मागच्या तीन वर्षांत जगभरात काम करण्याच्या पद्धतीमध्ये कमालीचा बदल झाला आहे. करोना काळात विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ज्या लोकांना घरून काम करणे शक्य आहे, अशा लोकांना ते करण्याची मुभा देण्यात आली. घरून काम करण्याचा पर्याय यशस्वी झाल्याचे मागच्या दोन-तीन वर्षांत पाहायला मिळाले. पण आता करोना महामारीचा शेवट झाला आहे. त्यामुळे कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कार्यालयात बोलावण्यास सुरुवात केली आहे. आयटी क्षेत्रातील नामांकित कंपनी असलेल्या ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ने मागच्या वर्षीच सर्व कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये परतण्यासाठी अधिकृत ईमेल केला होता. आता या निर्णयाचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा कंपनीने दिला आहे. ‘फर्स्टपोस्ट वेबसाइट’ने या विषयाच्या संदर्भात आढावा घेतला आहे. या विषयात पुढे काय होणार त्यावर टाकलेला एक दृष्टिक्षेप.
प्रकरण काय आहे?
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या बातमीनुसार, ‘टीसीएस’चे जे कर्मचारी महिन्यातून १२ दिवस कार्यालयात हजेरी लावणार नाहीत, त्यांना नोटीस जारी करण्यास सुरुवात केली आहे. जर कर्मचाऱ्यांनी या सूचनेचे पालन केले नाही तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचाही इशारा कंपनीकडून देण्यात आला आहे. या नोटिशीत ‘टीसीएस’ने म्हटले आहे, “तुम्हाला कार्यालयात येऊन काम करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. ठरलेल्या वेळापत्रकानुसार कार्यालयात हजेरी लावणे बंधनकारक आहे. या नियमाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी.”
यामागे टीसीएसची भूमिका काय आहे?
‘टीसीएस’ने मात्र घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धमकीवजा इशारा दिल्याचा दावा फेटाळून लावला आहे. ‘टीसीएस’च्या प्रवक्त्यांनी सांगितले, कर्मचाऱ्यांनी आठवड्याचे तीन दिवस कार्यालयात येऊन काम करावे, यासाठी आम्ही त्यांना उद्युक्त करत आहोत. “आम्हाला असे वाटते की, आमची कार्यालये कर्मचाऱ्यांच्या ऊर्जेने व्यापली जावीत, प्रत्येक कर्मचाऱ्याला चांगले काम करण्यासाठी या वातावरणातून प्रेरणा मिळावी, अशी यामागची भूमिका आहे. ‘टीसीएस’मधील वातावरणाचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळावा आणि त्यातून त्यांनी नव्या गोष्टी शिकाव्यात, इतरांशी सहकार्याने काम करावे, स्वतःची प्रगती करावी आणि मजा करत कामाचा आनंद घ्यावा, असे आम्हाला वाटते. अशा प्रकारे आपल्या संस्थेशी असलेली भावना आणखी दृढ करण्याचा आमचा हेतू आहे,” अशी माहिती ‘टीसीएस’च्या प्रवक्त्यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना दिली.
आउटलेटशी बोलत असताना ‘टीसीएस’च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मागच्या काही महिन्यांपासून आम्ही भारतातील आमच्या सहकाऱ्यांना आठवड्याचे तीन दिवस कार्यालयात येऊन काम करण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत. अनेक लोक कार्यालयात येऊन काम करत असल्यामुळे कंपनीच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आमच्या कर्मचाऱ्यांनी आठवड्यातील किमान तीन दिवस आणि महिन्यातले १२ दिवस कार्यालयात येऊन सर्वांसोबत काम करावे, अशी आमची अपेक्षा आहे.
कार्यालयातून काम करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना काय आहेत?
मागच्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापासून ‘टीसीएस’ने कर्मचाऱ्यांना आठवड्याचे तीन दिवस कार्यालयातून काम करण्याचे आदेश दिले आहेत. ‘टाटा कॉर्पोरेशन’ ही पहिली आयटी कंपनी आहे, ज्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येऊन काम करण्याचे बंधन घातले आहे. तसेच या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठीही ‘टीसीएस’ प्रयत्नशील आहे. कामाच्या प्रोजेक्टनुसार कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक (रोस्टर) तयार केले जाते. नवीन भरती झालेले आणि जुने सहकारी अशा लोकांची संमिश्र टीम तयार करून त्यांना कार्यालयात बोलाविण्यात येते.
