Marathi man Black Peter discovered gold in New Zealand: अलीकडेच Māori खासदार हाना-राव्हिती माईपी-क्लार्क यांनी न्यूझीलंडच्या संसदेत एक विधेयक फाडून टाकताना पारंपरिक हाका नृत्य करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. माओरी समुदाय हा न्यूझीलंडचा स्थानिक (आदिवासी) समुदाय आहे. त्यांचा इतिहास आणि संस्कृती प्राचीन व समृद्ध आहे. या विधेयकामुळे माओरी समुदायाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अधिकारांना धोका पोहोचू शकतो, असे मत हाना-राव्हिती माईपी-क्लार्क यांनी व्यक्त केलं. हा प्रसंग एका विलक्षण ऐतिहासिक दुव्याची आठवण करून देणारा आहे. मूलतः माओरी अर्थव्यवस्था सोन्यामुळे भरभराटीस आली आणि त्यामागे महाराष्ट्रातील एका सामान्य माणसाचे योगदान होते. कोण होता हा मराठी माणूस ज्याला ‘काळा’ असं संबोधण्यात आलं? आणि केवळ तो कृष्णवर्णीय म्हणून का डावललं गेलं होतं त्याचे श्रेय? याचाच घेतलेला हा आढावा.

Maori warriors perform a Haka
Maori warriors perform a Haka

ऑस्ट्रेलियन नाही तर ‘या’ मराठी माणसाने शोधलं होत सोनं!

१२ एप्रिल २००९ च्या सकाळी न्यूझीलंडच्या दक्षिण बेटातील माउंट स्टुअर्ट रिझर्व येथे लोकांचा एक गट जमला होता. या कार्यक्रमाचा उद्देश न्यूझीलंडमध्ये स्थलांतरित झालेल्या पहिल्या भारतीयांपैकी एकाच्या ऐतिहासिक योगदानाचा गौरव करणे हा होता. न्यूझीलंडचे भारतीय वंशाचे गव्हर्नर जनरल आनंद सत्यनंद यांच्या अध्यक्षतेखाली या समारंभात एका स्मारक फलकाचे अनावरण करण्यात आले. त्या फलकावर असे लिहिले होते की, ‘एडवर्ड पीटर्स यांनी १८५८-१८५९ मध्ये ओटागोमधील ग्लेनोर येथे पहिल्या कार्यक्षम सुवर्णक्षेत्राचा शोध लावला.’ कदाचित या वर्णनावरून फारशी कल्पना येणार नाही. परंतु त्या ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या क्षणाला न्याय देण्याचा हा लहानसा प्रयत्न करण्यात आला होता. जवळपास सोन्याच्या खाणीचा शोध लागून दीड शतक उलटलं तरी ओटोगो येथे सोन्याचा शोध लावण्याचे श्रेय तस्मानियामध्ये जन्मलेल्या गॅब्रिएल रीड यांना दिलं जात होतं. रीड हे शेतकरी आणि सुवर्णसाठ्यांचा शोध घेणारे म्हणून प्रसिद्ध होते. परंतु, न्यूझीलंडचे लेखक अ‍ॅलन विल्यम्स यांच्या अथक प्रयत्नांमुळे एडवर्ड पीटर्स यांच्या योगदानाबाबत जागरूकता निर्माण झाली. एडवर्ड पीटर्स यांनीच १८६० च्या दशकाच्या सुरुवातीस न्यूझीलंडमध्ये सुवर्ण शोधाला चालना दिली होती हे अ‍ॅलन विल्यम्स यांनी शोधून काढले होते.

अधिक वाचा: दुर्गाडी किल्ल्याचा मुद्दा वादग्रस्त; पण कल्याणचा २००० वर्षांचा प्राचीन इतिहास काय सांगतो?

