What is Rent the Chicken : जगभरातील अनेक देशांमध्ये कोंबडीच्या अंड्यांच्या किमती वाढलेल्या पाहायला मिळत आहेत. अमेरिकेतील घाऊक बाजारात अंड्यांचे दर प्रति डझन सात ते आठ डॉलर्सवर (६०० ते ६५० रुपये) पोहोचले आहेत. त्याचा सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा परिणाम झाला आहे. हीच बाब लक्षात घेता, अमेरिकेतील कंपन्यांनी अंडी उत्पादनावर भर दिला आहे. त्यासाठी त्यांनी ‘रेंट-द-चिकन’ ही प्रक्रिया सुरू केली आहे. ज्यामुळे नागरिकांना बाजारभावापेक्षा कमी किमतीत अंडी मिळत आहेत. दरम्यान, ‘रेंट-द-चिकन’ म्हणजे काय, ही प्रक्रिया कशी राबवली जाते, यामागचा नेमका हेतू काय, हे जाणून घेऊ.
रेंट-द-चिकन म्हणजे काय?
‘रेंट-द-चिकन’ म्हणजेच कोंबड्या भाड्याने देणे. देशभरातील अंड्यांचे उत्पादन वाढावे आणि अंड्यांचे दर झपाट्याने कमी व्हावेत यासाठी अमेरिकन कंपन्यांनी अनोखी कल्पना शोधून काढली आहे. अंडी देणाऱ्या कोंबड्या कंपन्यांकडून भाड्याने दिल्या जात आहेत. firstpost च्या वृत्तानुसार, अमेरिकेतील न्यू हॅम्पशायर कंपनी ग्राहकांना दोन किंवा चार कोंबड्या भाड्याने घेण्याची संधी देते. या कोंबड्यांना कंपनीकडून आवश्यक ते खाद्यही पुरवले जाते. त्यांच्या संगोपनासाठी ग्राहकांना काही मार्गदर्शक सूचनादेखील दिल्या जातात. या सेवेंतर्गत लोक कोंबडी भाड्याने घेऊ शकतात आणि त्यांच्या घरी ताजी अंडी ठेवू शकतात.
आणखी वाचा : Most Popular Visa : ग्रीसचा गोल्डन व्हिसा अमेरिकेच्या गोल्ड कार्डपेक्षाही लोकप्रिय; यामागचं कारण काय?
रेंट-द-चिकन कसे काम करते?
न्यू हॅम्पशायर कंपनीचे मालक ब्रायन टेम्पलटन यांनी सीबीएस न्यूजला सांगितले, “कंपनीने भाड्याने दिलेली एक कोंबडी आठवड्यातून किमान एक डझन अंडी देते. ज्या व्यक्तींनी भाड्याने दोन कोंबड्या घेतल्या आहेत, त्यांना आठवड्यातून दोन डझन अंडी मिळतात. या कोंबड्या खूपच शिस्तप्रिय आहेत. सकाळी त्यांना पिंजऱ्यातून बाहेर काढल्यानंतर त्या दिवसभर मोकळ्या मैदानात चरतात. तसेच संध्याकाळ झाली की, त्या आपोआप घराकडे परततात. कंपनीने दिलेल्या कोंबड्यांचे पालन करणे लोकांना आवडते आणि त्यासाठी खर्चही खूप कमी येतो.”
कोंबड्यांचे भाडे किती?
ब्रायन म्हणाले, “दोन कोंबड्यांचे सहा महिन्यांचे भाडे ६०० डॉलर्स इतके आहे. सर्वसाधारपणे
नागरिकांना अंडी विकत घेण्यासाठी महिन्याला ३०० डॉलर्सचा (२६,१४८ रुपये) खर्च येऊ शकतो. काही शहरांमध्ये अंड्यांचा दर प्रति डझन आठ डॉलर्स (६९७ रुपये) इतका आहे. त्यामुळे कंपनीने शोधून काढलेली ही अनोखी कल्पना ग्राहकांसाठी फायदेशीर आहे.” दरम्यान, भाड्याने कोंबड्या उपलब्ध करून देणारी कंपनी अमेरिका आणि कॅनडामधील शेतकऱ्यांबरोबर मिळून काम करते, जेणेकरून लोकांना घरबसल्या कमी भावात ताजी अंडी उपलब्ध होऊ शकतील. भाड्याचा कालावधी संपत आला, तर ज्या ग्राहकांना कोंबड्यांचे पालन-पोषण करणे आवडू लागले असेल, ते कोंबड्या खरेदीही करू शकतात. पेनसिल्व्हानियामध्ये असाच व्यवसाय करणारे जेन टॉम्किन्स यांनी USA Today ला सांगितले की, त्यांना भाड्याने कोंबड्या घेण्याची आवड आहे आणि ते दररोज दोन ते तीन डझन अंड्यांचे उत्पादन घेतात.
‘रेंट-द-चिकन’ची मागणी का वाढली?