‘टीसीएस’च्या म्हणण्यानुसार सदर निर्णय, कंपनीच्या सिक्युअर बॉर्डरलेस वर्कस्पेसेस (SBWS) पासून दूर जाण्याचा एक प्रयत्न आहे. तसेच कंपनीने हायब्रिड दृष्टिकोन ठेवला असून आपल्या कर्मचाऱ्यांनी अधिकाधिक दिवस कार्यालयात येऊन काम करावे, यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. टीओआयने दिलेल्या बातमीनुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्याच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार त्याला कार्यालयात येऊन काम करण्याचे ठरले आहे. पण तब्येतीच्या कारणास्तव जर कार्यालयात येणे शक्य नसेल तर इतर कोणत्या दिवशी कार्यालयात येणार, हे सांगितल्याशिवाय सदर कर्मचाऱ्याला त्या दिवशी घरून काम करण्याची परवानगी दिली जात नाही.
‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या बातमीनुसार, घरून किंवा इतर ठिकाणांहून काम करायचे असल्यास तशी विनंती पाच दिवस आधीच करणे आवश्यक आहे.
टीसीएसकडे किती कर्मचारी आहेत?
२०२३ या आर्थिक वर्षात टीएसीएने सर्वाधिक तज्ज्ञ कर्मचारी कामावर घेतले आहेत. तर ४४ हजार नवख्या कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. मार्च २०२३ च्या शेवटी, टीसीएसकडे ६ लाख १४ हजार ७९५ कर्मचारी काम करत होते. वर्षाच्या पहिल्या तिमाहीत टीसीएसने २२,६०० नव्या कर्मचाऱ्यांची भरती केली. लिंक्डइन च्या अहवालानुसार २०२३ मध्ये, भारतातील सर्वात उत्तम कामाची जागा असा पुरस्कारही ‘टीसीएस’ने मिळवला आहे. ‘टीसीएस’नंतर ‘ॲमेझॉन’आणि ‘मॉर्गन स्टॅनली’ या कार्यालयांचा क्रमांक लागतो.
३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत ‘टीसीएस’ने १४.८ टक्क्यांची वार्षिक आर्थिक वाढ नोंदविली. ज्यामुळे कंपनीच्या निव्वळ नफ्यामध्ये ११,४३६ कोटींची वाढ झाली. पहिल्या तिमाहीत ‘टीसीएस’च्या विविध प्रकल्पांतून एकत्रित महसूल ५९,१६२ कोटी मिळाला. मागच्या वर्षीची तुलना केल्यास त्यामध्ये १७ टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसते. गतसाली ५०,५९१ एवढाच महसूल मिळाला होता. टाटा कॉर्पोरेशनच्या शेअरमध्ये बुधवारी ०.८७ टक्क्यांची वाढ नोंदविली गेली. ज्यामुळे त्याची किंमत आता ३,२४२ रुपये एवढी झाली आहे.
इतर कंपन्यांची कार्यालयाची काय भूमिका आहे?
‘टीओआय’ने दिलेल्या बातमीनुसार इतर आयटी कंपन्यांपैकी ‘इन्फोसिस’ने त्यांच्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून दोन दिवस कार्यालयात येण्याची सूचना दिली असली तरी ते बंधनकारक करण्यात आलेले नाही. फेसबुकची पालक कंपनी मेटा प्लॅटफॉर्म आयएनसीनेही कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस कार्यालयात येण्यास सांगितले आहे. ‘ब्लुमबर्ग’ने दिलेल्या माहितीनुसार, उत्पादकता आणि कामातील कार्यक्षमता वाढविण्यासाठी कार्यालयात येऊन काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
‘टाइम्स नाऊ’च्या माहितीनुसार, ॲमेझॉनने १ मेपासून कर्मचाऱ्यांना आठवड्याचे तीन दिवस कार्यालयात येऊन काम करण्यास सांगितले आहे. सीईओ ॲण्डी जॅसी यांनी मागच्या वर्षीच प्रत्येक विभागाच्या प्रमुखांना सूचना देऊन त्यांच्या विभागातील कर्मचारी कार्यालयात येऊन काम करतील, याची खबरदारी घेण्यास सांगितले होते. ‘स्टारबक्स’नेदेखील जानेवारी महिन्यापासून कर्मचाऱ्यांना आठवड्याचे तीन दिवस कार्यालयात बोलावले आहे. ‘वॉल्ट डिज्ने’ कंपनीचे सीईओ बॉब आयगर यांनी तर १ मार्च रोजी, आठवड्यातून चार दिवस कार्यालयात येण्यासंबंधीच्या सूचना दिल्या आहेत. तर ‘ॲपल’चे सीईओ टीम कुक यांनीही आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे हायब्रिड वर्क फ्रॉम पॉलिसी अवलंबली असल्याची माहिती दिली.