Maharashtra CM Eknath Shinde visits Kamakhya Temple: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या २४ ऑक्टोबर रोजी निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी आज गुवाहाटीला जाऊन सहकुटूंब कामाख्या देवींचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा तिसरा गुवाहाटी दौरा आहे. अडीच वर्षांपूर्वी शिवेसेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यावेळी कामाख्या देवीच्या आशीर्वादाने आम्ही सत्तास्थापन करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष जाऊन दर्शनही घेतलं. त्यानंतर आता निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी पुन्हा एकदा कामाख्या देवीच्या मंदिरात त्यांनी हजेरी लावली आहे. त्याच पार्श्वभूमीवर या मंदिराचे स्थलमाहात्म्य जाणून घेणे माहितीपूर्ण ठरावे!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
कामाख्या मंदिर गुवाहाटी (फोटो:विकिपीडिया)

कामाख्या मंदिराविषयीच्या पौराणिक कथा

कामाख्या देवळाच्या स्थापनेविषयी अनेक रोचक कथा उपलब्ध आहेत. धार्मिक-पौराणिक साहित्यात हे देऊळ कामदेवाने विश्वकर्म्याच्या मदतीने बांधले असा संदर्भ सापडतो. सतीच्या आत्मदहनानंतर समाधिस्थित असलेल्या शिवाची समाधी भंग करण्यासाठी कामदेवाने मदनबाण चालवला.. परिणामत: समाधीभंग पावलेल्या शिवशंकराने आपल्या क्रोधाग्नीने कामदेवाला भस्म केले, तर नीलाचल पर्वतावर शक्तीच्या कृपेने कामदेवाला पुन्हा जीवनदान मिळाले म्हणून कामदेवाने येथे शक्तीसह शिवाची उपासना करून देऊळ बांधले अशी आख्यायिका आहे, म्हणून या क्षेत्राला कामरूप असेही म्हटले जाते.

अधिक वाचा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उल्लेख केलेल्या मलंगगडाशी संबंधित ‘मच्छिन्द्रनाथ’ कोण होते?

मंदिराची रचना

मुख्यत: हे स्थान तंत्रविद्येचे व सिद्धींचे माहेरघर मानले जाते. त्यामुळे या स्थळाची माहिती करून घेण्यासाठी ‘कालिका पुराण’,‘योगिनी तंत्र’,’ हेवाज्र तंत्र’, ‘देवी पुराण’, ‘देवी भागवत’ व ‘कुब्जिका तंत्र’ यांसारख्या ग्रंथांची मदत घ्यावी लागते. मूलत: हे देऊळ कधी बांधले गेले याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. १५ व्या शतकाच्या अखेरीस मुस्लीम आक्रमणात हे मंदिर उद्ध्वस्त झाले होते व १६६५ मध्ये कच्छ/कोच्छ वंशाच्या नरनारायण राजाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला, परंतु त्या वेळी मंदिराची पुनर्बाधणी ही मध्ययुगीन स्थापत्यशैलीप्रमाणे करण्यात आली होती. त्यामुळे मूळ मंदिराच्या स्थापत्यरचनेविषयी निश्चित असा बोध होत नाही. कामाख्या देवीची योनीरूप प्रतिमा ही मंदिराच्या आत एका गुहेमध्ये आहे व ज्या ठिकाणी ही प्रतिमा कोरलेली आहे तेथे अखंड पाण्याचा नैसर्गिक झरा पाझरतो, तर सध्याच्या मंदिराचा आकार हा चापाकार असून मंदिराच्या भिंतींवर चौसष्ट योगिनींची व अठरा भैरवांची शिल्पे आहेत. मंदिराच्या आवारात दशमहाविद्यांची (काली, तारा, षोडशी, भुवनेश्वरी, भैरवी, छिन्नमस्ता, धुम्रवती, बगलामुखी, मातंगी, कालामिका) व शिव अंशात्मक अवतारांची मंदिरे आहेत.

