चंद्रशेखर बोबडे
देशात लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे अनुक्रमे १९ एप्रिल व २६ एप्रिल २०२४ रोजी पार पडले. सुरुवातीला मतदानानंतर आयोगाने मतदानाची टक्केवारी जाहीर केली होती. पण त्यानंतर पुन्हा आयोगाने ३० एप्रिलला दोन्ही टप्प्यांतील मतदानाची एकत्रित सुधारित आकडेवारी जाहीर केली. पूर्वीपेक्षा ती ६ टक्के अधिक आहे. याबाबत सध्या देशभर चर्चा सुरू आहे. .
दोन टप्प्यांत किती मतदारसंघांत मतदान?
भारतात पहिल्या टप्प्यात २१ राज्यांतील १०२ मतदारसंघात मतदान झाले. मतदानाची प्रक्रिया पार पडल्यावर आयोगाने सायंकाळी एकूण सरासरी ६० टक्के मतदान झाल्याचे जाहीर केले. त्याचप्रमाणे दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला १३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात ८८ मतदारसंघात मतदान झाले. तेथे सरासरी एकूण ६१ टक्के मतदान झाल्याचे अधिकृतरित्या आयोगाने जाहीर केले होते. दोन्ही टप्प्यांतील एकत्रित विचार करता सरासरी ६० टक्के मतदान झाल्याचे आयोगाकडून कळवण्यात आले होते.
सुधारित आकडेवारीत फरक काय?
१९ एप्रिल आणि २६ एप्रिलला मतदान झाल्यानंतर आयोगाने दोन्ही टप्प्यांतील एकूण मतदानाची सरासरी टक्केवारी ६० टक्के असल्याचे जाहीर केले होते. ३० एप्रिल २०२४ रोजी सुधारित टक्केवारी जाहीर केली. त्यानुसार एकूण सरासरी ६६ टक्के मतदान झाल्याचे जाहीर झाले. पूर्वीच्या तुलनेत ६ टक्क्यांनी मतदान वाढले. मतदानात ही वाढ कशी झाली यावर सध्या वेगवेगळ्या अंगांनी चर्चा सुरू आहे.
हेही वाचा >>> कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर जीव गमावलेल्या मुलींचे पालक दाखल करणार गुन्हा, नेमके प्रकरण काय?
टक्केवारीत फरक का पडतो?
मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळ ६ वाजेपर्यंत असते. प्रत्येक दोन तासानिहाय किती मतदान झाले याची नोंद केंद्र अधिकारी त्याच्याकडे असलेल्या नोंदवहीत आयोगाने ठरवून दिलेल्या पद्धतीनुसार घेतो. या प्रक्रियेत फॉर्म क्र.१७ महत्त्वाचा असतो. प्रत्येक केंद्रावर कोणी मतदान केले, किती मतदारांनी मतदान केले याची नोंद या फॉर्ममध्ये केली जाते. मतदान करण्यापूर्वी मतदारांची स्वाक्षरी घेतली जाते. या फॉर्म १७ चा आधारावरच एकूण किती मतदान झाले हे कळते. सुरुवातीला प्राथमिक स्वरूपाची टक्केवारी काढली जाते. अनेकदा काही केंद्रांवर उशिरापर्यंत मतदान सुरू असते. त्याची नोंद उशिरापर्यंत घेतली जाते. त्यामुळे उशिरा झालेले मतदान आधीच्या मतदानात वर्ग जाते. यामुळेही अंतिम आकडेवारीत फरक पडतो. याशिवाय केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या चुकांमुळेही आकडे नोंदवताना फरक पडतो. पण अंतिम तपासणीअंती या बाबी लक्षात येतात व त्या दुरुस्त केल्या जातात. यातूनही अंतिम आकडेवारी किंचित बदलते, असे प्रशासन व कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा >>> पाकिस्तानात घुसून अमेरिकी नौदलाने ओसामा बिन लादेनला कसं केलं ठार; ऑपरेशन ‘नेपच्यून स्पीयर’ काय होते?
अंतिम आकडेवारीला विलंब का?
मतदान झाल्यावर दुसऱ्या दिवशी अंतिम आकडेवारी जाहीर करण्याची आयोगाची पद्धत आहे. २०२४ च्या निवडणुकीच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यांतील मतदानानंतर दुसऱ्या दिवशी निवडणूक अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने मतदानाची आकडेवारी माध्यमांना देण्यात आली होती. आजवरच्या निवडणुकीतील अनुभव लक्षात घेता तीच अंतिम असावी असा समज होता. पण पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर ११ दिवसांनी व दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर ४ दिवसांनी आयोगाने पुन्हा अंतिम आकडेवारी जाहीर केली. त्यात एकूण मतदानात झालेली तब्बल सहा टक्के वाढ सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. विलंबाबाबत आयोगाने अद्याप स्पष्टीकरण दिले नाही.
२०१९ मध्ये किती ठिकाणी कमी मतदान?
२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र, उत्तराखंड, तेलंगणा, गुजरात, पंजाब, राजस्थान, जम्मू-काश्मीर आणि झारखंड या ११ राज्यांतील ५० लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय सरासरीपेक्षा (६७.४० टक्के) कमी मतदान झाले होते. यात उत्तर प्रदेशमधील २२ आणि बिहारमधील १८ लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता. ही बाब लक्षात घेऊन २०२४ मध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रथमच निवडक जिल्ह्यातील महापालिका आयुक्त आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.