अब्जाधीश उद्योगपती एलॉन मस्क यांनी अनेक आशियाई देशांविषयी चिंता व्यक्त केली आहे. या चिंतेचे कारण म्हणजे या देशांमधील घटता प्रजनन दर आणि वाढती वृद्ध लोकसंख्या. एलॉन मस्क यांनी सिंगापूरसाठीही मोठा इशारा दिला आहे. त्यांनी सिंगापूरच्या घसरत्या एकूण प्रजनन दराबाबत चिंता व्यक्त केली, जो गेल्या वर्षी ०.९७ इतक्या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरला होता. जननक्षमतेचे संकट सिंगापूरपुरतेच मर्यादित नाही. कारण- दक्षिण कोरिया, जपान, हाँगकाँग व चीनमध्ये असेच चित्र दिसून येत आहे. अहवाल असेही सूचित करतात की, भारतातही प्रजनन दरात घट होत आहे. एलॉन मस्क नक्की काय म्हणाले? खरंच जगाच्या नकाशावरून सिंगापूर गायब होणार का? त्याविषयी जाणून घेऊ या.
सिंगापूरमध्ये काय सुरू आहे?
अधिकृत डेटा उघड करतो की, सिंगापूरमधील एकूण प्रजनन दर २०२३ मध्ये ०.९७ पर्यंत घसरला. २०२२ मध्ये हा दर १.४ होता. लोकसंख्येच्या स्थिरतेसाठी आवश्यक असलेला एकूण प्रजनन दर २.१ आहे. त्याच्या तुलनेत सध्याचा प्रजनन दर खूपच कमी आहे. गेल्या महिन्यात सिंगापूरमधील मनुष्यबळ मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे, “घसरत चाललेला लोकसंख्यावाढीचा दर आणि वाढती वृद्ध लोकसंख्या यांमुळे देशातील मनुष्यबळ आणखी कमी होईल. आम्ही अधिक उत्पादनक्षम व जास्त पगार देणाऱ्या नोकऱ्या आणि क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध करून देत राहू. तसेच, सिंगापूरमधील नागरिकांसाठी नोकरीच्या चांगल्या संधी निर्माण करणे सुरू ठेवण्यासाठी आम्हाला परदेशी कामगार आणि थेट परदेशी गुंतवणुकीसाठी मार्ग मोकळे करणे गरजेचे आहे.”
हेही वाचा : आता सायबर फ्रॉडचा धोका टळणार; काय आहे ‘आरबीआय’चे ‘MuleHunter.AI’? ते कसे कार्य करणार?
२०३० पर्यंत सिंगापूरच्या लोकसंख्येपैकी २४ टक्के ज्येष्ठ नागरिक असतील, असा अंदाजही संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केला आहे; ज्यामुळे देश जपानप्रमाणेच ‘अतिवृद्ध समाज’ होण्याच्या मार्गावर जाईल. ‘द स्ट्रेट टाइम्स’च्या मते, २०२३ मध्ये दक्षिण कोरियाचा एकूण प्रजनन दर ०.७२ टक्के नोंदवण्यात आला होता. दक्षिण कोरिया सध्या सर्वांत कमी जन्मदर असलेला देश असल्याचे सांगितले जात आहे. सिंगापूरही याच मार्गावर असल्याचे चित्र आहे. या समस्येला संबोधित करताना, पंतप्रधान कार्यालयातील स्ट्रॅटेजी ग्रुप अंतर्गत राष्ट्रीय लोकसंख्या आणि प्रतिभा विभागाची देखरेख करणाऱ्या इंद्राने यांनी सांगितले की, सिंगापूरसमोर सातत्याने कमी प्रजनन दर आणि वृद्धत्वाची लोकसंख्या अशी दुहेरी लोकसंख्याविषयक आव्हाने आहेत. एलॉन मस्क यांनी सिंगापूरच्या प्रजनन संकटावर प्रकाश टाकला आणि देशातील बाळांचे संकट व ते हाताळण्यासाठी रोबोटिक्सच्या संभाव्य भूमिकेवर चर्चा करणारी एक पोस्ट लिहिली; ज्यात ते म्हणाले, “सिंगापूर (आणि इतर अनेक देश) नामशेष होत आहेत.”
प्रजनन दर कमी होण्याची कारणे कोणती?
