How to identify fake accounts on Twitter: एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या नेतृत्वाची धुरा हाती घेताच अधिकृत अकाउंट्सच्या संदर्भात सर्वात मोठा निर्णय घेतला. ट्विटरवर यापुढे ब्ल्यू टिकसाठी महिन्याला ८ डॉलर मोजावे लागतील असे मस्क यांनी घोषित करताच सर्वच समाज माध्यमांवर चर्चेला उधाण आले होते. अनेकांनी थेट ट्विटरवरच या निर्णयाचा निषेध केला होता मात्र मस्क यांनी कितीही टीका झाली तरी निर्णय बदलणार नाही असे स्पष्ट सांगून या टीकाकारांना ठणकावले होते. मस्क यांचा हा अढळ निर्णय एका छोट्या गडबडीमुळे पुरता ढासळला होता. पैसे देऊन ब्ल्यू टिक मिळत असल्याने काहीच दिवसांमध्ये ट्विटरवर खोट्या अकाउंटची संख्या वाढू लागली. आणि यामुळेच ट्विटरला अधिकृत माहितीचा स्रोत बनवण्याचा व त्यातून कमाईचा मस्क यांचा बेत फसला.
एकंदरीत ब्ल्यू टिक पार्श्वभूमीवर ट्विटरवरील फेक अकाउंटची समोर आलेली संख्या मात्र विशेष लक्ष देण्यासारखी आहे. अन्य समाज माध्यमांपेक्षा काही अंशी अधिक विश्वासार्हता असणाऱ्या ट्विटरवरही इतके फेक अकाउंट पाहून नेमका आता कशावर विश्वास ठेवावा हा प्रश्न युजर्सना पडू लागला आहे. ट्विटरवर फेक अकाउंट कसे ओळखायचे याविषयी आज आपण याविषयीच सविस्तर माहिती पाहणार आहोत
तपशील तपासून घ्या
अनेकदा फेक अकाउंट खूप सहज ओळखता येण्यासारखी असतात, जर एखाद्या अकाउंटचे नावच काहीतरी विचित्र असेल, त्यात चुकीच्या पद्धतीने प्रसिद्ध व्यक्तीच्या नावाची स्पेलिंग लिहिलेली असेल किंवा खूप चिन्हे वापरली असतील तर अशी अकाउंटवर विश्वास ठेवण्याआधी नीट तपासून घ्या. तर काही अकाऊंटच्याबाबत मात्र पटकन संशय येत नाही अशावेळी आपण अकाउंटच्या प्रोफाईलवर नावच नव्हे तर ते अकाउंट कधी तयार झाले आहे, त्याला किती फॉलोवर्स आहेत, फॉलोवर्समधील अन्य अकाउंट्स कसे आहेत हे ही तपासून पाहायला हवे.
फोटो गूगलवर शोधा
बहुतांश फेक अकाउंटच्या प्रोफाईलवर स्टॉक फोटो किंवा इतर बनावट खात्यांद्वारे शेअर केलेला प्रोफाइल फोटो वापरला जातो. प्रोफाईल फोटो इतरांनी वापरली आहे का हे शोधण्यासाठी तुम्ही तो फोटो कॉपी करून किंवा फोटोची लिंक घेऊन थेट गूगलवर शोधू शकता.
ब्ल्यू टिक पेमेंट पडताळणी
आपल्याला ट्विटर ब्ल्यू या योजनेचा भाग असणाऱ्या सशुल्क अधिकृत अकाऊंटच्या पेजवर पॉप अप मध्ये हे खाते व्हेरीफाईड आहे असे लिहिलेले दिसते. ही सुविधा सहसा सरकारी, बातम्या, मनोरंजन किंवा इतर नियुक्त श्रेणीमध्ये कार्यरत अकाउंटसाठी दिली जाते.
तर्कशुद्ध विचार करा
अनेकदा तुम्ही कितीही तपास केला तरी त्या अकाउंटमध्ये काहीच संशयास्पद वाटणार नाही, मात्र अशावेळी तुमचा तर्कशुद्ध विचार कामी येईल. एखाद्या अकाऊंटवरून जर आक्षेपार्ह्य किंवा अत्यंत टोकाच्या भूमिका मांडल्या जात असतील अपशब्द वापरण्यात येत असतील तर असे अकाउंट बहुतांश वेळेस खोटे असू शकते.
प्रोफाइल URL
जेव्हा तुम्ही ट्विटर वापरता तेव्हा प्रोफाइल URL पहा. प्रोफाईल पाहताना, बायो (वैयक्तिक माहिती) वर दिलेल्या पहिल्या नावाचा आणि आडनावांचा प्रोफाईल URL शी संबंध नसल्यास ते फसवे खाते असू शकते.
दरम्यान, ट्विटरवर अनेकदा प्रसिद्ध अकाउंटचे अनेक फॅन ग्रुप बनवले जातात, ही अकाउंट फेक नसली तरी त्यांचा बायोमध्ये अकाउंट हे फॅन पेज असल्याचे नमूद केलेले असते, खऱ्या माहितीसाठी पहिला नियम म्हणजे त्याचा स्रोत तपासून पाहणे. वरील मुद्द्यांच्या आधारे आपण ट्विटरवर व अन्य समाज माध्यमांवर स्रोत पडताळून मगच विश्वास ठेवायचा की नाही हे ठरवू शकता.