महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत प्रगतीशील राज्यांपैकी एक आहे. दरडोई उत्पन्नात राज्य देशातील सगळ्यात श्रीमंत राज्य आहे. मोठे उद्योग, बॉलीवूड आणि मोठ्या साखर सहकारी संस्थांचे माहेरघर आहे. महाराष्ट्र एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आज महाराष्ट्रातील राजकीय चित्र बदलले आहे. पूर्वी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती कशी होती? काळानुरूप हे चित्र कसे बदलत गेले? एकूणच महाराष्ट्राच्या निवडणुकीचा इतिहास जाणून घेऊ.
महाराष्ट्राची निर्मिती
जुना बॉम्बे प्रांत हा सिंध (आता पाकिस्तानात)पासून वायव्य कर्नाटकापर्यंत पसरला होता. त्यात सध्याचा संपूर्ण गुजरात आणि महाराष्ट्राच्या सुमारे दोन-तृतियांश भागाचा समावेश होता. मध्य प्रांताचा एक भाग असणारे विदर्भ आणि हैदराबाद संस्थानाचा भाग असणारे मराठवाडा या प्रांताच्या बाहेर होते. १९२० च्या दशकात एकसंध मराठी भाषिक राज्याची मागणी जोर धरू लागली होती आणि स्वातंत्र्यानंतर त्याला गती मिळाली. १९५३ साली मराठी नेत्यांनी मुंबई, विदर्भ व मराठवाडा एकत्र करण्यासाठी नागपूर करारावर स्वाक्षरी केली. त्यावेळी राज्यातील गुजराती समाजाने स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी स्वतःच्या आंदोलनाचे नेतृत्व केले. या दोन चळवळींमध्ये मुंबई शहर अडकले. देशाचे आर्थिक केंद्र म्हणून त्याच्या उदयात गुजराती भाषिक नागरिकांनी प्रमुख भूमिका बजावली होती; परंतु मराठीबहुल असा हा परिसर होता. राज्याचे भाषिक विभाजन होण्याची शक्यता वाढल्याने मुंबईला केंद्रशासित प्रदेश केले जाईल, असे अनेकांना वाटत होते. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनीही या संदर्भात घोषणा केल्या होत्या.
हेही वाचा : भारताच्या ‘पिनाका’ रॉकेट लाँचर्सची मागणी जगभरात; कारण काय? काय आहेत याची वैशिष्ट्ये?
त्यात विदर्भाला राज्याचा दर्जा देण्याची शिफारस करण्यात आली; परंतु केंद्राने ती फेटाळून लावत मराठवाड्यासह विदर्भाला मुंबई राज्याचा भाग केले. या निर्णयावर मराठी किंवा गुजराती कोणीही खूश नव्हते आणि स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरूच होते. शेवटी केंद्राने सहमती दर्शवून, १ मे १९६० रोजी मुंबई राज्याचे विभाजन केले आणि द्वैभाषिक राज्यांची निर्मिती करण्यात आली. महाराष्ट्र आणि गुजरात या नवीन राज्यांना पूर्वीच्या मुंबई राज्याच्या ३९६ जागांपैकी २६४ आणि १३२ जागा मिळाल्या.
काँग्रेसचे एकहाती वर्चस्व
स्वातंत्र्यानंतरच्या वर्षांमध्ये मुंबई राज्यात काँग्रेस हा एकमेव मोठा राजकीय पक्ष होता. १९५१-५२ मध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विधानसभेच्या ३१७ जागांपैकी २६९ जागा जिंकल्या. त्यावेळी एकूण २६८ मतदारसंघ होते. काही मतदारसंघांनी त्या वेळी एकापेक्षा जास्त सदस्यांना विधिमंडळात पाठवले होते. नाशिक-इगतपुरी हा देशातील एकमेव तीन सदस्यीय विधानसभा मतदारसंघ होता. १९५२ मध्ये मोरारजी देसाई हे मुंबईचे पहिले मुख्यमंत्री झाले. १९५५-५६ मध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीने जोर धरल्यावर, बॉम्बे (मुंबई) शहरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १०० हून अधिक आंदोलक मारले गेले. प्रखर टीकेला तोंड देताना, वलसाड येथील गुजराती असलेल्या मोरारजी देसाई यांची दिल्लीला रवानगी करण्यात आली आणि १९५६ मध्ये त्यांना केंद्रीय अर्थमंत्री करण्यात आले. त्यांच्यानंतर साताऱ्याचे यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने १९५७ च्या विधानसभा निवडणुकीत ३९६ पैकी २३४ जागा (३३९ मतदारसंघ) जिंकल्या.
