इंटरनेट ही काळाची गरज झाली आहे. प्रत्येक कामासाठी आज इंटरनेटचा वापर केला जातो. जसजशी इंटरनेटची गरज वाढत गेली आहे, तसतशी इंटरनेटची सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी या सेवेची किंमतही वाढवली आहे. मात्र, असे असले तरी जगात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे अजूनही इंटरनेट सेवा पोहोचलेली नाही. इंटरनेट सेवेचा लाभ घेण्यासाठी जास्त पैसे दिले जात असले तरी वापरकर्त्यांना इंटरनेटचा योग्य स्पीड मिळत नाही. मात्र, या सर्व समस्यांसाठी सॅटेलाइट इंटरनेट सेवा उपयुक्त ठरू शकते.
सॅटेलाइट इंटरनेट हा विषय चर्चेत येण्याचे कारण म्हणजे एलॉन मस्क यांची स्टारलिंक कंपनी लवकरच भारतात सॅटेलाइट इंटरनेट सर्व्हिस सुरू करण्याच्या तयारीत आहे. ‘स्टारलिंक’द्वारे अगदी आकाशात उडत असतानाही तुम्ही हाय स्पीड इंटरनेटचा वापर करू शकता. अगदी दुर्गम भागापर्यंतही इंटरनेट सेवा पोहोचविण्यासाठी ‘स्टारलिंक’ उपग्रहांचा वापर करते. त्यामुळे ‘स्टारलिंक’चा भारतात प्रवेश झाल्यास इतर इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना मोठा फटका बसणार आहे. काय आहे स्टारलिंक इंटरनेट सर्व्हिस? इतर इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्या आणि ‘स्टारलिंक’मध्ये फरक काय? सॅटेलाइट इंटरनेट सेवेचा भारतीयांना कसा फायदा होणार? जाणून घेऊ.
हेही वाचा : ‘एअरशिप्स’ घेणार विमानांची जागा? याचा अर्थ काय? भविष्यात एअरशिप्सचा कसा फायदा होणार?
भारताचे दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी नमूद केले की, सरकार नेहमीच्या लिलाव प्रक्रियेऐवजी उपग्रह स्पेक्ट्रमवाटपाच्या वेगळ्या पद्धतीचा विचार करीत आहे. इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या काही प्रमुख कंपन्यांनी सॅटेलाइट ब्रॉडब्रॅण्ड स्पेक्ट्रमची मागणी केली आहे. त्यात ‘जिओ’ आणि ‘एअरटेल’चा समावेश आहे. मात्र, या स्पर्धेत जास्त कंपन्या नसल्यामुळे सॅटेलाइट स्पेक्ट्रमच्या लिलावाऐवजी त्याचे वाटप केले जाऊ शकते. एलॉन मस्क भारतात ‘स्टारलिंक’ची सेवा आणण्यासाठी फार पूर्वीपासून उत्साही आहेत. त्यांनी ‘एक्स’वर एका पोस्टमध्ये लिहिले होते की, ‘स्टारलिंक’कडून भारतातील लोकांना सेवा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील.
स्टारलिंक म्हणजे काय आणि ती कसे कार्य करते?
स्टारलिंक ही एलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखालील कंपनी स्पेस एक्सद्वारे प्रदान केलेली उपग्रह इंटरनेट सेवा आहे. स्टेरलिंक भूमिगत केबल्स किंवा मोबाइल टॉवरवर अवलंबून असलेल्या पारंपारिक इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या अगदी उलट आहे. वापरकर्त्यांना इंटरनेट वितरीत करण्यासाठी स्टारलिंक पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहांच्या नेटवर्कचा वापर करते. स्टारलिंकचे मुख्य उद्दिष्ट दुर्गम भागात हाय स्पीड इंटरनेट प्रदान करणे आहे.
स्टारलिंक इतर इंटरनेट प्रदात्यांपेक्षा वेगळी कशी?
स्थानिक ब्रॉडबॅण्ड कंपनीसारखे बहुतांश इंटरनेट प्रदाता इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी फायबर ऑप्टिक केबल्ससारख्या भौतिक पायाभूत सुविधांचा वापर करतात. ही सुविधा शहरांमध्ये चांगले कार्य करते. कारण- शहरांमध्ये केबल टाकणे शक्य असते. परंतु, दुर्गम भागात, पर्वतीय प्रदेशात ही सुविधा पुरवणे कठीण आणि न परवडणारी आहे. तिथेच स्टारलिंक उपयुक्त ठरते. केबल टाकण्याऐवजी स्टारलिंक पृथ्वीच्या कक्षेतील हजारो उपग्रहांचा वापर करून इंटरनेट सेवा पुरवते. पारंपरिक उपग्रह इंटरनेट सेवादेखील अस्तित्वात आहेत; परंतु त्यात पृथ्वीच्या कक्षेपासून दूर असलेले उपग्रह वापरले जातात. त्यामुळे इंटरनेटची गती मंद होते. त्याच्या तुलनेत स्टारलिंकचे उपग्रह खूप जवळ आहेत आणि त्यामुळे कंपनी इंटरनेटची जलद गती प्रदान करू शकते.