इंद्राने यांच्या म्हणण्यानुसार, कोविड-१९ साथीच्या आजाराने अनेक जोडप्यांच्या विवाह आणि पालकत्वाच्या योजनांमध्ये व्यत्यय आणला. त्या पुढे म्हणाल्या, “इतरांनी मुलांच्या संगोपनाच्या आर्थिक खर्चाबद्दल, उत्कृष्ट पालक होण्यासाठी दबाव किंवा काम आणि कौटुंबिक बांधिलकी व्यवस्थापित करण्यात येणाऱ्या अडचणींबद्दल चिंता व्यक्त केली आहे.” इंद्राने यांनी प्राधान्यक्रमांमध्ये पिढ्यान् पिढ्या होणाऱ्या बदलाकडे लक्ष वेधले. तरुण लोक विवाह आणि पालकत्व यांना आजकाल कमी महत्त्व देतात, असेही त्यांनी सांगितले. घटत्या प्रजनन दराचे परिणाम गंभीर आहेत, असा इशाराही त्यांनी दिला. “कमी जन्मदरामुळे कर्मचाऱ्यांची संख्याही कमी होत जाणार आहे आणि त्यामुळे भविष्यात मोठी आव्हाने निर्माण होतील. आमच्याकरिता गतिशीलता टिकवून ठेवणे, जागतिक व्यवसायांना आकर्षित करणे आणि पुढील पिढीसाठी संधी निर्माण करणे हे आव्हानात्मक असेल,” असे त्या म्हणाल्या.
इंद्राने यांनी सिंगापूरची तुलना दक्षिण कोरिया आणि इटलीशीही केली. कारण- त्या देशांतही याच अडचणीमुळे आर्थिक मंदी, वेतनातील घसरण आणि लोकसंख्याविषयक आव्हाने निर्माण झाली आहेत. सरकारी डेटा दर्शवितो की, २५ ते ३४ वयोगटातील अधिक स्त्रिया अविवाहित राहणे पसंत करीत आहेत. पुढे २० वर्षांच्या स्त्रियांमधील वैवाहिक प्रजनन दर कमी झाला आहे. १९९० ते २००५ दरम्यान २४-३४ वयोगटातील महिलांच्या वैवाहिक प्रजनन दरात झपाट्याने घट झाली आणि २०२३ मध्ये हा दर काही टक्क्यांनी वाढला आहे.
रोबोट ही समस्या सोडवू शकतात?
इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रोबोटिक्सच्या मते, सिंगापूर कामगारांची कमतरता दूर करण्यासाठी रोबोटिक्सचा स्वीकार करण्यात येत आहे आणि रोबोटिक्सच्या घनतेमध्ये प्रति १०,००० कामगारांमागे ७७० औद्योगिक रोबोट्सचा समावेश आहे. लहान उत्पादन उद्योग असूनही, या प्रदेशात सार्वजनिक ठिकाणी रोबोकॉप्स, रोबो-क्लीनर्स, रोबो-वेटर्स व रोबो-कुत्री आहेत. चांगी विमानतळावर गस्त घालणे, कार्यक्षमता वाढवणे आणि मर्यादित कर्मचाऱ्यांवरील अवलंबित्व कमी करणे यांसाठी रोबोट्सही तैनात करण्यात आले आहेत, असे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे. एलॉन मस्क यांची कंपनी टेस्ला ह्युमनॉइड रोबोट्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करते आणि ते रोबोटिक्सकडे सिंगापूरसारख्या देशांसमोरील श्रम आणि लोकसंख्याशास्त्रीय आव्हाने यांवर संभाव्य उपाय म्हणून पाहतात.
हेही वाचा : घातपात रोखण्यासाठीच्या चाचणीदरम्यान काँग्रेस खासदाराच्या बाकावर सापडलं नोटांचं बंडल; काय असते ही चाचणी?
शेजारी देशांतही हीच समस्या
दरम्यान, दक्षिण कोरियाला प्रजननक्षमतेच्या गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे, शतकाच्या अखेरीस दक्षिण कोरियाची लोकसंख्या सध्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत एक-तृतीयांशपर्यंत कमी होण्याचा धोका आहे. त्यामुळे एकूण देशच विलुप्त होण्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या समस्येचे निराकरण कसे करावे यावरील वादविवाद, कार्यसंस्कृतीची भूमिका आणि घट होण्यामध्ये लिंग गतिशीलता याविषयी चर्चा सुरू झाली आहे. बुधवारी जारी झालेल्या सांख्यिकी कोरियाच्या आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये देशाच्या जनन दरात मागील वर्षाच्या तुलनेत आठ टक्के घट झाली आहे. तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, दक्षिण कोरियाची ५१ दशलक्ष लोकसंख्या २१०० पर्यंत निम्म्यावर येऊ शकते, असे वृत्त ‘अल जझीरा’ने म्हटले आहे. केवळ दक्षिण कोरियाच नाही, तर त्याच्या शेजारी देशांनाही घटत्या जन्मदराचे आव्हान भेडसावत आहे. अहवालानुसार, २०२२ मध्ये चीन आणि जपानमध्ये प्रजनन दर अनुक्रमे १.०९ आणि १.२६ च्या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. जपानमध्ये २०२३ मध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या जन्मलेल्या संख्येपेक्षा दुप्पट होती.