उपजीविकेच्या शोधात सातारा- मुंबई ते थेट सात समुद्रापलीकडे

१२ एप्रिल २००९ च्या कार्यक्रमात न्यूझीलंडमधील भारतीय वंशाचे गव्हर्नर जनरल आनंद सत्यनंद म्हणाले होते की, “इतिहासकार अनेक वर्षे या विषयावर वाद घालत राहतील की प्रथम सोनं कोणी शोधलं परंतु, एडवर्ड पीटर्स यांचे योगदान विसरले जाऊ नये हे महत्त्वाचे आहे.”
एडवर्ड पीटर्स यांच्याबाबत अनेक जण त्यांचा उल्लेख गोमंतकीय, युरेशियन आणि अँग्लो-इंडियन अशा वेगवेगळ्या प्रकारे करतात. परंतु ‘एडवर्ड पीटर्स (ब्लॅक पीटर) द डिस्कव्हरर ऑफ द फर्स्ट वर्केबल गोल्डफील्ड इन ओटागो’ या विल्यम्स यांच्या पुस्तकाने त्यांच्या जीवनकथेतील अनेक गोष्टी उलगडल्या आहेत.

साताऱ्यात मराठी कुटुंबात जन्म

विल्यम्स यांच्या पुस्तकात ते म्हणतात की, न्यूझीलंडमध्ये ब्लॅक पीटर या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या या व्यक्तीचा जन्म १८२० च्या दशकात साताऱ्यातील मराठा कुटुंबात झाला. उपजीविकेच्या शोधात त्यांनी मुंबईला स्थलांतर केले आणि वेगवेगळ्या जहाजांवर नोकऱ्या करण्यास सुरुवात केली. यामुळे ते साताऱ्यापासून खूप दूर जगाच्या दूरच्या टोकापर्यंत पोहोचले. या त्यांच्या या प्रवासात १९४० या दशकाच्या शेवटी कॅलिफोर्नियात पोहोचले. तिथे ते सुवर्णसंचयाच्या कार्यात सहभागही झाले. भारतातून जाण्यापूर्वी त्यांनी कदाचित ख्रिश्चन नाव स्वीकारले असावे परंतु त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता की नाही याबाबत माहिती उपलब्ध नाही.

नवीन आयुष्याची सुरुवात

भटकंतीचे जीवन जगत असताना पीटर्स शेवटी ‘माओरी’ या नौकानयन जहाजावर स्वयंपाकी म्हणून काम करू लागले. १८५३ साली हे जहाज पोर्ट चॅल्मर्स येथे पोहोचले. त्यावेळी पीटर्स यांनी जहाजावरून उतरायचे ठरवले. त्या काळात न्यूझीलंडमध्ये भारतीय स्थलांतरावर कोणतेही निर्बंध नव्हते. मात्र क्राउन कॉलनीमध्ये पाऊल ठेवण्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक होती. या नियमांची जाणीव असूनही पीटर्स यांनी कॅप्टनला न सांगता जहाज सोडले आणि थेट पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. त्यांच्या या अपराधासाठी त्यांना फक्त सहा आठवड्यांची शिक्षा झाली. त्यानंतर त्यांची सुटका झाली आणि त्यांना कॉलनीत राहण्याची परवानगी मिळाली. तिथे त्यांनी माओरी महिलेशी विवाह देखील केला. नव्या देशी पीटर्स त्यांनी विविध प्रकारची कामे केली. ज्यात झोपडी बांधण्याचे काम, शेळ्या राखणारा (शेफर्ड) आणि बैलगाडी हाकण्याचे काम इत्यादींचा समावेश होता.

Māori
Māori

सोन्याचा शोध लागला

१८५८ च्या उत्तरार्धात तोकोमैरीरो नदीतून मेंढ्या नेण्यासाठी दोन अन्य मेंढपाळांना ते मदत करत होते. त्यावेळी मेंढपाळांनी नदीच्या काठी तळ ठोकला होता. एका संध्याकाळी जेवण आटोपल्यानंतर पीटर्स भांडी धुण्यासाठी नदीकाठी गेले आणि त्यांना सोन्याचा शोध लागला. त्यानंतर त्यांनी सोने शोधण्याचा निर्णय घेतला. माओरी समाजाला सोने माहीत होते. परंतु त्याच्या आर्थिक महत्त्वाबद्दल ते अनभिज्ञ होते. “पीटर्स यांना कॅलिफोर्नियामध्ये खाणकामाचा अनुभव होता, परंतु तो मुख्यतः ‘गोल्डमायनरच्या क्रेडल’ नावाच्या उपकरणापुरताच मर्यादित होता,” असे ग्लेन कॉनवे यांनी २००९ साली ‘ओटागो डेली टाइम्स’मध्ये लिहिले होते. त्या कामातून त्यांना सोन्याचा शोध घेण्यासाठी लागणाऱ्या मातीच्या स्वरूपाची थोडीफार माहिती होती. परंतु, अशा संधींना यशस्वी कसे करावे याबाबतचा त्यांचा अनुभव मर्यादित होता. तरीही, सोनं कुठे सापडण्याची शक्यता आहे याचा अचूक अंदाज लावण्याची क्षमता त्यांच्याकडे असल्याचे पुरावे आहेत.”