काही महिन्यांपासून अमेरिकेत अंड्यांचे दर गगनाला भिडले आहेत. उत्पादन कमी झाल्याने
अंड्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच बाजारात उपलब्ध होणारी अंडी सहसा चांगल्या दर्जाची नसल्याने अनेकांनी कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. काही जणांना हा व्यवसाय करणे शक्य नसल्याने त्यांनी अंडी देणाऱ्या कोंबड्या भाड्याने घेण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या वाशिंग्टन शहरातील अंडी विक्रेते टेम्पलटन सांगतात, “अंडी खरेदी करण्यासाठी त्यांच्या दुकानावर लांबच लांब रांगा लागत आहेत. अंड्यांचा तुटवडा भासत असल्याने तासन् तास रांगेत उभे राहूनही अनेकांना रिकाम्या हातानेच घरी परतावे लागत आहे. म्हणूनच या संकटाला सामोरे जाण्यासाठी काही जण रेंट-द-चिकन या पर्यायाकडे वळले आहेत.”
टेम्पलटन यांनी, “शहरातील बऱ्याच लोकांनी भाड्यानं कोंबड्या घेण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी ते हवे तितके पैसे खर्च करण्यास तयार आहेत. न्यू हॅम्पशायर कंपनी भाड्यानं दिल्या जाणाऱ्या कोंबड्यांच्या पायांवर एक विशिष्ट प्रकारचा टॅग लावते; जेणेकरून लोकांना पुढच्या वर्षी त्याच कोंबड्या परत मिळू शकतील. मात्र, लोकप्रिय होत असलेल्या या सेवेमुळे अंड्यांचा तुटवडा कमी होण्यास मदत होणार नाही. अंडी देणाऱ्या कोंबड्यांचा व्यवसाय करणं अत्यंत गरजेचं आहे”, असे सीबीएस न्यूजला सांगितले. आम्हाला लोकांना मदत करायची आहे, असेही ते म्हणाले.
अमेरिकेत अंड्यांचा तुटवडा का निर्माण झाला?
अलीकडच्या काही महिन्यांत अमेरिकेत अंड्यांच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे. दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत अमेरिकेत अंड्यांचे दर तब्बल ६५.१ टक्क्यांनी वाढले आहेत, ज्यामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसत असून, त्यांना पर्यायी उपाय शोधावा लागत आहे. यूएस ब्यूरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्स कन्झ्युमर प्राइस इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२३ मध्ये अमेरिकेत एक डझन अंड्यांची सरासरी किंमत २.५१ डॉलर्स (२१९ रुपये) इतकी होती. २०२४ मध्ये ती वाढून ४.१५ (३६२ रु.) डॉलर्सवर पोहोचली. सध्याच्या घडीला देशात अंड्यांचे दर प्रतिडझन आठ डॉलर्स (६९७ रुपये) झाले आहेत.
या वाढीमुळे वॅफल हाऊससारख्या जेवणाच्या हॉटेल्समध्ये अंड्यांपासून तयार केले जाणारे पदार्थ महाग झाले आहेत. हॅरिस टीटरसारख्या सुपर मार्केट्सनीदेखील अंडी खरेदी मर्यादित करण्यास सुरुवात केली आहे. अंड्यांच्या वाढत्या दरांमुळे चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात ग्रीन कॅसल शहरात उभ्या असलेल्या एका ट्रकमधून अनोळखी चोरट्यांनी एक लाख अंडी चोरून नेली आहेत. यूएसए टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, या अंड्यांची किमत सुमारे ४०,००० (३४ लाख रुपये) डॉलर्स इतकी होती. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून चोरट्यांचा कसून शोध घेतला जात आहे.
अमेरिकेत का वाढल्या अंड्यांच्या किमती?
अमेरिकेत अंड्यांच्या किमती वाढण्यामागे पॅथोजेनिक एव्हियन इन्फ्लुएंझा (HPAI) आणि बर्ड फ्लूचा प्रसार कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. २०२२ मध्ये अमेरिकेत या विषाणूमुळे लाखो कोंबड्या मृत्युमुखी पडल्या होत्या. त्यामुळे अंडी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते. प्राप्त माहितीनुसार, या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जवळपास १० लाख कोंबड्यांना मारण्यात आले होते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, एखाद्या कोंबडीला एव्हियन इन्फ्लुएंझा या विषाणूची लागण झाली की, त्याचा प्रसार अनेक कोंबड्यांमध्ये होतो. याच कारणामुळे कोंबड्यांचे संपूर्ण कळप मारून टाकले जातात. अशा रीतीने पोल्ट्री उद्योगाचे आणि सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण केले जाते. परंतु, यामुळे अंडी उत्पादनावरही मोठा परिणाम होतो.
अंड्यांचे दर कमी होतील का?
२०२२ नंतर २०२४ मध्ये या विषाणूचा अमेरिकेत झपाट्याने प्रसार झाला. परिणामी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्येच सुमारे १.७ कोटी अंडी देणाऱ्या कोंबड्या मारण्यात आल्या. यूएसडीएच्या मते, २०२५ मध्येही अमेरिकेत हे संकट कायम आहे. गेल्या आठवड्यातच अॅरिझोना, कॅलिफोर्निया, उत्तर कॅरोलिना, ओहायो, मिसूरी, इंडियाना व वॉशिंग्टनमध्ये एव्हियन इन्फ्लुएंझा विषाणुमुळे जवळपास १.४ कोटी कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. दरम्यान, अमेरिकेत अंड्यांच्या किमती कधी आटोक्यात येतील याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे. विषाणूचा प्रादुर्भाव असाच कायम राहिला, तर आगामी काळात अंड्यांचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.