एआयला कुठलाही प्रश्न विचारला, तर त्याचे मुद्देसूद उत्तर आपल्याला मिळेल, याची हमी वाटण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे चॅटजीपीटी, जेमिनी, ग्रॉक या चॅटबॉटचा वापरदेखील वाढत चालला आहे. भारतात ग्रॉक एआयवर बंदी कधी येणार, हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून एक्सवरील भारतीय वापरकर्त्यांकडून विचारला जात आहे. वेगवेगळ्या प्रश्नांची भन्नाट उत्तरे दिल्याने काही दिवसांपासून हा चॅटबॉट चर्चेत आला आहे. या चॅटबॉटकडून अभद्र भाषेचाही वापर करण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या बंदीची मागणी केली जात आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये एलॉन मस्क यांच्या एक्सएआयने ग्रॉक ३ एआय चॅटबॉट मोफत वापरता येणार असल्याची घोषणा केली होती. ग्रॉक एआय चर्चेत येण्याचे नेमके कारण काय? हे चॅटबॉट इतर चॅटबॉट्सपेक्षा वेगळे कसे? त्याच्या अभद्र भाषेसाठी कारणीभूत कोण? आणि ग्रॉक एआयच्या उत्तरांवर विश्वास ठेवावा का? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

‘ग्रॉक एआय’भोवतीचा वाद काय?

ग्रॉक एआय हे चॅटबॉट युजरने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अवघ्या काही सेकंदांत देते. प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी ग्रॉक एआय ट्रेनिंग आणि रिअल-टाइम टूल्सचा वापर करते. परंतु, उत्तरांमध्ये हिन्दी भाषेतील काही आक्षेपार्ह शब्दांचा आणि महिलांबद्दलच्या द्वेषपूर्ण अपशब्दांचा वापर केल्याने हे चॅटबॉट वादात अडकले आहे. विशेष म्हणजे ग्रॉक एआयला पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर संबंधित राजकीय विषयांबद्दलचे प्रश्न मोठ्या प्रमाणात विचारले जात आहेत. त्यावरील उत्तरांवरूनही मोठी खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे.

ग्रॉक एआयभोवतीचा वाद वाढत असताना, त्याच्या खळबळजनक एआयशी आधारित उत्तरांनी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाचेदेखील लक्ष वेधले आहे. “आम्ही संपर्कात असून, आम्ही ‘एक्स’बरोबर समन्वय साधत आहोत. हे का घडत आहे, समस्या काय आहेत हे जाणून घेत आहोत. तेदेखील आमच्याशी संवाद साधत आहेत,” असे आयटी मंत्रालयाच्या एक अधिकाऱ्याने ‘पीटीआय’ला सांगितले. ग्रॉकच्या वादग्रस्त व राजकीयदृष्ट्या संवेदनशील उत्तरांची दखल आयटी मंत्रालयाने घेतली आहे.

ग्रॉक एआय हे चॅटबॉट युजरने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अवघ्या काही सेकंदांत देते. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी (सीआयएस)चे सह-संस्थापक प्रणेश प्रकाश यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “जर सरकार आक्षेप घेत असल्याने कंपन्या पूर्णपणे कायदेशीर भाषणावर सेल्फ-सेन्सॉरशिप लावत असतील, तर ते चिंतेचे कारण आहे. याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भयानक परिणाम होईल,” असे ते म्हणाले. दरम्यान, या वादाने एआयद्वारे व्युत्पन्न चुकीची माहिती, कंटेंट मॉडरेशनची आव्हाने, सुरक्षा उपायांची आवश्यकता यांसारखे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत.

ग्रॉक हे इतर एआय चॅटबॉट्सपेक्षा वेगळे कसे?

‘ग्रॉक’ हे नाव रॉबर्ट ए हेनलेन यांच्या ‘स्ट्रेंजर इन अ स्ट्रेंज लँड’ या विज्ञानकथेतील एका पात्रावरून आले आहे. मस्क यांच्या मते, याचा अर्थ एखादी गोष्ट पूर्णपणे आणि सखोलपणे समजून घेणे, असा होतो. परंतु, मस्क यांनी ओपनएआयच्या चॅटजीपीटी आणि गूगलच्या ‘जेमिनी’सारख्या चॅटबॉट्सना ‘अँटी-वेक’ पर्याय म्हणून ग्रॉकची जाहिरात केली आहे. ग्रॉककडे एक्सवरील डेटा (जसे की वापरकर्त्यांद्वारे सार्वजनिक पोस्ट) शोधण्याची आणि वापरण्याची विशिष्ट क्षमता आहे. विशेष म्हणजे इतर चॅटबॉटच्या तुलनेत ग्रॉक कात्री न लावता प्रश्नांची उत्तरे देते. त्यादरम्यान असभ्य भाषेचाही वापर होतो.

यात प्रीमियम वापरकर्त्यांना ‘अनहिंग्ड’ मोडदेखील दिले जाते; ज्यामुळे ग्रॉक आक्षेपार्ह, अनुचित भाषेचा वापर करतो, असे त्यांच्या स्वतःच्या वेबसाइटवर सांगण्यात आले आहे. ग्रॉक विनोदी शैलीने तयार केल्याचा आरोप करीत सार्वजनिक धोरण फर्म द क्वांटम हब (TQH) चे संस्थापक भागीदार रोहित कुमार यांनी एआय चॅटबॉटद्वारे ‘एक्स’वर हानिकारक सामग्रीच्या थेट होणाऱ्या वाढत्या प्रसाराबद्दल चिंता व्यक्त केली. “माझ्या मते, ग्रॉकच्या वादात सर्वांत मोठी समस्या त्याचे आउटपुट नाही, तर ‘एक्स’बरोबर त्याचे एकत्रीकरण आहे. ते थेट सोशल मीडियाशी जोडले असल्याने चुकीच्या माहितीचा सहज प्रसार होऊ शकतो. त्याचा परिणाम दंगलींच्या स्वरूपात लोकांवर होऊ शकतो,” असे रोहित कुमार म्हणाले.

