पेट्रोल-डिझेलचे दर ज्या वेगाने वाढतायत, त्याच वेगाने सामान्यांचा खिसा देखील रिकामा होऊ लागला आहे. त्यामुळे खासगी गाडीपेक्षाही सार्वजनिक वाहनानेच प्रवास करण्याकडे हळूहळू कल वाढू लागला आहे. मात्र, शेवटी ही सार्वजनिक वाहनं देखील कुठे ना कुठे तरी कार्बनच्या उत्सर्जनामध्ये हातभारच लावतात. त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची बरीच चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील वीजेवर चालणाऱ्या वाहनांचा आग्रह धरला आहे. पण आपली सध्याची पेट्रोल-डिझेल किंवा सीएनजीवर चालणारी वाहनं इलेक्ट्रिक झाली तर नेमका आपल्याला काय फायदा होणार आहे? आणि ज्यासाठी ही चर्चा सुरू करण्यात आली, त्या पर्यावरणावर त्याचा असा किती सकारात्मक परिणाम होणार आहे? जाणून घेऊया…!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कार्बन उत्सर्जन एक पंचमांश प्रमाणात कमी होईल!

जर रस्त्यावर धावणाऱ्या सर्व कार या पेट्रोल-डिझेल किंवा सीएनजीवरून इलेक्ट्रिक झाल्या तर कार्बन उत्सर्जन तब्बल एक पंचमांशने कमी होईल. याचा अर्थातच जागतिक तापमान वाढ कमी होण्यास हातभार लागेल. शिवाय याचा आर्थिक फायदा देखील होईल. नैसर्गिक इंधनाचे जर कमी-जास्त होण्यामुळे किंवा कुठल्याशा युद्धामुळे होणाऱ्या इंधन दरवाढीचा आपल्या आर्थिक गणितावर तितकासा परिणाम होण्याची शक्यता कमी होईल!

आताशा फक्त कारच नाही तर सर्वच प्रकारची वाहतूक साधने इलेक्ट्रिक उर्जेवर चालवण्याचे प्रयोग यशस्वी होऊ लागले आहेत. मग ते इलेक्ट्रिक कार, बसपासून ट्रेन, ट्रॅक्टर आणि अगदी अवजड ट्रक देखील वीजेवर चालवता येणं शक्य झालं आहे. पण या बदलाचे व्यापक सकारात्मक परिणाम हवे असतील, तर त्यासाठी आपल्या वाहतूक व्यवस्थेमध्ये अधिकाधिक प्रमाणात इलेक्ट्रिक प्रणालींचा वापर होणं आवश्यक आहे.

विश्लेषण : स्पाईस जेट टर्ब्युलन्समध्ये १४ प्रवासी जखमी; दोघे चिंताजनक; पण टर्ब्युलन्स म्हणजे काय, त्यामागील कारणं काय?

इलेक्ट्रिकच का? आणि आत्ताच का?

खरंतर इलेक्ट्रिक वाहनं हा काही आत्ताचाच प्रकार नाही. जवळपास सव्वाशे वर्षांपासून ही वाहनं जगात अस्तित्वात आहेत. १९व्या शतकात अमेरिकेतील जवळपास एक तृतियांश वाहनं इलेक्ट्रिक होती म्हणे! पण अवाढव्य किमती आणि या वाहनांमधील बॅटरीचं वजन यामुळे हळूहळू ही वाहनं मागे पडत गेली. पण कालांतराने वजनाने हलक्या अशा लिथियम बॅटरींचा शोध लागला आणि सगळं चित्रच पालटलं.

या नव्या शोधामुळ इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादकांना फायदा झाला. स्वस्तातले सौर ऊर्जा उपकरणं आणि इलेक्ट्रिक वाहनांमधील स्वस्त बॅटरी यामुळे विजेवर वाहन चालवणं नैसर्गिक इंधनापेक्षाही स्वस्त वाटू लागलं आहे. यासाठी लागणाऱ्या साध्या इंजिन प्रकारामुळे देखील वाहनाचा देखभाल खर्च कमी झाला आहे.

खासगीच नाही, सार्वजनिक वाहतुकीसाठीही इलेक्ट्रिक पर्याय!

फक्त खासगी कार किंवा दुचाकीसाठीच इलेक्ट्रिक प्रणाली उपयुक्त नसून गेल्या दोन दशकांमध्ये ट्रेन, ट्राम यामध्ये देखील रिजनरेटिव्ह ब्रेकिंग प्रणालीसारख्या गोष्टींचा वापर सुरू झाला आहे. आता सर्व इलेक्ट्रिक कारमध्ये या प्रणालींचा वापर होत आहे. यामुळे इंधनाची मोठ्या प्रमाणावर बचत होते.

विश्लेषण : फिल्टर न वापरता समुद्राच्या पाण्याचे पिण्याच्या पाण्यात रूपांतर करणारे उपकरण कसे काम करते?

इलेक्ट्रिक वाहनांचं युग सुरू झालंय!

तुम्ही जर आसपास पाहिलं, तर तुम्हालाही हे पटेल की आता इलेक्ट्रिक वाहनांचं युग सुरू झालंय. फक्त ते पूर्णांशानं कधी अस्तित्वात येईल, हेच पाहावं लागेल. अनेक मोठ्या शहरांमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर दिसू लागल्या आहेत. यामुळे लोकांना कमी अंतराचा प्रवास वेगाने आणि स्वस्तात करणं शक्य होत आहे. अनेक कुटुंबं तर दुसरी कार घेण्यापेक्षा इलेक्ट्रिक स्कूटर्सला प्राधान्य देताना दिसत आहेत.

जागतिक स्तरावर पाहायचं झाल्यास सध्या छोट्या इलेक्ट्रिक गाड्या अर्थात स्कूटर, बाईक्स यांची बाजारपेठ वर्षाला १७ टक्के इतक्या वेगाने वाढते आहे. तसेच, सध्या ५० बिलियन डॉलर्स इतका असणारा व्यवसायाचा पसारा २०३०पर्यंत चौपट होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सरकारची फारशी मदत नसताना देखील ऑस्ट्रेलियामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वेगाने वाढते आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Electric vehicles ev benefits how public transport can be shift from petrol diesel pmw