१९६२ मध्ये महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने २६४ पैकी २१५ जागा जिंकल्या आणि मारोतराव शामशिओ कन्नमवार मुख्यमंत्री झाले. पुढील वर्षी त्यांच्या अकाली निधनानंतर वसंतराव नाईक यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सुपूर्द करण्यात आले, जवळपास १२ वर्षे त्यांनी हे पद भूषवले. १९६७ च्या निवडणुकीत काँग्रेसला तमिळनाडू, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा व पश्चिम बंगालमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. परंतु, महाराष्ट्रात त्यांचे वर्चस्व कायम राहिले. नाईक यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने विधानसभेच्या २७० पैकी २०३ जागा जिंकल्या.
१९६९ मध्ये पक्षाची दोन गटांमध्ये विभागणी झाली. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील गटाने काँग्रेस (आर)ची स्थापना केली आणि उर्वरित पक्ष काँग्रेस (ओ) म्हणून ओळखला जाऊ लागला, ज्याचे नेतृत्व मोरारजी देसाई आणि के. कामराज करत होते. काँग्रेस (ओ)ला सिंडिकेट म्हणूनही ओळखले जायचे. काँग्रेस (ओ)ने अनेक राज्यांमध्ये विजय मिळवला; परंतु १९७२ च्या निवडणुकीत महाराष्ट्र विधानसभेत त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. दुसरीकडे इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने त्या निवडणुकीत २७० पैकी २२२ जागा जिंकल्या. फेब्रुवारी १९७५ मध्ये आणीबाणीच्या घोषणेच्या काही आठवडे आधी मुख्यमंत्री नाईक यांची जागा शंकरराव चव्हाण यांनी घेतली. शंकरराव चव्हाण हे इंदिरा गांधी आणि त्यांचे पुत्र संजय गांधी यांचे निकटवर्तीय होते आणि ते आणीबाणीच्या काळात मुख्यमंत्री राहिले होते.
मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा खेळ
१९७७ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसविरोधी लाटेने उत्तर भारतात धुमाकूळ घातला. इंदिराजींच्या काँग्रेसने महाराष्ट्रातील ४८ पैकी २० जागा जिंकल्या. त्यांच्याकडे जनता पक्षापेक्षा एक जागा अधिक होती. शंकरराव चव्हाण यांनी राज्यातील जागा गमावल्याची जबाबदारी स्वीकारली आणि राजीनामा दिला. पुढे त्यांची जागा सांगलीचे आमदार वसंतदादा पाटील यांनी घेतली. केंद्रातील जनता पक्षाच्या राजवटीने नऊ राज्यांतील सरकारे बरखास्त केली. राज्यात १९७८ च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा फूट पडली आणि नवीन काँग्रेस (यू) गट तयार झाला, ज्याचे नेतृत्व कर्नाटकचे नेते देवराज उर्स यांनी केले. उर्स यांच्या काँग्रेस (यू)ने २८८ पैकी ६९ जागा जिंकल्या; तर इंदिरा गांधींच्या काँग्रेसने ६२ आणि जनता पक्षाने ९९ जागा जिंकल्या. बहुमताच्या जवळपास कोणताही पक्ष पोहोचू न शकल्याने, दोन काँग्रेस गटांच्या युतीचे नेतृत्व करीत वसंतदादा पाटील पुन्हा मुख्यमंत्री झाले.
हे सरकार मात्र चार महिन्यांतच पडले. शरद पवार यांनी त्यावेळी काँग्रेस (समाजवादी) पक्ष स्थापन करण्यासाठी काँग्रेस सोडली आणि जुलै १९७८ मध्ये महाराष्ट्राचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री होण्यासाठी जनता पक्षाशी हातमिळवणी केली. दरम्यान, जनता पक्ष केंद्रात चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला आणि जानेवारी १९८० मध्ये इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्या. त्यांनी लगेचच पवारांचे सरकार बरखास्त केले आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १८६ जागा जिंकल्या आणि काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आला. जूनमध्ये ए. आर. अंतुले महाराष्ट्राचे पहिले व एकमेव मुस्लिम मुख्यमंत्री झाले. पुढचे दीड दशक काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी संगीत खुर्चीचा खेळ खेळला. काँग्रेसने महाराष्ट्रात १९८५ मध्ये १८५ आणि १९९० मध्ये १४१ जागा जिंकल्या. त्या काळात अंतुले, बाबासाहेब भोसले, वसंतदादा पाटील, शिवाजीराव पाटील-निलंगेकर, शंकरराव चव्हाण, शरद पवार (१९८६ मध्ये काँग्रेसमध्ये परतल्यानंतर दोनदा) आणि सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री राहिले. हा काळ भ्रष्टाचाराचे घोटाळे, कामगार संघटनेतील अशांतता, बॉम्बे (मुंबई)मध्ये गुन्हेगारी टोळ्यांचा उदय आणि जातीय तणाव यांचा होता.
