Tesla boycott Dogequest controversy : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यामागचं कारण म्हणजे, मस्क यांच्या टेस्ला कंपनीला सायबर गुन्हेगार सातत्यानं लक्ष्य करीत आहेत. अगदी दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेत टेस्लांच्या अनेक गाड्यांना अज्ञातांनी आग लावली होती. या आगीचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून मस्क यांना लक्ष्य करण्यात आलं होतं. ही घटना ताजी असतानाच आता ‘डोजक्वेस्ट’ नावाच्या वेबसाइटनं अमेरिकेतील टेस्ला कार मालकांची वैयक्तिक माहिती लीक केली आहे, ज्यामुळे त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेवर एलॉन मस्क यांनी संताप व्यक्त केला असून सायबर गुन्हेगारांना इशारा दिला आहे.

टेस्ला कार मालकांची सुरक्षा धोक्यात?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीपासून टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क हे चांगलेच चर्चेत आले आहेत. ट्रम्प यांचे सरकार मस्क हेच चालवत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यादरम्यान, ‘डोजक्वेस्ट’ नावाच्या वेबसाइटनं अमेरिकेतील टेस्ला मालकांची नावं, त्यांचा रहिवासी पुरावा आणि फोन नंबर सार्वजनिक केले आहेत. इतकंच नाही तर वेबसाइटवर एक परस्परसंवादी नकाशादेखील प्रकाशित करण्यात आला आहे, ज्यावर टेस्ला डीलरशिप आणि चार्जिंग स्टेशनच्या स्थानांची माहिती देण्यात आली आहे. या डेटा लीकमुळे टेस्ला मालकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती वर्तवण्यात आली आहे.

आणखी वाचा : Mounjaro Injection : वजन कमी करण्यासाठी अमेरिकन उतारा? नव्या औषधाचे काय फायदे-तोटे?

सायबर हल्लेखोरांनी काय इशारा दिला?

सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, वेबसाइटवर कर्सर म्हणून पेट्रोल बॉम्बची बॉटलही दाखवण्यात आली आहे. टेस्ला कार मालकांनी त्यांची इलेक्ट्रिक कार विकली आहे, हे सिद्ध केल्यानंतरच त्यांची वैयक्तिक माहिती वेबसाइटवरून काढून टाकली जाईल, असा इशाराही सायबर हल्लेखोरांनी दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मस्क यांचे चांगले संबंध आहेत, त्यामुळे देशात राजकीय वाद निर्माण झाला आहे. अमेरिकेतील प्रशासनात मस्क हे हस्तक्षेप करत असल्याचा आरोप होत आहे. याच तणावाच्या पार्श्वभूमीवर ही वेबसाइट लाँच करण्यात आल्याची माहिती आहे.

टेस्ला प्रकरणावर मस्क काय म्हणाले?

दरम्यान, टेस्ला कार मालकांची माहिती लीक करण्याबरोबरच सायबर गुन्हेगारांनी अमेरिकन सरकारी विभाग DOGE च्या कर्मचाऱ्यांची खाजगी माहितीही सार्वजनिक केली आहे. टेस्ला कार मालकांचा डेटा कुठून लीक झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर एलॉन मस्क यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. त्यांनी या सायबर हल्ल्याला देशांतर्गत दहशतवाद असं संबोधलं आहे. टेस्लाची बदनामी करण्यासाठी अशा धमक्या देणे हा एक गंभीर गुन्हा आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असंही मस्क यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

‘डोजक्वेस्ट’ वेबसाइट कोण चालवतंय?

टेस्लाच्या मालमत्तेवर होणाऱ्या तोडफोड आणि जाळपोळीच्या हल्ल्यांमध्ये वाढ होत असतानाच ‘डोजक्वेस्ट’ या ऑनलाइन स्थळावरूनही मस्क यांना लक्ष्य केलं जात आहे. या वेबसाइटवरील मजकुराचा आणि टेस्ला कंपनीच्या कार जाळपोळीचा काही संबंध आहे का, ही बाब अद्याप उघड झालेली नाही. मात्र, या घटनेनंतर अमेरिकेतील संघीय अधिकाऱ्यांनी प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली आहे. एनबीसी न्यूजने वृत्त दिलं की, वेबसाइटच्या ऑपरेटर्सनी मीडिया चौकशीला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. या वेबसाइटच्या डोमेनची नोंदणी एका अनओळखी होस्टिंग सेवेद्वारे लपवण्यात आलेली आहे.