लोक स्टारलिंकचा वापर कसा करू शकतात?
स्टारलिंकमध्ये प्रवेश करण्यासाठी वापरकर्त्यांना एक विशेष किट खरेदी करणे आवश्यक असते; ज्यामध्ये एक सॅटेलाइट डिश, एक वाय-फाय राउटर आणि सर्व आवश्यक केबल्स समाविष्ट असतात. डिश लहान आणि पोर्टेबल असते. ही डिश तुमच्या घरी इंटरनेट आणण्यासाठी थेट स्टारलिंक उपग्रहांशी कनेक्ट होते. ही डिश सामान्यतः तुम्हाला छतावर किंवा मोकळ्या जागेत सेट करावी लागते. मग त्या डिशला उपग्रहांकडून सिग्नल मिळू लागतात आणि वाय-फाय राउटरद्वारे ही इंटरनेट सेवा पुरवली जाते. त्याचा सेटअप अगदी सोपा आहे. स्पीडचा विचार करता, स्टारलिंक २५ एमबीपीएस ते २२० एमबीपीएसदरम्यान इंटरनेट स्पीड देते. अर्थात, याचा स्पीड तुम्ही निवडलेला प्लॅन आणि तुमचे स्थान यांवर अवलंबून असतो. इतर उपग्रह इंटरनेट प्रदाते ज्या स्पीडची ऑफर करतात त्यापेक्षा हा स्पीड अधिक आहे. स्टारलिंक त्यांच्या प्लॅनमध्ये अमर्यादित डेटा ऑफर करते.
स्टारलिंक सध्या कुठे उपलब्ध आहे?
स्टारलिंक अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडसह अनेक देशांमध्ये आधीच उपलब्ध आहे. कंपनीने स्पेन, इटली व मेक्सिकोमध्येही आपल्या सेवांचा विस्तार केला आहे आणि त्यामुळे ग्रामीण व शहरी अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये या सेवेचा लक्षणीय परिणाम झाला आहे. याव्यतिरिक्त, बेल्जियम, आयर्लंड, स्वित्झर्लंड व डेन्मार्कसह पोर्तुगाल, ब्राझील, ऑस्ट्रिया व नेदरलँड्स या देशांमध्येही स्टारलिंकने प्रवेश केला आहे.
स्टारलिंकचा भारतीयांना कसा फायदा होईल?
जर ‘स्टारलिंक’ सॅटेलाइट इंटरनेट सेवा भारतात आली, तर भारतीयांना आणि त्यातही विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोकांना अनेक मोठे फायदे होऊ शकतील. सध्या भारतातील अनेक गावे आणि लहान शहरे गरीब किंवा इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करीत आहेत. त्यामुळे लोकांना ऑनलाइन शिक्षण किंवा अगदी मूलभूत संप्रेषण यांसारख्या अत्यावश्यक सेवांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. स्टारलिंकचे सॅटेलाइट इंटरनेट पारंपरिक ब्रॉडबॅण्ड सेवा उपलब्ध नसलेल्या ठिकाणी जलद, विश्वासार्ह इंटरनेट सेवा पुरवू शकेल. स्टारलिंक केबल्सऐवजी उपग्रहाचा वापर करते. त्यामुळे कंपनी देशाच्या कोणत्याही भागात इंटरनेट वितरीत करू शकते. कंपनीने विस्तृत प्रमाणात क्षेत्र व्यापल्याचा सर्वांत मोठा फायदा ग्राहकांना मिळतो.
हेही वाचा : ‘या’ देशात स्थापन होणार सेक्स मंत्रालय? डेटिंग अन् लग्नासाठीही सरकार पुरवणार आर्थिक साह्य? कारण काय?
आणखी एक फायदा म्हणजे स्टारलिंकला व्यावसायिक स्थापनेची आवश्यकता नाही. वापरकर्त्यांना फक्त उपकरणे खरेदी करणे आणि ती स्वतः सेट करणे आवश्यक आहे, जी एक सोपी प्रक्रिया आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना कुणावर अवलंबून राहावे लागणार नाही. मात्र, स्टारलिंक सर्वांनाच परवडेल, असे नाही. भारतातील अनेकांच्या दृष्टीने याच्या किमती जास्त असू शकतात. स्थानिक ब्रॉडबॅण्ड सेवांच्या तुलनेत याचे उपकरण शुल्क आणि मासिक शुल्क जास्त आहे. परंतु, इतर कोणतेही इंटरनेट पर्याय नसलेल्या भागात स्टारलिंकची सेवा फायदेशीर ठरू शकते.