-भक्ती बिसुरे
मागील दोन वर्षे करोना या विषाणूने निर्माण केलेल्या महासाथीशी संपूर्ण जग दोन हात करत आहे. या दोन वर्षात जगाच्या कानाकोपऱ्यातील सर्वच स्तरातील जनजीवन विस्कळित झाले. आता ते काहीसे पूर्वपदावर येत असले तरी करोनापूर्व परिस्थितीला मात्र जाऊन पोहोचलेले नाही. त्यामुळेच करोना कधी संपणार, असा प्रश्न उपस्थित होतोच.
करोना विषाणूचा प्रवास…
नोव्हेंबर २०१९मध्ये चीनमध्ये करोना विषाणूचा पहिला रुग्ण सापडला आणि बघता-बघता या संसर्गाने अक्राळविक्राळ रूप धारण केले. २०२०च्या सुरुवातीला भारतातील केरळसारख्या काही राज्यांमध्ये करोना दाखल झाला. मार्च २०२०मध्ये महाराष्ट्रातल्या पुणे आणि मुंबई शहरांमध्ये करोनाने शिरकाव केला आणि त्यानंतर बघता बघता राज्यभर, देशभर त्याचा प्रसार झाला. पहिली लाट काहीशी सौम्य, त्यानंतर अत्यंत गंभीर अशी डेल्टा या प्रकारामुळे आलेली दुसरी लाट असे या साथीचे अनेक चढउतार नागरिकांनी अनुभवले. त्यानंतर आलेल्या ओमायक्रॉन या विषाणूने संसर्गाच्या वाढीचा वेग प्रचंड वाढवला मात्र रुग्णांवर तुलनेने सौम्य लक्षणे दाखवली. सध्या याच ओमायक्रॉनचे बीए.४, बीए.५ आणि बीए.२.७५ असे उपप्रकार नवनवीन रुग्णांना संसर्ग करत असलेले दिसून येत आहेत, या प्रकारांमुळे होणारा संसर्गही ओमायक्रॉन संसर्गासारखाच सौम्य असला तरी या प्रकारांची संक्रमणक्षमता मात्र अद्याप कायम असल्याचेच स्पष्ट आहे.
एंडेमिक होणार का?
करोना विषाणूचे नव्याने येणारे प्रकार हे सौम्य असल्यास करोना महासाथ (पँडेमिक) एंडेमिकच्या दिशेने वाटचाल करत आहे का याबाबत अनेक चर्चा गेले काही महिने जागतिक स्तरावर होताना दिसत आहेत. मात्र, साथीच्या एंडेमिक होण्याबाबत अद्याप कोणताही निष्कर्ष काढणे शक्य नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने वेळोवेळी स्पष्ट केले होते. महामारीच्या आजाराची जागतिक पातळीवरील तीव्रताकमी होऊन ती स्थानिक किंवा एखाद्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशापुरती मर्यादित होणे याला त्या आजाराची वाटचाल पँडेमिक ते एंडेमिक झाली असे म्हणता येते. आजार एंडेमिक झाला तरी त्याचे गांभिर्य किंवा तीव्रता कमी होण्याची शक्यता असतेच असे नाही. विशेषत: जगाच्या पाठीवर अद्याप एक तृतीयांश नागरिकांचे संपूर्ण किंवा अजिबात लसीकरण झालेले नसताना करोना महामारी एंडेमिक होणार का या प्रश्नाचे उत्तर लांब असल्याचे तज्ज्ञांकडून मार्च महिन्यात सांगण्यात आले होते.
जागतिक आरोग्य संघटना आता काय म्हणते?
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रॉस यांनी नुकतेच महासाथीच्या शेवटाबद्दल केलेले भाष्य जगभरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. आपण अद्याप करोनावर मात केलेली नाही, मात्र त्याचा शेवट दृष्टिपथात आला आहे, अशा आशयाचे विधान टेड्रॉस यांनी नुकतेच केले आहे. जगभरातील करोना रुग्णांची संख्या वेगाने कमी होत आहे. हे एक सकारात्मक चिन्ह असून याकडे महासाथीवर मात करण्याची एक संधी म्हणून पाहिले जाण्याची गरज आहे. करोना महासाथीने जगभर थैमान घातल्यानंतरच्या काळात आतासारखा चांगला काळ जगात क्वचितच दिसून आल्याचेही टेड्रॉस यांनी नमूद केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून अशा प्रकारे थेट सकारात्मक विधान करण्यात आल्यामुळे खरोखरच जागतिक परिस्थिती करोना पूर्व काळासारखी होण्याच्या सर्वच क्षेत्रातील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
करोना संपणार की सौम्य होणार?
जागतिक आरोग्य संघटनेने महासाथीचा शेवट दृष्टिपथात आल्याचे म्हटले असले तरी विषाणू दीर्घकाळ पर्यंत आपले स्वरूप बदलत राहतो आणि हळूहळू त्याचा संसर्गही सौम्य होत जातो. विशेषतः जगातील मोठ्या समूहाला करोना संसर्ग होऊन गेला आणि तेवढ्याच मोठ्या समूहाचे लसीकरण झाले, ही बाब विषाणू आणि त्यापासून होणारा संसर्ग आणखी क्षीण करण्यास उपयुक्त असल्याचे साथरोग क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वेळोवेळी स्पष्ट करण्यात आले आहे.
महासाथीच्या झळा किती खोलवर?
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार करोनामुळे जगभरातील किमान ६० कोटी नागरिकांना संसर्ग झाला. त्या संसर्गातून निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे किमान ६५ लाख नागरिकांचा मृत्यू झाला. संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांना या आजाराचे अनेक गंभीर दुष्परिणाम आजही जाणवत आहेत. यामध्ये मेंदूविकार, हृदयविकार, फुप्फुस विकार, अस्थिविकार अशा अनेक दूरगामी तक्रारींचा समावेश आहे. महासाथीमुळे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान नागरिक, उद्योगधंदे आणि सर्वे क्षेत्रांना सहन करावे लागले आहे. त्याचे दूरगामी परिणाम नागरिकांच्या मानसिक स्वास्थ्यावर झाले आहेत. लहान मुले आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही या काळात बरेच झाले असून त्याचे दूरगामी परिणाम त्यांच्या भविष्यावर होण्याची चिंता सर्वच स्तरांतून व्यक्त करण्यात येते.