमित भारद्वाज, अजय भारद्वाज, विवेक भारद्वाज, सिम्पी भारद्वाज आणि महेंद्र भारद्वाज तसेच अनेक मल्टिपल लेव्हल मार्केटिंग (MLM) एजंट यांच्याविरुद्ध गुंतवणुकीतून फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी खटले दाखल करण्यात आले होते. या प्रकरणांच्या आधारे ED ने एक अंमलबजावणी प्रकरण माहिती अहवाल (ECIR) नोंदवला, जो FIR सारखाच असतो. त्यानंतर PMLA अंतर्गत मनी लाँड्रिंग तपास सुरू झाला. ईडीच्या म्हणण्यानुसार, प्रवर्तकांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केली आणि ऑनलाइन वॉलेटच्या माध्यमातून बिटकॉइन लपवण्यात आले. एप्रिल २०१८ मध्ये पुणे पोलिसांनी अमित भारद्वाज आणि विवेक भारद्वाज यांना अटक केली होती. सिम्पी भारद्वाज, नितीन गौर आणि निखिल महाजन यांना गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. ते आता न्यायालयीन कोठडीत आहेत. अजय भारद्वाज आणि महेंद्र भारद्वाज यांना अद्याप अटक झालेली नाही.
हेही वाचाः विश्लेषण : इस्रायलचे इराणला ‘प्रत्युत्तर’… या हाडवैरी देशांमध्ये युद्ध भडकण्याची शक्यता किती?
गेन बिटकॉइन पॉन्झी स्कीम प्रकरणात राज कुंद्रा कसे अडकले?
मनी लाँड्रिंगच्या तपासादरम्यान आणि कथित गुन्ह्याच्या कमाईचा मागोवा घेत असताना ईडीला समजले की, रिपू सुदान कुंद्रा ऊर्फ राज कुंद्रा यांनी युक्रेनमध्ये बिटकॉइन मायनिंग फर्म स्थापित करण्यासाठी अमित भारद्वाज याच्याकडून कथितपणे २८५ बिटकॉइन्स घेतले होते. बिटकॉइन्स अमित भारद्वाज याने गुन्ह्यातील गुंतवणूकदारांकडून जमा केलेल्या पैशातून प्राप्त केल्याचा आरोप आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, हा करार पूर्ण झाला नाही आणि कुंद्राच्या ताब्यात २८५ बिटकॉइन्स राहिले, ज्यांची किंमत सध्या १५० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. राज कुंद्राविरुद्ध कारवाई करण्यापूर्वी ईडीने या प्रकरणातील अन्य आरोपींच्या ६९ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केल्या होत्या. कुंद्राची ईडीने जून २०१८ मध्ये पहिल्यांदा चौकशी केली होती.
हेही वाचाः मतदानावेळी बोटाला लावली जाणारी निळी शाई आली कुठून? बोटावरून का जात नाही?
कुंद्रावर यापूर्वी कोणत्या अन्य प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप
कुंद्रा यांच्यावर पोर्नोग्राफीचा खटला सुरू आहे, ज्यात त्यांना २०२१ मध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती आणि दोन महिने मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात ठेवले होते. सप्टेंबर २०२१ मध्ये मुंबईतील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला होता. नोव्हेंबर २०२३ मध्ये कुंद्राने त्याच्या तुरुंगातील जीवनावर आधारित ‘अंडरट्रायल ६९ उर्फ UT ६९’ नावाचा बायोपिक तयार केला आणि स्वतः चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारली होती.