पूर्वी ‘ट्विटर’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘एक्स’ची खरेदी केल्यापासून एलॉन मस्क या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्ममध्ये सातत्याने बदल करीत आहेत. मात्र, अलीकडेच केलेल्या बदलामुळे वापरकर्त्यांची चिंता वाढली आहे. या प्लॅटफॉर्मवरील ब्लॉक फंक्शन हटविण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. याचा अर्थ असा आहे की, आता या प्लॅटफॉर्मवरून एखाद्याला पूर्णपणे ब्लॉक करता येणार नाही. या बदलामुळे एखाद्या व्यक्तीला खात्याच्या यादीतून ब्लॉक करता येईल; मात्र तरीही त्याला तुमच्या पोस्ट दिसू शकतील.

एलॉन मस्क यांनी ही घोषणा करणे फार आश्चर्यकारक नाही. कारण- त्यांनी यापूर्वीही या ब्लॉक फंक्शनबद्दल नापसंती व्यक्त केली होती. गेल्या वर्षी ते म्हणाले होते की, प्लॅटफॉर्मवरील या फंक्शनला काहीही अर्थ नाही. ब्लॉक फंक्शन काढून टाकण्याच्या एलॉन मस्क यांच्या निर्णयावर प्रत्येक जण आनंदी नाही. अनेकांनी या बदलांविषयी आपली चिंता व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, या बदलामुळे हा प्लॅटफॉर्म आणखी धोकादायक ठरेल. ब्लॉक फंक्शन नक्की काय आहे? वापरकर्त्यांच्या नाखुशीचे कारण काय? त्याविषयी जाणून घेऊ.

हेही वाचा : पाकिस्तानातून भिकाऱ्यांची निर्यात; सौदी अरेबिया प्रशासनाचं पित्त खवळलं, काय आहे प्रकरण?

ब्लॉक फंक्शन

एलोन मस्कच्या मालकीच्या ‘एक्स’ प्लॅटफॉर्मवरून आता ब्लॉक फंक्शन काढून टाकण्यात येणार आहे. या वैशिष्ट्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या सार्वजनिक पोस्ट पाहण्यापासून किंवा त्यात सहभागी होण्यापासून एखाद्या व्यक्तीला प्रतिबंधित करता येणे शक्य होते. परंतु, आता अवरोधित केलेली खाती पुन्हा एकदा तुमच्या पोस्ट पाहू शकणार आहेत; मात्र त्यांना या पोस्टवर लाइक्स, त्यावर प्रत्युत्तर देणे किंवा रीपोस्ट करता येणार नाही. गेल्या वर्षी मस्क यांनी हे वैशिष्ट्य पूर्णपणे काढून टाकण्याचे संकेत दिले होते. या वैशिष्ट्याविरुद्ध त्यांचा युक्तिवाद असा होता की, ब्लॉक करणे हा उपयुक्त पर्याय नाही. कारण- संबंधित व्यक्ती पोस्ट पाहण्यासाठी निनावी खातेही तयार करू शकते. अनेक जण मस्क यांच्या या निर्णयाशी सहमत आहेत आणि त्यांनी या निर्णयाचे स्वागतही केले आहे. उदाहरणार्थ- वेब डेव्हलपर निमा ओवजी म्हणाले की, कोणीही पर्यायी खाती तयार करू शकतो. त्यामुळे ब्लॉक पर्यायाचा काही उपयोग नाही. इतरांनी असेही निदर्शनास आणले की, ब्लॉक केलेले वापरकर्ते त्यांच्या ब्राउझरवर इनकॉग्निटो मोड (गुप्त प्रक्रिया) वापरून पोस्ट पाहू शकतात.

पूर्वी ‘ट्विटर’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘एक्स’ची खरेदी केल्यापासून एलॉन मस्क या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्ममध्ये सातत्याने बदल करीत आहेत. (छायाचित्र-रॉयटर्स)

या निर्णयाने ‘एक्स’ वापरकर्ते नाखूष का आहेत?

प्रत्येक जण मस्क यांच्या या निर्णयाने आनंदी नाही. ‘Nzube Udezue’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका ‘एक्स’ वापरकर्त्याने लिहिले, “मला वाटते की, ही एक वाईट कल्पना आहे. दुर्दैवाने सोशल मीडियावर काही वाईट लोक आहेत, जे याचा गैरफायदा घेऊ शकतात.” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “माझ्या पोस्ट्स पाहण्यासाठी मी ब्लॉक केलेले लोक मला नको आहेत.” तिसऱ्या युजरनेही यावर प्रतिक्रिया देत लिहिले, “हे अजिबात चांगले नाही. बरेच लोक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून चुकीची दिसणारी खाती ब्लॉक करतात. तुम्ही तेच काढून घेतले आहे.”