पहिल्या फेरीतच पीटर्स यांनी इतके सोने शोधले की, त्यापासून एका अंगठीची निर्मिती करता आली, जी सध्या एका संग्रहालयात प्रदर्शित करण्यात आली आहे. त्यांनी शोधलेल्या सोन्याच्या बदल्यात त्यांना मिळालेली रक्कम काही काळ त्यांचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी पुरेशी होती. पुढील काही वर्षांत त्यांनी पुन्हा विविध कामे करण्यास सुरुवात केली. मात्र, वसाहतीच्या अधिकाऱ्यांनी या भारतीय स्थलांतरिताने ओटागोमध्ये केलेल्या शोधावर कोणतीही पुढील कार्यवाही केली नाही किंवा नोंद घेतली नाही.

नशिबाने घेतले वळण

न्यूझीलंड सरकारने पीटर्स यांच्या शोधाला गांभीर्याने घेतलेले नसले तरी त्यांच्या कर्तृत्वाची बातमी हळूहळू दूरदूरपर्यंत पसरली. कॅलिफोर्निया आणि व्हिक्टोरिया (ऑस्ट्रेलिया) यांसारख्या ठिकाणी सुवर्णसंचयामुळे मोठी भरभराट होत असल्याचे पाहून काही सुवर्णशोधक आपले नशीब आजमावण्यासाठी न्यूझीलंडला आले, त्यामध्ये गॅब्रिएल रीडही होते. पीटर्स यांनी सोन्याचा शोध लावला तरी सोन्याच्या शोधामुळे मिळालेला सन्मान आणि आर्थिक लाभ रीड यांना मिळाला. काही संदर्भानुसार एका मोहिमेनंतर पीटर्स आणि रीड योगायोगाने भेटले आणि पीटर्स यांनी निरागसपणे रीड यांना सोन्याचा ठावठिकाण सांगितला,” असे रोसेट्टा क्वारांटा यांनी ‘द न्यूएस्ट झीलँडर. मध्ये लिहिले होते.

रीड यांचा अनुभव आणि सुवर्णसंचय

रीड यांना अनेक देशांतील सुवर्णक्षेत्रांमध्ये काम करण्याचा अनुभव होता. पीटर्स यांच्या शोधानंतर जवळपास चार वर्षांनी रीड यांनी त्याच भागात सुवर्णशोध घेण्याची मोहीम सुरू केली आणि त्यात यशस्वी झाले. त्याने ज्या भागात सोने शोधले त्या भागाला त्यांच्या सन्मानार्थ नंतरच्या कालखंडात ‘गॅब्रिएल्स गली’ असे नाव देण्यात आले. रीड यांच्या शोधावर वसाहतीच्या अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आणि त्या भागात खाणकामाचा गांभीर्याने शोध सुरू केला. ज्यामुळे ओटागो गोल्ड रशला सुरुवात झाली. या काळात जगभरातून १८ हजार शोधक आपले नशीब आजमावण्यासाठी न्यूझीलंडला आले. केवळ सहा महिन्यांत ड्युनेडिन हे १३ हजार लोकसंख्या असलेले वसाहतीचे छोटे गाव देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर झाले आणि लोकसंख्या ३० हजार इतकी झाली.

अधिक वाचा: Sambhal mosque dispute:संभल विषयीचे ऐतिहासिक संदर्भ काय सांगतात? मंदिर खरंच बाबराने नष्ट केले होते का?