गर्भगृह (विकिपीडिया)

कामाख्या हे तांत्रिक सिद्धीचे सर्वोच्च सिद्ध शक्तिपीठ आहे. कालिका पुराणात या शक्ती पीठाच्या स्थापनेविषयी एक रोचक कथा देण्यात आली आहे, या कथेनुसार दक्षाच्या यज्ञात सतीने आत्मदहन केल्यानंतर, तिच्या विरहात व्याकूळ झालेल्या शिवाने उद्विग्न अवस्थेत तिचा निष्प्राण देह हातात घेऊन भ्रमण करायला सुरुवात केली होती, त्या वेळी भगवान शिवाला या मन:स्थितीतून बाहेर काढण्यासाठी विष्णूने सुदर्शनचक्राने सतीचे शरीर भग्न केले होते, त्या भग्न झालेल्या तिच्या शरीराचे भाग पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी पडले, त्यात तिच्या योनीचा भाग हा आसाम या प्रदेशात पडला, तेव्हापासून हा प्रदेश शक्तिपीठ म्हणून ओळखला जाऊ लागला. ज्या वेळी तिच्या योनीचा भाग या प्रदेशात ज्या पर्वतावर पडला त्या वेळी तो पर्वत निळ्या रंगात परिवर्तित झाला, म्हणून या पर्वताला नीलाचल पर्वत म्हणून ओळखले जाऊ लागले. या आख्यायिकेनुसार नीलाचल पर्वताला शिवाचेच रूप मानले जाते.

मंदिराचे अधिष्ठान (विकिपीडिया)

गारो व खासी या आदिवासी जमातींची देवी

अनेक आख्यायिका- पौराणिक कथा असल्या तरी मानववंशशास्त्रज्ञांच्या मतानुसार कामाख्या देवीची स्थापना ही तेथील स्थानिक गारो व खासी या आदिवासी जमातींनी केली. या समाजांमध्ये आजही मातृसत्ताक समाजरचना अस्तित्वात आहे. पती हा विवाहानंतर आपल्या सासरी राहतो. त्याच्या विवाहापूर्वीच्या कमाईवर मातेचा, तर विवाहानंतरच्या कमाईवर पत्नीचा अधिकार असतो, तर संततीवर वडिलांचा कोणताही अधिकार नसतो. धार्मिक संकल्पनांमध्ये महाकाली व महादेव यांची उपासना या समाजांमध्ये आढळून येते. किंबहुना आजही कामाख्या देवीला पशुबळी देण्याची प्रथा खासी समाजात दिसून येते.

अधिक वाचा: महाराष्ट्रीय लोकसंस्कृतीतील जगदंबेचा निस्सीम भक्त ‘भुत्या’, आहे तरी कोण?

लज्जागौरी (विकिपीडिया)

महिला-कुमारिकांना देवीचे स्वरूप मानले जाते

कामाख्या हे स्थळ कौमारी शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध आहे. दर वर्षी या ठिकाणी अंबुवाची पर्व साजरे केले जाते. दरवर्षी देवी तीन दिवसांसाठी रजस्वला होते असे मानले जाते. या काळात योनीतून सलग तीन दिवस जलप्रवाहाच्या जागी रक्त प्रवाहित होते अशी समजूत आहे. प्रतिवर्षी आषाढ शुक्ल षष्ठी किंवा सप्तमीपासून एकादशीपर्यंत हा काळ येतो. या काळात मंदिराच्या गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. ज्या खडकावर देवीची योनिमुद्रा कोरलेली आहे त्या ठिकाणी या तीन दिवसांत सफेद कपडा अंथरला जातो. तीन दिवसांनंतर देवीची विशेष पूजा आणि साधना केली जाते व हा काळ अंबुवाची पर्व म्हणून साजरा केला जातो. तीन दिवसांनी त्या रजोवस्त्राचे वाटप भक्तांमध्ये प्रसाद म्हणून केले जाते. कामाख्या शक्तिपीठात साजरा होणारा अंबुवाची पर्व हे आदिशक्तीच्या सर्जनाची प्रचीती देणारे आहे. अंबु म्हणजे जल, वाची म्हणजे उमलणे, सुफलने. जलाच्या प्रवाहामुळे सुफलन होण्याच्या प्रक्रियेला अंबुवाची म्हटले जाते. या पर्वाच्या निमित्ताने जगभरातील तांत्रिक, मांत्रिक, उपासक मंत्रसाधना व सिद्धी प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी एकत्र येतात. या मंदिरात सगळ्या जाती-वर्णाच्या स्त्रियांना प्रवेश दिला जातो, प्रवेश नाकारणाऱ्या व्यक्तीची सिद्धी नष्ट होते असे मानले जाते; किंबहुना या शक्तिपीठाच्या परिसरातील सर्वच महिला-कुमारिकांना देवीचे स्वरूप मानले जाते व त्यांचा अपमान हा देवीचा अपमान समजला जातो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde visits kamakhya devi temple in assam before filing maharashtra election 2024 applications what is the history of this temple svs