यावरून ‘एक्स’वर मोठ्या संख्येने टिप्पण्या केल्या जात आहेत. एका ‘एक्स’ वापरकर्त्याने एलॉन मस्कला त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले आणि लिहिले, “एलॉन, या ॲपवर अशा तरुण अविवाहित स्त्रिया आहेत ज्या एकट्या राहतात आणि त्यांना अनेकदा गुंडगिरी, लैंगिक छळ किंवा थेट बलात्कार, हिंसाचाराची धमकी दिली गेली आहे. काहींना लहान मुलंही असतात. त्यांच्या सुरक्षिततेसाठी अन् आमच्यासाठी ब्लॉक फंक्शन अत्यावश्यक आहे.”

या निर्णयामुळे प्लॅटफॉर्म धोकादायक होणार का?

वापरकर्ते असा युक्तिवाद करतात की, ब्लॉक वैशिष्ट्य काढून टाकल्याने प्लॅटफॉर्मवरील लोकांचा विश्वास कमी होईल. त्यांचा असा युक्तिवाद आहे की, ब्लॉक फंक्शन काढून टाकल्याने, प्लॅटफॉर्ममधील नियंत्रणाचे वैशिष्ट्य नष्ट होईल. वापरकर्त्यांनी असेही म्हटले आहे की, ब्लॉक फंक्शन नसल्याने प्लॅटफॉर्मवर सुरक्षा हा एक मोठा चिंतेचा विषय ठरेल. त्यांचा असा युक्तिवाद आहे की, ब्लॉक फंक्शन ऑनलाइन छळ, गुंडगिरी किंवा धमक्यांचा सामना करणाऱ्या अनेकांना एक सुरक्षित कवच प्रदान करते. ते काढून टाकल्याने चुकीची व्यक्ती स्त्रिया किंवा सार्वजनिक व्यक्तींना लक्ष्य करू शकते. ‘दी इंडिपेंडन्ट’मध्ये, क्लेअर कोहेन यांनी ब्लॉक फंक्शनचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी लिहिले, “ब्लॉक सुविधा काढून टाकणे आमच्यासाठी भयावह परिस्थिती निर्माण करू शकते. हा आमचा हक्क आहे.”

ब्लॉक फंक्शन काढून टाकल्याने ‘एक्स’ हे द्वेषपूर्ण भाषणासाठीही एक सुपीक मैदान ठरेल. वापरकर्ते द्वेषयुक्त भाषण अवरोधित करू शकत नसल्यामुळे गोष्टी आणखी बिघडू शकतील. ‘द कन्व्हर्सेशन’मधील एका अहवालात नमूद करण्यात आले आहे की, ‘एक्स’ला आधीच चुकीच्या गोष्टी आणि द्वेष पसरवण्याचे ठिकाण मानले जाते. जर ब्लॉक फंक्शन काढून टाकले गेले, तर परिस्थिती आणखीच वाईट होईल. हे फंक्शन काढून टाकल्याने ट्रोल्स त्यांच्या लक्ष्य केलेल्या व्यक्तींनी काय पोस्ट केले आहे हे पाहण्यास सक्षम होतील, त्याचा स्क्रीनशॉट काढू शकतील आणि नंतर वाईट रीतीने प्रसार करू शकतील. ‘एक्स’वर आधीच महिलांसाठी असुरक्षित असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत प्लॅटफॉर्मवरील महिलांची संख्या सातत्याने कमी होत आहे.

हेही वाचा : पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘ISI’चे नवीन प्रमुख मुहम्मद असीम मलिक कोण आहेत? हे पद महत्त्वाचे का आहे?

इतर वादग्रस्त निर्णय

एलॉन मस्क यांनी प्लॅटफॉर्म खरेदी केल्यानंतर ‘एक्स’ने ब्लॉक फंक्शन काढून टाकण्याचा घेतलेला निर्णय हा पहिलाच वादग्रस्त निर्णय नाही. २०२२ मध्ये ही साइट खरेदी केल्यानंतर लगेच एलॉन मस्क यांनी या साइटचे ट्विटर हे नाव बदलून, ‘एक्स’, असे केले. त्यांनी साइटचा लोगोदेखील बदलला. निळ्या टिकमध्येही बदल करण्यात आला. सुरुवातीला ही निळी टिक एखाद्या व्यक्तीचे खाते अस्सल असल्याचे सूचित करायची; मात्र आता लोक त्याला पैशांमध्ये खरेदी करू शकतात.