Why are electric cars so expensive: भारतासह जगातील सर्वच देशांना प्रदूषण आणि महागडे पेट्रोल-डिझेल यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे आणि यामुळेच हरित ऊर्जेला प्रोत्साहन दिल्याने जगातील बहुतांश देश इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या मोबिलिटीकडे लोक भविष्य म्हणून पाहू लागले आहेत. सध्या ऑटो क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत चालली आहे. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये कार असो किंवा बाईक ग्राहक याकडे आकर्षित होत आहेत. जगभरातले लोक आता पर्यावरणासाठी जागरूक झाले आहेत. त्यामुळेच इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. भारतात या गाड्यांच्या प्रती जागृती व्हायला वेळ लागेल. पण, जगभरात या गाडीला लोकांनी पसंती देत आपलं वाहन केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतासह जगभरात इलेक्ट्रिक कारची वाढली मागणी

भारतात जगातील तिसरे सर्वात मोठे ऑटोमोबाईल मार्केट आहे. देशांतर्गत मार्केटमध्ये विविध सेगमेंटमध्ये विविध प्रकारच्या कार उपलब्ध आहेत. भारतासह जगभरात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढतेय. अशातच ऑटोमोबाईल कंपन्या दुचाकी वाहनापासून ते चारचाकी वाहनापर्यंत सगळेच इलेक्ट्रिक वाहन बनवण्याच्या तयारीत आहेत आणि स्वस्त आणि महागड्या इलेक्ट्रिक कार लाँच करत आहेत. भारतामधील अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांना अधिक पसंती देत असल्याचे दिसत आहे. तसेच सरकार EVs ला प्रोत्साहन देण्यासाठी बरेच प्रयत्न करत आहे. पण इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याच्या घटनाही सातत्याने समोर येत आहेत, हेही तितकंच खरं आहे. इलेक्ट्रिक स्कूटर, कारमध्ये आग लागण्याची अनेक प्रकरणं आतापर्यंत समोर आली आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या विश्वासार्हतेबाबतही लोकांना प्रश्न आहेत.

आज, ईव्ही खरेदी करणार्‍यांची संख्या खूप वेगाने वाढत आहे, तर बरेच लोक याची किंमत जास्त असल्यामुळे ही वाहने खरेदी करु शकत नाहीत. इलेक्ट्रिक कार सामान्यत: महाग असतात. इलेक्ट्रिक वाहने बहुधा नॉन-इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा अधिक महाग असतात. इलेक्ट्रिक वाहनांचा बाजारातील वाटा वाढला आहे, यात शंका नाही. पण हे ही तितकेच खरं आहे की, इलेक्ट्रिक कार महाग असल्याने सामान्य माणसाला खरेदी करणे तितकेच परवडत नाहीये. अशा परिस्थितीत, इलेक्ट्रिक कार इतक्या महाग का असतात, असा प्रश्न आता आपल्यासमोर निर्माण झाला आहे, याच प्रश्नांचं निरसन करण्याचा प्रयत्न आम्ही या लेखाद्वारे करणार आहोत. चला जाणून घेऊया यामागची नेमकी कारणे काय आहेत… 

इलेक्ट्रिक वाहनं कसं काम करतात?

बाजारात दररोज अनेक नवीन इलेक्ट्रिक वाहनं लाँच केली जातात. इलेक्ट्रिक वाहनं लिथियम-आयन बॅटरी पॅक किंवा निकेल-मेटल हायड्राइडद्वारे चालवली जातात. ज्याप्रमाणं एखादा मोबाईल फोन बॅटरीवर काम करतो, अगदी त्याच प्रमाणं ही वाहनं काम करतात. इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी युनिटमध्ये शेकडो सुटे-सुटे सेल असतात. त्यांच्यापासून चासिसच्या आतमध्ये असणारी अखंड बॅटरी तयार केली जाते. या बॅटरी युनिटची क्षमता मोजण्यासाठी किलोवॅट परअवर्स (kWh) या एककाचा वापर करतात. ज्या प्रमाणं पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमध्ये इंटर्नल कॉम्ब्युशन इंजिन (ICE) क्षमतेचा विचार केला जातो अगदी त्याच पद्धतीनं इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बॅटरी क्षमतेचा विचार केला जातो. बॅटरी क्षमता जितकी जास्त असेल तितकी वाहनाची रेंज जास्त असते.

इलेक्ट्रिक कार इतक्या महाग का असतात?

आपण जर इलेक्ट्रिक कारची पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या कारशी तुलना केली, तर इलेक्ट्रिक वाहन पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या कारपेक्षा अधिकच महाग असतात. इलेक्ट्रिक वाहनाच्या जास्त किमतीचे कारण म्हणजे त्याची बॅटरी. कोणत्याही ईव्हीच्या एकूण किमतीच्या ५० टक्के रक्कम ही त्यात बसवलेली बॅटरी असते. याव्यतिरिक्त, वेगवान चार्जिंग पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी अधिक खर्च येतो, ज्यामध्ये AC आणि DC दोन्ही चार्जर समाविष्ट आहेत. हे दोन्ही ईव्हीचे मुख्य घटक आहेत आणि त्यांच्या महागड्या किमतीमुळे, ईव्ही उत्पादन खर्च अधिक आहे, ज्यामुळे ईव्हीच्या किमती इंधनावर चालणाऱ्या वाहनांपेक्षा जास्त आहेत.