वर्णद्वेष आणि राजकारण

ओटागो प्रांतीय परिषदेकडून सुरुवातीला या प्रदेशात लाभदायक सुवर्णक्षेत्र शोधल्याबद्दल ५०० पौंडांचा बोनस देण्याचे जाहीर करण्यात आले होते. पीटर्स यांना या पारितोषिकासाठी दोनदा अर्ज केला परंतु, त्यांना नकार देण्यात आला. हा नकार वर्णद्वेष आणि स्थानिक राजकारणाचा परिणाम होता. काही वर्षांनंतर परिषदेकडून रीड यांना याच रकमेच्या दुप्पट म्हणजे १००० पौंड देण्यात आले. ओटागो प्रांतीय परिषदेने १००० पौंडांचे पारितोषिक रीड यांना दिले परंतु पीटर्स यांना नाही. अशाप्रकारे ओटागोमध्ये सोने शोधल्याचे श्रेय इतिहासात रीड यांना मिळाले.

Thomas Gabriel Read
Thomas Gabriel Read

स्थानिकांचे प्रेम

न्यूझीलंडच्या अधिकाऱ्यांच्या वागणुकीनंतरही पीटर्स यांना देशाच्या दक्षिण बेटातील जनसामान्यांची सहानुभूती मिळाली. १८८५ साली प्रांतीय परिषदेने ठरवले की, जर सार्वजनिक निधीतून ५० पौंड गोळा झाले, तर परिषद त्या रकमेची भर घालून पीटर्स यांच्यासाठी पेन्शन फंड उभारेल. ओटागोच्या रहिवाशांनी या प्रस्तावाला आनंदाने मान्यता दिली. समाजाला त्यांच्याविषयी असलेले प्रेम आणि स्थानिक खासदार व्हिन्सेंट पाईक यांचा पाठिंबा यामुळे ही रक्कम लवकरच गोळा झाली. ड्युनिडिन बेनेव्होलंट इन्स्टिट्यूशनमध्ये राहत असलेल्या पीटर्सना शेवटी दरमहा १० शिलिंग (अर्धा पाऊंड) पेन्शन मिळू लागली. ही रक्कम लहान होती परंतु, त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी पुरेशी होती. ही रक्कम त्यांना पुढील आठ वर्षे त्यांच्या मृत्यूपर्यंत उपयोगी पडली. रीड हे ओटागोकडून भरघोस पारितोषिक मिळाल्यानंतर तस्मानियामध्ये परत गेले. पण तिथे त्यांच्यासाठी आनंददायी काळ नव्हता. त्यांनी त्यांच्या आयुष्याची शेवटची सात वर्षे मनोरुग्णालयात घालवली. जिथे ते बायपोलर डिसऑर्डरने त्रस्त होते. पीटर्स यांच्या मृत्यूनंतरच्या एका वर्षातच रीड यांचाही मृत्यू झाला.

अधिक वाचा: Ajmer Sharif Dargah: अजमेर शरीफ़ दर्गा हे शिवमंदिर होते का? ऐतिहासिक संदर्भ काय सुचवतात?

अ‍ॅलन विल्यम्स

अ‍ॅलन विल्यम्स यांच्या प्रयत्नांमुळे या मराठी माणसाचा इतिहास जगासमोर येण्यास मदत झाली. या लेखकाने ‘ओटागो विटनेस’ या ड्युनिडिनमधून १८५१ ते १९३२ दरम्यान प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक वृत्तपत्राच्या संग्रहातून पीटर्स यांच्याबद्दल माहिती शोधण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी न्यूझीलंड आर्काइव्ह्ज, ड्युनिडिनमधील हॉकेन लायब्ररी आणि वेलिंग्टनमधील अलेक्झांडर टर्नबुल लायब्ररीच्या संग्रहातही शोध घेतला. २००९ साली प्रकाशित झालेलं त्यांचं पुस्तक सध्या दुर्मीळ आहे आणि त्याचे काही निवडक भागच ऑनलाइन उपलब्ध आहेत. परंतु, विल्यम्स यांच्या प्रयत्नांमुळे साहसी भारतीय पीटर्स यांची कथा आणि योगदान जगासमोर उघड झाले.

Story img Loader