जर वापरकर्त्यांना ग्रॉकची उत्तरे विश्वासार्ह वाटत असतील, तर यामुळे नुकसान वाढू शकते. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पाच अमेरिकन परराष्ट्रमंत्र्यांनी एलॉन मस्क यांना एक खुले पत्र लिहिले होते. २०२४ च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी अनेक राज्यांसाठी मतदानाच्या अंतिम मुदतीबद्दल वापरकर्त्यांना चुकीची माहिती पुरवल्याचे वृत्त आल्यानंतर ग्रॉकला कोर्स-करेक्शन करण्याचे आवाहन या पत्राद्वारे करण्यात आले होते.

एआय चॅटबॉट्स हे मनुष्य नाहीत. त्यामुळे त्यांना स्पष्टपणे भाषण स्वातंत्र्य अधिकार दिले जाऊ शकत नाहीत. मात्र, दिल्लीस्थित टेक पॉलिसी थिंक टँक असलेल्या एस्या सेंटरच्या संचालक मेघना बाल म्हणाल्या की, मानवी किंवा एआय आधारित भाषणात कायदेशीर मर्यादा ओलांडल्या गेल्याचे लक्षात आल्यास, ते विचारात घेतले पाहिजे. “आपण प्रथम विचार करावा की, ते संविधानानुसार भाषणावरील परवानगी असलेल्या निर्बंधांच्या कक्षेत येते का? त्यानंतर देशातील भाषण नियंत्रित करणाऱ्या वेगवेगळ्या कायद्यांनुसार कुठे आणि कसे मर्यादा ओलांडत आहे, हे पाहिले पाहिजे. ग्रॉकला त्याच्या असभ्य प्रतिसादांसाठी फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागेल का, यावर बोलताना बाल म्हणाल्या की, जर जाणूनबुजून दुर्लक्ष झाले असेल आणि एआय चॅटबॉटकडून आउटपुट नियंत्रित करण्यासाठी कोणतेही उपाय केले नसतील, तर हा जबाबदारीचा विषय आहे.

एआयशी आधारित उत्तरांसाठी जबाबदार कोण?

एआय मॉडेल्स तयार करणाऱ्यांना यासाठी जबाबदार धरले पाहिजे का, हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. मात्र, बाल म्हणाल्या की एआय सिस्टीमशी आधारित सामग्रीसाठी डिप्लॉयर्सना जबाबदार धरण्याची काही कायदेशीर उदाहरणे आहेत. गेल्या वर्षी एका ऐतिहासिक निर्णयात, एअर कॅनडाला एका दिवाणी न्यायालयाने त्यांच्या वेबसाइटवर एआय चॅटबॉटने तयार केलेल्या खोट्या परतावा धोरणाचे पालन करण्याचे निर्देश दिले होते.

खटल्यानुसार, एका प्रवाशाने एअर कॅनडाच्या एआय चॅटबॉटला तिकीटवरील सूटबद्दल विचारले होते. त्याला कळविण्यात आले होते की, तिकीट जारी केल्यापासून ९० दिवसांच्या आत सूट मिळवण्याकरिता तुम्ही तिकीट सादर करू शकता. परंतु, जेव्हा प्रवाशाने कमी भाड्यासाठी अर्ज केला तेव्हा त्याची विनंती नाकारण्यात आली. कारण- एअरलाइनचे सूट देण्याचे धोरण प्रवासानंतर लागू होत नव्हते. बाल यांनी नमूद केले की, एअर कॅनडा प्रकरणात न्यायालयाने एअरलाइनचा युक्तिवाद फेटाळून लावला होता. एआय चॅटबॉटने दिलेल्या माहितीसाठी ते जबाबदार नाहीत, असा युक्तिवाद त्यांनी केला होता.

‘ग्रॉक’वर विश्वास ठेवावा का?

एआयशी आधारित उत्तरांना अचूक माहिती मानले जाऊ शकत नाही. एआयशी आधारित उत्तरे खाद्याच्या सामाजिक-राजकीय श्रद्धा कितीही समाधानी करीत आणि कितीही योग्य वाटत असल्या तरी त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणे चुकीचे आहे. सरकारी तपासणीपासून सुरक्षित राहण्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म आधीच त्यांच्या एआय मॉडेल्सवर फिल्टर लावत आहेत. गेल्या वर्षी भारतातील लोकसभा निवडणुकीदरम्यान गूगलने सांगितले होते की, त्यांच्या आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (एआय) चॅटबॉट ‘जेमिनी’ला वापरकर्ते कोणत्या प्रकारचे निवडणूक-संबंधित प्रश्न विचारू शकतात यावर गूगल मर्यादा घालणार आहे. यापूर्वी, ओलाच्या भाविश अग्रवाल यांनी स्थापन केलेल्या भारतीय एआय स्टार्टअपने विकसित केलेला चॅटबॉट काही कीवर्ड सेल्फ-सेन्सॉर करीत असल्याचे दिसून आले होते. एक्सवर सर्वसाधारण युजर जसे बोलतात, त्याप्रमाणेच ग्रॉक एआयदेखील उत्तर देते आणि अनेक वेळा ते मर्यादा ओलांडतानाही दिसते.