जर बॅटरीची किंमत कमी झाली तर ईव्हीची एकूण किंमत नक्कीच कमी होऊ शकते. गेल्या वर्षीच्या तुलनेत बॅटरीच्या किमतीत घट झाली आहे. येत्या काही वर्षांत हा आकडा आणखी वाढेल, जिथे EVs परवडतील अशी अपेक्षा आहे. हा विभाग योग्यरित्या विकसित होण्यासाठी काही वर्षे लागतील. भारत सरकार इलेक्ट्रिक वाहन विभागाला प्रोत्साहन देण्यासाठी सबसिडी देखील देत आहे. त्याच वेळी, अलीकडच्या काळात अनेक इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांनीही त्यांच्या वाहनांच्या किमती कमी केल्या आहेत. ज्यामध्ये Ola, Ather आणि Hero सारख्या EV कंपन्यांच्या नावांचा समावेश आहे.

वाहन विषयक तज्ज्ञ ओंकार भिडे सांगतात, इलेक्ट्रिक गाड्यांची टेक्नॉलॉजी सुरुवातीच्या टप्प्यात आहे. तिचा विकास व्हायला अजून बराच वेळ लागणार आहे. तसेच यासाठी लागणारा विशेषता बॅटरीचा कच्चा माल आयात करावा लागतो. मागणी मर्यादित असल्यामुळे घाऊक निर्मिती नाही. त्यामुळेच पेट्रोल-डिझेल गाड्या यांच्या तुलनेत इलेक्ट्रिक गाड्या महाग आहेत. भविष्यात कंपन्यांमध्ये स्पर्धा होण्याबरोबरच मागणी वाढल्यास यांच्या किमतीत घट होऊ शकते. पण, नजीकच्या काळात यात फार मोठा बदल होण्याची शक्यता कमी आहे.

खरंतर इलेक्ट्रिक कार मार्केट अजूनही नुकतीच सुरू झालेली नवीन बाजारपेठ आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत इलेक्ट्रिक कार बाजारात फारशी स्पर्धा नाही. वाढत्या स्पर्धेमुळे इलेक्ट्रिक कारचे तंत्रज्ञानही स्वस्त होऊ शकते. स्पर्धा आणि उत्पादन वाढल्यानंतर इलेक्ट्रिक कारच्या किमती कमी होऊ शकतात.

इलेक्ट्रिक कारमध्ये कुठल्या बॅटरीचा वापर होतो?

बॅटरी हा कोणत्याही इलेक्ट्रिक कारचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. या बॅटरीशिवाय कारला काही अर्थ उरत नाही. या इलेक्ट्रिक बॅटरीद्वारे कारच्या मोटरला पॉवर मिळते. इलेक्ट्रिक वाहनांसह त्यामधील बॅटरीदेखील खूप चर्चेत आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा परफॉर्मन्स, सुरक्षा आणि त्यांची किंमत या गोष्टी त्या वाहनामध्ये वापरण्यात आलेल्या बॅटरीवरून ठरवल्या जातात. बॅटरीच्या आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, सर्वसामान्यपणे इलेक्ट्रिक कारमध्ये लिथियम आयन बॅटरी वापरली जाते. स्मार्टफोन, लॅपटॉप आणि तत्सम इलेक्ट्रॉनिक गॅझेट्समध्येही अशाच प्रकारची बॅटरी वापरलेली असते. कारची क्षमता वेगवेगळी असते त्यानुसार बॅटरी वापरली जाते आणि चार्जिंगचा वेळ निश्चित केला जातो. कुठल्याही इलेक्ट्रिक कारची बॅटरी ही दीर्घकाळ टिकण्याच्या दृष्टीनेच तयार केलेली असते.

किती असतं बॅटरीचं आयुष्य?

विविध कंपन्या विविध दावे करतात. मात्र, इलेक्ट्रिक कारची ‘बॅटरी लाईफ’ सरासरी आठ ते दहा वर्षे इतकं आहे. समजा किलोमीटरमध्ये समजून घ्यायचं असेल तर सुमारे १ लाख ते १ लाख ५० किमी पर्यंत ही बॅटरी चालू शकते. अर्थात ती चार्ज करावी लागतेच कारण हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की कुठलीही बॅटरी कायमस्वरुपी टिकत नाही. तुम्ही इलेक्ट्रिक कार घेतली आणि ती वर्षभर उभी ठेवली तरीही एक दिवस असा येणार आहेच की तुम्हाला तिची बॅटरी बदलावी लागेल.

वाहन विमा महाग

डिझेल-पेट्रोल कार विम्यापेक्षा इलेक्ट्रिक वाहन विमा देखील महाग आहे. याचे कारण म्हणजे, इलेक्ट्रिक वाहने खूप महाग असतात कारण ते उच्च तंत्रज्ञान आणि उच्च क्षमतेच्या बॅटरी वापरतात. डिझेल-पेट्रोल कारच्या तुलनेत इलेक्ट्रिक कारचे पार्ट कमी असतात, पण जास्त महाग असतात. त्याच वेळी, या कारच्या बॅटरी देखील खूप महाग आहेत. पण येत्या काळात इलेक्ट्रिक वाहनं स्वस्त होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Electric vehicles why are they expensive in india heres what experts have to say ltdc pdb
Show comments