हिंदुत्वाचा उदय
या वातावरणातच राज्यात हिंदुत्वाच्या उदयाला सुरुवात झाली. राजकीय व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ मध्ये शिवसेना स्थापन केली आणि पक्षाचा पहिला आमदार १९७२ मध्ये निवडून आला. शिवसेना सुरुवातीच्या काळात वसंतदादा पाटील यांच्याजवळ होती. परंतु, १९८० मध्ये भाजपाच्या जन्मानंतर दोन्ही पक्ष एकमेकांचे चांगले मित्र झाले. १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने १६ जागा जिंकल्या; तर शिवसेनेला आपले खातेही उघडता आले नाही. परंतु, १९९० पर्यंत दोन्ही पक्षांची संख्या अनुक्रमे ५२ आणि ४२ जागांवर पोहोचली होती. १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडणे आणि त्यानंतर बॉम्बे (मुंबई) येथे झालेल्या जातीय दंगली आणि बॉम्बस्फोट मालिकांनी हिंदुत्वाच्या उदयाला आणखी चालना दिली.
१९९५ मध्ये महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युती सत्तेवर आली. त्यांनी अनुक्रमे ७३ आणि ६५ जागा जिंकल्या. शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि भाजपाचे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री. या विजयाचे श्रेय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपाचे प्रमोद महाजन यांना देण्यात आले होते. काँग्रेसने त्यावेळी ८० जागा जिंकल्या. १९९८ च्या लोकसभा निवडणुकीनंतर जोशी केंद्रात गेले आणि ठाकरे यांनी नारायण राणे यांची निवड केली. १९९९ मध्ये शिवसेना-भाजपाच्या साडेचार वर्षांच्या सत्तेनंतर राज्यात मुदतपूर्व निवडणूक घेण्यात आली.
काँग्रेसचे पुनरागमन
दरम्यान, १९९९ मध्ये काँग्रेसचे नेतृत्व सोनिया गांधी यांच्या हाती आले. सोनिया गांधी पक्षाच्या नेत्या झाल्या आणि नंतर शरद पवारांनी पुन्हा एकदा काँग्रेसपासून फारकत घेतली. पी. ए. संगमा व तारिक अन्वर यांच्याबरोबर पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यामुळे १९९९ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना-भाजपा यांच्यात त्रिपक्षीय लढत झाली. राष्ट्रवादीने ५८, काँग्रेस ७५, शिवसेनेला ६९ व भाजपाला ५६ जागा मिळालया. शिवसेना-भाजपा युती बहुमताचा आकडा गाठण्यात कमी पडल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले आणि काँग्रेसचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले; तर राष्ट्रवादीचे छगन भुजबळ उपमुख्यमंत्री झाले. या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने पुढील १५ वर्षे राज्यावर राज्य केले. या काळात देशमुख दोन वेळा (१९९९-२००३, २००४-०५) मुख्यमंत्री झाले. तसेच, सुशीलकुमार शिंदे (२००३-०४), अशोक चव्हाण (२००९-१०) व पृथ्वीराज चव्हाण (२०१०-१४) यांनीही मुख्यमंत्रिपद भूषवले.
मोदी आणि महाराष्ट्र
२०१४ मध्ये विधानसभा निवडणूक झाली तेव्हा ठाकरे, महाजन व मुंडे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील तीन प्रमुख चेहरे होते. भाजपाच्या प्रचाराचे नेतृत्व नितीन गडकरी आणि अमित शाह करीत होते आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे प्रभारी होते. देमोदी लाटेचा परिणाम होऊन भाजप निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला. निवडणुकीनंतर जवळपास महिनाभर नाट्य रंगलं. त्यानंतर शिवसेनेने भाजपने स्थापलेल्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. भाजपाने एकट्याने १२२ जागा जिंकल्या; तर शिवसेनेने ६६ जागा जिंकल्या आणि भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु, या कार्यकाळाच्याशेवटच्या काळात सहकारी पक्षांमध्ये मतभेद होऊ लागले. दोन्ही पक्षांमध्ये समान हिंदुत्वाचा आधार होता. मात्र, संपूर्ण देशावर वर्चस्व गाजविण्याच्या भाजपाच्या महत्त्वाकांक्षेमुळे शिवसेनेला असुरक्षित वाटत होते. तरीही २०१९ च्या निवडणुकीनंतर सरकार स्थापन करण्यास भाजपा आणि शिवसनेने पुरेशा जागा जिंकल्या. निवडणुकीत भाजपाला १०५ आणि शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या.
त्यानंतर शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु, शिवसेनेचे जुने निष्ठावंत असलेल्या एकनाथ शिंदे यांनी भाजपाशी युती केल्याने हे सरकारही पडले. एकनाथ शिंदे स्वतः मुख्यमंत्री झाले आणि फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. त्यांना अजित पवार यांनी पाठिंबा दिला. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून, फडणवीस यांच्याबरोबर आले आणि उपमुख्यमंत्री झाले. महायुतीच्या सरकारने कार्यकाळ पूर्ण केला. या वर्षाच्या सुरुवातीला शंकरराव चव्हाण यांचे पुत्र व काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.