महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांत महायुतीच्या उमेदवारांना पराभवाचा धक्का बसत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळालेल्या ७ जागांमुळे पक्षात थोडा आनंद आणि थोडे दुःख असे वातावरण तयार झाले आहे. महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी शिंदे यांच्या पक्षाने १५ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी ७ जागांवर पक्षाने विजय मि‌ळवला. महाराष्ट्रात या पक्षाचा मोठा भाऊ असलेल्या भाजपला २७ जागा लढवून अवघ्या १० जागांवर विजय मिळवता आला आहे. त्यामुळे मित्रपक्षामुळे महाराष्ट्रात पक्षाला धक्का बसला असा युक्तिवाद भाजप नेते आता करू शकतील का, खरा प्रश्न आहे. राज्य विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना महायुतीला हा फटका बसला असला तरी भाजपच्या एकंदर स्थितीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बळ मात्र अप्रत्यक्षपणे वाढले, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

मुख्यमंत्र्यांचे बळ कसे वाढले ?

लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोन आकडी जागाही दिल्या जाणार नाहीत अशी चर्चा माध्यमांमधून सुरू झाली होती. ही चर्चा घडविण्यामागे कोणाची ‘कुजबूज’ फळी कार्यरत होती याची खमंग चर्चा अजूनही राजकीय वर्तुळात सुरू असते. या तर्कवितर्कांना वाकुल्या दाखवत मुख्यमंत्र्यांनी मोठ्या मुसद्दीपणे मोदी-शहा यांच्याकडून १५ जागा पदरात पाडून घेतल्या. या १५ जागांपैकी मुख्यमंत्र्यांच्या पक्षाला किती जागा मिळतील याविषयी मित्रपक्षांच्या वर्तुळातच साशंकता होती. मुख्यमंत्र्यांचा पक्ष महाराष्ट्रात ‘कमजोर कडी’ ठरेल अशी चर्चा असताना प्रत्यक्षात मात्र ७ जागांवर विजय मिळवत त्यांच्या पक्षाने विजयाची टक्केवारी ५० टक्क्यांच्या आसपास आणून ठेवली आहे. भाजपपेक्षाही शिंदेची कामगिरी त्यामुळे उजवी ठरते.

हेही वाचा >>>एनडीएत राहणार की साथ सोडणार? कोणत्या घटक पक्षांची भूमिका ठरणार महत्त्वाची?

मुंबईतील पराभव जिव्हारी?

शिवसेनेत दुभंग घडविल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची मुंबईतील ताकद ठरवून कमी करण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न केल्याचे दिसते. ठाकरे यांच्या सोबत असलेले मुंबई महापालिकेतील ३७ पेक्षा अधिक नगरसेवक शिंदे यांच्या पक्षात आले होते. मुंबई महापालिकेचा निधी, स्थानिक राजकारणासाठी आवश्यक रसद पुरवून उद्धव यांचे बळ कमी कसे होईल याकडे शिंदेसेनेचा कल होता. असे असले तरी मुंबईतील रवींद्र वायकर यांचा अपवाद वगळला तर शिंदेंच्या दोन जागांवर उद्धव सेनेने त्यांचा पराभव केला. दक्षिण मुंबईतील जागा शिंदे यांच्या पक्षाने हट्टाने मागून घेतली होती. तेथे यामिनी जाधव यांच्या उमेदवारीमुळे भाजपचा परंपरागत मतदारही नाराज झाला होता. दादर, माहीम परिसराचा समावेश असलेल्या आणि उद्धव यांच्यासाठी भावनिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या जागेवर शिंदेसेनेचे राहुल शेवाळे यांची दावेदारी भक्कम मानली जात होती. तेथेही उद्धव ठाकरे यांचा उमेदवार निवडून आला. मुंबईतील हा पराभव मुख्यमंत्र्यांच्या जिव्हारी लागणार आहे.

कोकण, ठाण्याने महायुतीला तारले?

कोकण, ठाणे आणि पालघर पट्ट्याने मात्र भाजप आणि विशेष करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला तारल्याचे पाहायला मिळते. ठाणे आणि कोकणातील दोन्ही जागा या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी भावनिकदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जात होत्या. मात्र तळ कोकणात नारायण राणे यांच्या रूपात भाजपने तर ठाणे, कल्याणातील घरच्या मैदानात मुख्यमंत्र्यांनी विजय मि‌ळवत उद्धव सेनेला धक्का दिला आहे. कोकण, ठाणे आणि पालघर पट्ट्यातील सहा जागांपैकी भिवंडीचा एकमेव अपवाद वगळला तर पाच जागांवर महायुतीला विजय मिळाल्याने भविष्यात उद्धव सेनेपुढील आव्हाने खडतर असणार आहेत. मुंबईत मोठ्या पराभवाला सामोरे जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे आणि कल्याणातील मतदारांनी तारल्याचे पहायला मिळते. ठाणे लोकसभा मतदारसंघाचा तोंडवळा गेल्या काही वर्षांत बदलला असून येथे मोदीनिष्ठ मतदारांचा मोठा भरणा आहे. नेमके हेच हेरून भाजपने या मतदारसंघावर दावा सांगितला होता. मात्र हा मतदारसंघ हिरावून घेतल्यास आपल्या राजकारणाचा पायाच ठिसूळ होईल हे मोदी-शहांना पटवून देण्यात मुख्यमंत्री यशस्वी ठरले. जागा मिळविताना त्यांनी दाखविलेला हा मुत्सद्दीपणा मुख्यमंत्र्यांच्या कामी आल्याचे पाहायला मिळते.

हेही वाचा >>>राहुल, पवार, उद्धव, अखिलेश, ममता, चंद्राबाबू, नितीश ठरले लोकसभा निवडणुकीतील सात ‘सामनावीर’; राष्ट्रीय राजकारणात यांतील कुणाचे महत्त्व वाढणार?

मुख्यमंत्रीपदावर दावेदारी अधिक भक्कम?

लोकसभेच्या निकालानंतर राज्यात काही मोठे राजकीय बदल होतील अशी चर्चा सातत्याने सुरू होती. भाजपच्या मोठ्या पराभवामुळे या चर्चेला तूर्त विराम मिळण्याची चिन्हे आहेत. भाजपपेक्षा शिंदे यांच्या विजयाची टक्केवारी अधिक आहे. त्यामुळे नेतृत्वबदलाचा मुद्दा निकाली निघाला आहे. याशिवाय देशात भाजपला मिळालेल्या जागा पहाता आघाडीच्या राजकारणाशिवाय आता मोदी-शहांना पर्याय नाही. सात खासदार असलेले एकनाथ शिंदे यांच्यासाठी हे फायद्याचे ठरू शकते. आघाडीच्या राजकारणात सात खासदारांचा आकडा काही कमी नाही. त्यामुळे मंत्रिमंडळात एकापेक्षा अधिक जागा मिळण्याची आशा मुख्यमंत्र्यांचा पक्ष आता धरु शकतो.