अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची फेरनिवड झाल्यानंतर त्यांच्या मित्रपरिवारातील उद्योगपती इलॉन मस्क भलतेच आक्रमक झाले आहेत. आता त्यांनी एके काळचे त्यांचे सहकारी पण आता कट्टर प्रतिस्पर्धी बनलेले आणि चॅट जीपीटी या बहुचर्चित एआय अॅपचे निर्माते सॅम आल्टमन यांच्या ओपन एआय कंपनीच्या अधिग्रहणासाठी आक्रमक हालचाली सुरू केल्या आहेत. काही गुंतवणूकदारांना हाताशी धरून मस्क यांनी ९७.४ अब्ज डॉलरची ऑफर ओपन एआयच्या संचालक मंडळाला सादर केली. आल्टमन यांनी या ऑफरची खिल्ली उडवताना, ‘आम्हीच ९.७४ अब्ज डॉलर देतो, आम्हाला ट्विटर द्या’ असे उत्तर दिल्यामुळे मस्क संतापले. त्यांनी आल्टमन यांचा उल्लेख ‘ठग’ असा केला. हा संताप कुठवर जाणार, याविषयी…
मस्क यांचा प्रस्ताव
इलॉन मस्क आणि त्यांची एआय कंपनी ‘एक्सएआय’ तसेच या कंपनीतील गुंतवणूकदार वॅलर इक्विटी पार्टनर्स, बॅरन कॅपिटल, अट्रेडेस मॅनेजमेंट, एन्डेव्हर यांनी एआयसाठी ९७.४ अब्ज डॉलरचा प्रस्ताव ओपन एआयच्या संचालक मंडळाकडे १० फेब्रुवारी रोजी सादर केला, असे वृत्त ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने दिले. ओपन एआय ही ना-नफा स्वरूपाची कंपनी आहे. या कंपनीला नफा-केंद्री कंपनीमध्ये परिवर्तित करून स्टारगेट नावाचा एआय प्रकल्प उभारण्याचे इलॉन मस्क यांचे मनसुबे आहेत. मस्क यांच्या मते, ओपन एआयच्या नियंत्रणातून नफा-केंद्री उपकंपनी स्थापून मूळ कंपनीची पत कमी करण्याचा आल्टमन यांचा डाव आहे. मूळ कंपनीचे स्वरूप ना-नफा आणि उद्दिष्ट मानवजातीच्या हिताचे होते. त्याला सुरुंग लावण्याचा आल्टमन यांचा प्रयत्न असून आपण हे होऊ देणार नाही असे मस्क म्हणतात.
मस्क-आल्टमन होते एकत्र
ओपन एआय ही कंपनी सॅम आल्टमन आणि इलॉन मस्क यांनी २०१५मध्ये स्थापली. पण २०१८मध्ये मस्क यांनी कंपनी सोडली. आल्टमन यांना केवळ नफेखोरी दिसते. पण आर्टिफिश्यल इंटेलिजन्सचा उपयोग अवघ्या मानवजातीसाठी होणे अपेक्षित आहे. आल्टमन यांच्या धोरणांमुळे एआयचे लाभ मोजक्यांनाच मिळतील आणि बाकीचे त्यापासून वंचित राहतील, असे मस्क यांचे म्हणणे पडले. चॅट जीपीटी या उत्पादनासाठी मायक्रोसॉफ्टशी करार केल्याच्या निर्णयासही मस्क यांनी याच कारणास्तव विरोध केला. आल्टमन यांच्या मते मात्र, मस्क यांचाही नफा-केंद्री धोरणांना पाठिंबा होता. ओपन एआयवर नियंत्रण मिळवता न आल्यामुळेच मस्क यांनी कंपनी सोडली, असे आल्टमन म्हणतात.
आल्टमन यांचे प्रत्युत्तर
मस्क यांच्या ९७.४ अब्ज डॉलरच्या प्रस्तावाला आल्टमन यांनी झोंबरे प्रत्युत्तर दिले. ‘नो थँक यू! पण आम्ही त्यापेक्षा ट्विटर ९.७४ अब्ज डॉलरला खरेदी करतो, तुम्हाला वाटले तर..’ मस्क यांच्या ९७.४ अब्ज डॉलरसमोर ९.७४ अब्ज डॉलरची ऑफर नक्कीच तोकडी आहे. पण त्यात एक मेख आहे, जी मस्क यांना चटकन लक्षात आली. मस्क यांनी २०२२मध्ये ४४ अब्ज डॉलर मोजून ट्विटर ही सोशल मीडिया कंपनी विकत घेतली. पण मस्क यांच्या टेक-ओव्हरनंतर ट्विटरच्या मूल्यात घसरण झाली. हे मूल्य आज १० अब्ज डॉलरही नसेल, असे बोलले जाते. तोच धागा पकडून आल्टमन यांनी मस्क यांना टोला लगावला.
ट्रम्प-आल्टमन मैत्रीमुळे मस्क अस्वस्थ?
एआयच्या विकसनासाठी कोट्यवधी डॉलर लागतात. एखाद्या ना-नफा कंपनीच्या आधिपत्याखाली हे शक्य नाही. यामुळेच चॅट जीपीटी बनवणाऱ्या ओपन एआयवरील ना-नफा कंपनीचे नियंत्रण हटवून, तिला मर्यादित-नफा बनवणारी उपकंपनी बनवण्याचा सॅम आल्टमन यांचा प्रयत्न आहे. एकीकडे ओपन एआयला ना-नफाच्या कवचात ठेवताना, स्वतः मात्र एक्स एआय ही कंपनी स्थापून तिच्याद्वारे नफा कमवायचा हे कसे, असा सवाल आल्टमन मस्क यांच्यापुढे उपस्थित करतात. या दोघांमध्ये आणखी दुरावा निर्माण होण्यास २०२५मधील एक घटना कारणीभूत ठरली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची सूत्रे हाती घेताच स्टारगेट हा ५०० अब्ज डॉलरचा अवाढव्य प्रकल्प जाहीर केला. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी त्यांनी आल्टमन यांना बरोबरीला घेतले. ही जवळीक ट्रम्प यांचे स्वयंघोषित मित्र इलॉन मस्क यांना मानवलेली दिसत नाही. कारण त्यांनी स्टारगेट प्रकल्प आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्याचे मत व्यक्त केले आणि आल्टमन यांच्यावर टीकाही केली.