टेस्ला कारमालक काय म्हणाले?

टेस्ला कारमालकांनीही लीक झालेल्या डेटाची पुष्टी केली आहे. काहींच्या मते, ‘डोजक्वेस्ट’ वेबसाइटवर सार्वजनिक झालेली त्यांची माहिती अचूक आहे; तर इतरांनी ही माहिती जुनी किंवा चुकीची असल्याचं म्हटलं आहे. विशेष बाब म्हणजे, या वेबसाइटवर अमेरिकेतल्या संपूर्ण टेस्ला मालकांची संपूर्ण यादी दिसत नाही. ज्या शहरात टेस्लांच्या गाड्यांची संख्या जास्त आहे, त्याच शहरातील कारमालकांची माहिती वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आल्याचं सायबर पोलिसांनी सांगितलं आहे.

टेस्लाच्या शेअर्सची झपाट्याने घसरण

डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर मस्क यांची त्यांच्याबरोबर जवळीक वाढली. त्यानंतर टेस्लाच्या शेअर्समध्ये ५० टक्क्यांहून अधिक घसरण झाल्याची माहिती आहे, ज्यामुळे टेस्लाला जवळपास ८०० अब्ज डॉलर्सचा फटका बसल्याचं सांगितलं जात आहे. मस्क यांच्या ट्रम्प प्रशासनातील सहभागामुळे तसेच त्यांच्या वाढत्या ध्रुवीकरण करणाऱ्या राजकीय भूमिकांमुळे टेस्ला कंपनीच्या प्रतिष्ठेला धक्का बसला असं मत अमेरिकेतील राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे. मस्क यांच्यावरील गुंतवणूकदारांचा विश्वास कमी होत चालला आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा : मुघलांना सळो की पळो करणाऱ्या ताराबाईंचा इतिहास काय सांगतो?

मस्क यांना पायउतार होण्याचे आवाहन

टेस्लाचे सुरुवातीचे गुंतवणूकदार रॉस गर्बर यांनी मस्क यांना सीईओ पदावरून पायउतार होण्याचे जाहीर आवाहन केले आहे, कारण त्यांच्या राजकीय गुंतवणुकीमुळे कंपनीच्या ब्रँडचे मोठे नुकसान होत असल्याचं गर्बर यांनी म्हटलं आहे. “टेस्ला कारच्या विक्रीत प्रचंड घट होत आहे, हे एक संकट आहे, कंपनीच्या प्रमुखांची भूमिका वादग्रस्त असल्याने या कारची बाजारात चांगली विक्री होऊ शकत नाही, त्यामुळे मस्क यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा”, असं गर्बर यांनी स्काय न्यूजला सांगितलं.

‘टेस्ला’ विरोधात अमेरिकेत निदर्शन

तज्ज्ञांचे म्हणणं आहे की, टेस्लावरील हल्ल्यांची माहिती सुरूच राहील की थांबेल हे सांगणं कठीण आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातही, त्यांच्या विरोधकांनी न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टनसारख्या शहरांमध्ये तीव्र निदर्शनं केली होती. आता मस्क यांची टेस्ला कंपनी त्या निषेधांचे केंद्रबिंदू झाली आहे. गेल्या आठवड्यात न्यूयॉर्क शहरात सुमारे २५० निदर्शक टेस्ला शोरूमबाहेर जमले होते, त्यांनी मस्क यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतले. परंतु, त्यांच्यावरील गुन्ह्यांची माहिती सार्वजनिक केली नाही.

गुरुवारी २० मार्च रोजीही अमेरिकेत आंदोलनकर्त्यांनी मस्क यांच्याविरोधात आंदोलनं केली. टेस्ला जाळा, लोकशाही वाचवा, अमेरिकेत हुकूमशाही चालणार नाही, अशा घोषणा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिल्या. दरम्यान, अमेरिकेतील अधिकारी सध्या टेस्लाला लक्ष्य करणाऱ्या लोकांचा शोध घेत आहेत. ‘डोजक्वेस्ट’ वेबसाइट कोण चालवते, त्यावर आक्षेपार्ह मजकूर कुणी प्रसिद्ध केला, याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. या प्रकरणामुळे टेस्लाच्या शेअर्समध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.

Story img Loader