अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ला विकले आहे. त्यांच्या या निर्णयाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले आहे. एलॉन मस्क यांनी शुक्रवारी त्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ त्यांच्या स्वतःच्या एक्सएआय आर्टिफिशियल इंटेलिजेन्स कंपनीला ३३ अब्ज डॉलर्समध्ये विकले आहे. विक्रीची घोषणा करताना ट्रम्प म्हणाले की, या करारात १२ अब्ज डॉलर्सच्या कर्जाचाही समावेश आहे. त्यामुळे ‘एक्स’चे एकूण मूल्यांकन ४५ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढले आहे. नेमके हे प्रकरण काय आहे? मस्क यांनी कंपनी का विकली? एक्स एआय नक्की काय? या निर्णयाचा वापरकर्त्यांवर कसा परिणाम होणार? त्याविषयी जाणून घेऊ.
‘एक्स’ कंपनीची विक्री
टेस्ला व स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या एलॉन मस्क यांनी दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय का घेतला? याबद्दल ‘एक्स’वरील एका निवेदनात त्यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, “एक्स एआय व ‘एक्स’ यांचे भविष्य एकमेकांशी जोडलेले आहे. आम्ही अधिकृतपणे डेटा, मॉडेल्स, गणना अशा एकूणच वापकर्त्यांच्या फायद्यासाठी हे पाऊल उचलले आहे. एक्स एआयसंदर्भात बोलताना मस्क म्हणाले, “दोन वर्षांपूर्वी एक्स एआयची स्थापना करण्यात आली होती. या दोन वर्षांपासून एक्स एआय वेगाने जगातील आघाडीच्या एआय लॅबपैकी एक ठरली आहे. एक्स एआयद्वारे वेगाने डेटा सेंटर्स तयार करण्यात येत आहेत.”
पुढे त्यांनी असेही सांगितले की, एक्सचे ६०० दशलक्षांहून अधिक सक्रिय वापरकर्ते आहेत. त्यातील अनेक जण एखाद्या गोष्टीची वास्तविकता तपासण्यासाठीदेखील एक्सचा वापर करतात. तेथेदेखील एक मोठा बदल झाला आहे. त्यांनी सांगितले, “एक्स आज जगातील सर्वांत कार्यक्षम कंपन्यांपैकी एक झाली आहे. एक्स एआय ८० अब्ज डॉलर्स आणि एक्स ३३ अब्ज डॉलर्स, असे दोन्ही कंपन्यांचे मूल्य असल्याची माहितीही मस्क यांनी दिली.
एलॉन मस्क यांनी २०२२ च्या अखेरीस ४४ अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर कंपनी विकत घेतली होती. त्यामुळे त्यांच्यावर कर्ज झाले होते. तेव्हापासून त्यांनी अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आणि नोकऱ्यांची उपलब्धतादेखील कमी केली. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये अनेक बदलही झाले, तसेच बंद करण्यात आलेली खाती पुन्हा सुरू करण्यात आली. विशेषतः मस्क यांनी ट्विटरचे नाव एक्स असे ठेवून, कंपनीचे नव्याने ब्रँडिंग केले. या नवीन विलीनीकरणामुळे एक्सएआयच्या विकासात भर पडली आहे. मुख्य म्हणजे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मशी चॅटबॉट ‘गॉर्क’ जोडले गेले आहे.
काय आहे एक्स एआय?
एक्स एआय ही एक अमेरिकन कंपनी आहे, जी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात काम करते. मार्च २०२३ मध्ये एलॉन मस्क यांनी ही कंपनी स्थापन केली. ‘विश्वाचे खरे स्वरूप समजून घेणे’ हे या कंपनीचे ध्येय आहे. कॅलिफोर्नियातील सॅन फ्रान्सिस्को बे एरिया येथे मुख्यालय असलेल्या एक्स एआयच्या स्थापनेमुळे ओपन एआयनंतर एआय क्षेत्रात एलॉन मस्क यांचा पुन्हा प्रवेश झाला आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये एलॉन मस्क यांनी एक्स एआयचा पहिला प्रकल्प ‘गॉर्क’ची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी त्याचा ‘एक्स’वर समावेश केला होता. त्यांनी एक्सवर गॉर्क फीचर काही महिन्यांसाठी सर्वांसाठी मोफत केले होते. भारतासारख्या देशांमध्ये आता गॉर्कची लोकप्रियता वाढत असल्याचे चित्र आहे.
वापरकर्त्यांना कसा फायदा होणार?
एलॉन मस्क यांनी स्पष्ट केले की, या निर्णयामुळे एक्स एआयची प्रगत अशी एआय क्षमता आणि कौशल्य एक्सचा विकास करील. “वापरकर्त्यांना सत्याचा शोध घेता यावा आणि ज्ञान वाढावे हे कंपनीचे मुख्य ध्येय आहे. हेच ध्येय पुढे ठेवून आम्ही हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अब्जावधी लोकांना अधिक चांगला अनुभव मिळेल. परिणामी आम्हाला एक असा प्लॅटफॉर्म तयार करता येईल, जो मानवी प्रगतीला गती देईल.”
वापरकर्त्यांची गोपनीयता : तज्ज्ञांनी अशी चिंता व्यक्त केली आहे की, या विलीनीकरणामुळे एआय मॉडेल्सना प्रशिक्षित करण्यासाठी डेटा संकलन वाढू शकते. त्याचा परिणाम वापरकर्त्यांच्या गोपनीयतेवर होऊ शकतो.
‘एव्हरीथिंग अॅप’ : एलॉन मस्क यांनी कायमच ‘एक्स’ला ‘एव्हरीथिंग अॅप’मध्ये रूपांतरित करण्याच्या त्यांचा प्रयत्न असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर महत्त्वपूर्ण बदल होऊ शकतात आणि सेवेचाही विस्तार होऊ शकतो.
एक्सच्या सीईओ लिंडा याकारिनो यांनी या कराराबद्दल मस्क यांच्या भविष्यातील दृष्टिकोनाचे कौतुक केले. त्यांनी लिहिले, “भविष्य यापेक्षा उज्ज्वल असू शकत नाही.” एक्स कंपनीने अलीकडेच नुकत्याच एक अब्ज डॉलर्सच्या नवीन इक्विटी उभारल्या आहेत. या इक्विटीमुळे कंपनीचे मूल्यांकन मस्क यांनी २०२२ मध्ये खरेदी केलेल्या किमतीच्या जवळ आले आहे. मस्क यांनी विलीनीकरणासाठी गुंतवणूकदारांची मंजुरी अपेक्षित धरली नाही. त्यांनी गुंतवणूकदारांना सांगितले की, दोन्ही कंपन्या एकत्र येऊन काम करणार आहेत आणि या एकत्रीकरणामुळे एकूणच कंपनीचा विस्तार होणार आहे.
“हा निर्णय आश्चर्यकारक आणि अनपेक्षित आहे,” असे पीपी फोरसाइट विश्लेषक पाओलो पेस्केटोर म्हणाले. “४५ अब्ज डॉलर्सची निवड हा योगायोग नाही,” असे डी. ए. डेव्हिडसन अँड कंपनीचे विश्लेषक गिल लुरिया म्हणाले. “२०२२ मध्ये ट्विटरसाठी झालेल्या टेक-प्रायव्हेट व्यवहारापेक्षा यातील एक अब्ज डॉलर्स जास्त आहेत.”