यूट्यूबर आणि बीग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता एल्विश यादव याच्या विरोधात उत्तर प्रदेशमधील गौतम बुद्ध नगरच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली राजधानी क्षेत्रातील एका रेव्ह पार्टीमध्ये सापाच्या विषाची विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी आपल्या छापेमारीत सापाचे २० मिली विष, पाच कोब्रा साप, एक अजगर, दोन दुतोंडी साप, एक रॅट स्नेक जप्त केले आहेत. त्यानंतर या प्रकरणात एल्विश यादवचे नाव समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर सापाच्या विषाचा ड्रग्ज म्हणून वापर कसा होतो? हे जाणून घेऊ या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सापाच्या विषाचा ड्रग्ज म्हणून सर्रास वापर केला जातो. सापाच्या विषाची तस्करी आणि व्यापारात कोट्यवधी डॉलर्सची उलाढाल होते. नोव्हेंबर २०२२ मध्ये तटरक्षक दलाच्या जवानांनी पश्चिम बंगालच्या दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यात मोठी कारवाई केली होती. या कारवाईत जवानांनी साधारण २.१४ किलो सापाचे विष पकडले होते. या विषाचे आंतरराष्ट्रीय बाजारातील मूल्य साधारण १७ कोटी रुपये होते. यावरून सापाचे विष किती महाग असते, याची कल्पना येऊ शकते. २०१८ साली इंडियन जर्नल ऑफ सायकोलॉजिकल मेडिसीनमध्ये ‘स्नेक व्हेनोम यूज अॅज अ सबस्टिट्यूट फॉर ओपीओईड्स : अ केस रिपोर्ट अँड रिव्ह्यू ऑफ लिट्रेचर’ नावाने एक अभ्यास प्रकाशित करण्यात आला होता. यानुसार सापाच्या विषाचा ड्रग्ज म्हणून वापर का केला जातो, यावर अद्याप सखोल अभ्यास झालेला नाही.

सापाच्या विषाचे सेवन कसे केले जाते?

इंडियन जर्नल ऑफ सायकोलॉजिकल मेडिसीनमधील २०१८ सालच्या वरील रिपोर्टनुसार भारतात सापाचे विष ड्रग्ज म्हणून वापरल्याच्या ज्या नोंदी आहेत, त्यामध्ये सापाला संबंधित व्यक्तीच्या पायावर किंवा जिभेवर चावण्यास प्रवृत्त केले जाते. त्यासाठी विशेषत: कोब्रा, इंडियन क्रेट्स जातीच्या सापाचा वापर केला जातो.

सापाच्या विषाचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो?

‘स्नेक व्हेनोम यूज अॅज अ सबस्टिट्यूट फॉर ओपीओईड्स : अ केस रिपोर्ट अँड रिव्ह्यू ऑफ लिट्रेचर’ नावाच्या या अभ्यासात सांगितल्याप्रमाणे ड्रग्ज म्हणून सापाच्या विषाचा वापर केल्यास शरीरावर काय परिणाम होतो, याबाबत एका ३३ वर्षीय व्यक्तीला विचारण्यात आले होते. त्यानुसार सापाने चावा घेतल्यानंतर अस्पष्ट दिसायला लागते, शरीर प्रतिसाद देत नाही. ही स्थिती साधारण तासभर असते. विषाचा परिणाम कमी झाल्यानंतर ताजेतवाने वाटते. हा उत्साह साधारण तीन ते चार आठवडे कायम असतो, असे या व्यक्तीने सांगितले होते. सापाच्या विषाचा प्रभाव कमी झाल्यानंतर मात्र आग व्हायला लागते आणि हे विष आणखी हवे, अशी इच्छा उत्पन्न होते.

सापाच्या विषाचा शरीरावर काय परिणाम होतो?

सापाचे विष हे काहीसे न्यूरोटॉक्झिनप्रमाणे काम करते. कदाचित याच कारणामुळे बधीरता येते, वेदना नाहीशा होतात. एका अभ्यासानुसार सापाच्या विषात निकोटिनिक अॅसिटाइलकोलीन रिसेप्टर्स (nAChRs) हा न्यूरोटॉकझिनचा प्रकार आढळतो. हे न्यूरोटॉक्झिन मानवी मेंदूच्या आजूबाजूला असते. हे न्यूरोटॉक्झिन आनंदाची भावना निर्माण करण्यास मदत करतात. सापाचे विष एकदा मानवाच्या रक्तात मिसळल्यावर ते सेरोटोनीन नावाचे मेटाबोलाईट सोडते, ज्यामुळे माणसाला भूल येते, अंग बधीर होते, वेदना नाहीशा होतात.

सापाच्या विषाचा ड्रग्ज म्हणून वापर करणे धोकादायक का आहे?

‘स्नेक व्हेनोम यूज अॅज अ सबस्टिट्यूट फॉर ओपीओईड्स : अ केस रिपोर्ट अँड रिव्ह्यू ऑफ लिट्रेचर’ नावाने प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात ज्या लोकांची मतं जाणून घेण्यात आली होती, ज्यांच्यावर अभ्यास करण्यात आला होता, त्यांनी सापाचे विष अगदी कमी प्रमाणात घेतले होते. सापाचे नेमके कोणते विष (गुणवत्ता) मानवासाठी धोकादायक ठरू शकते, हे अद्याप समजू शकलेले नाही. त्यामुळे सापाचा ड्रग्ज म्हणून वापर केल्यास तो धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे मृत्यूदेखील होऊ शकतो, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elvish yadav drug case how snake venom used as drug prd
Show comments