अन्वय सावंत
इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रूकने आपल्या आक्रमक खेळींनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. ब्रूकची आतापर्यंत सहा सामन्यांची छोटेखानी कसोटी कारकीर्द असली, तरी त्याने दमदार कामगिरीसह स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. इंग्लंडचे माजी कसोटी कर्णधार जेफ्री बॉयकॉट सहसा कोणाची फारशी स्तुती करत नाहीत. परंतु त्यांनाही २४ वर्षीय ब्रूकने प्रभावित केले आहे. ‘‘केव्हिन पीटरसननंतर अगदी सहजपणे कोणतेही फटके मारणारा ब्रूक हा इंग्लंडचा पहिलाच फलंदाज असावा. त्याची फटकेबाजी आणि वेगाने धावा करण्याची क्षमता पाहून मी अवाक झालो,’’ असे बॉयकॉट म्हणाले. बॉयकॉट यांच्यासह अन्य माजी क्रिकेटपटू, क्रिकेटतज्ज्ञ आणि चाहते ब्रूकबाबत इतकी चर्चा का करत आहेत, ब्रूकला कोणत्या गोष्टी खास बनवतात याचा आढावा.
इंग्लंडच्या नव्या शैलीचा युवकांना कसा फायदा झाला?
गेल्या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडच्या संघाला कसोटी क्रिकेटमध्ये फारसे यश मिळत नव्हते. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ॲशेस मालिका आणि तुलनेने दुबळ्या मानल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका गमावली. त्यानंतर जो रूट कर्णधारपदावरून पायउतार झाला आणि बेन स्टोक्सकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. तसेच न्यूझीलंडचा माजी कर्णधार प्रशिक्षक ब्रेंडन मॅककलमची प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. स्टोक्स आणि मॅककलम या जोडीने इंग्लंडच्या कसोटी संघाचे रूपडे पालटले. इंग्लंडच्या संघाने कसोटीतही अगदी पहिल्या चेंडूपासून आक्रमक शैलीत (जिचे नामकरण ‘बाझबॉल’ असे झाले आहे) खेळण्यास सुरुवात केली. त्यांची ही आक्रमकता रोखणे प्रतिस्पर्धी संघांना अजूनही शक्य झालेले नाही. स्टोक्स आणि मॅककलम या जोडीच्या मार्गदर्शनात इंग्लंडने ११ पैकी १० कसोटी सामने जिंकले आहेत. विशेषत: या जोडीने ब्रूक, झॅक क्रॉली, बेन डकेट आणि ऑली पोप यांसारख्या युवा फलंदाजांना पाठिंबा दिला आहे. त्यांना नैसर्गिक खेळ करण्याची, चुका करण्याची मोकळीक दिली आहे. त्यांच्या प्रोत्साहनामुळे या फलंदाजांचा खेळ बहरताना पाहायला मिळतो आहे.
विश्लेषण : भारतीय महिला क्रिकेट संघ पुन्हा विश्वविजेतेपदापासून वंचित! अपयशामागे कारणे कोणती?
ब्रूकची कामगिरी का ठरते इतरांपेक्षा वेगळी?
इंग्लंडच्या सर्व युवा खेळाडूंमध्ये ब्रूकची कामगिरी वेगळी ठरते. ब्रूकला सर्वप्रथम ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली. वेस्ट इंडिजविरुद्ध तो केवळ १० धावा करून बाद झाला. सुरुवातीच्या काही ट्वेन्टी-२० सामन्यांत त्याला यश मिळाले नाही. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पणात तो केवळ १० धावा करू शकला. मात्र, गेल्या वर्षीच झालेला पाकिस्तान दौरा त्याच्यासाठी विशेष ठरला. ब्रूकने सात सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेत ७९.३३च्या सरासरीने आणि १६३.०१च्या धावगतीने इंग्लंडकडून सर्वाधिक २३८ धावा फटकावल्या. इंग्लंडने ही मालिका ४-३ अशा फरकाने जिंकली आणि ब्रूकला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. मग पाकिस्तानविरुद्धच तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ब्रूकने ९३.६०च्या सरासरी आणि ९३.४१च्या धावगतीने ४६८ धावा केल्या. तसेच त्याने प्रत्येक कसोटीत शतक झळकावण्याची किमया साधली. सध्या सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात ब्रूकने ८९ व ५४ धावा, तर दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात १८६ धावा फटकावल्या. त्यामुळे ब्रूकने कमी कालावधीतच जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे.
ब्रूकने कोणता खास विक्रम रचला?
ब्रूकने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात १७६ चेंडूंत १८६ धावांची खेळी साकारली. या खेळीदरम्यान त्याने कसोटी कारकीर्दीत ८०० धावांचा टप्पा ओलांडला. हा टप्पा केवळ ९ कसोटी डावांमध्ये ओलांडणारा तो क्रिकेट इतिहासातील पहिलाच फलंदाज ठरला. यापूर्वी कारकीर्दीतील पहिल्या ९ डावांमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम विनोद कांबळीच्या नावे होता. कांबळीने ७९८ धावा केल्या होत्या. ९ डावांनंतर ब्रूक आणि कांबळी या दोघांच्याही खात्यावर चार शतकांची नोंद आहे. मात्र, कांबळीच्या चार शतकांमध्ये दोन द्विशतकांचाही समावेश होता. ब्रूकला अजून द्विशतकी मजल मारता आलेली नाही.
विश्लेषण : बिदरी कलाकुसर, हिमरु वीणकाम आणि ‘जी-२०’ कार्यक्रमाचे पाहुणे… हे समीकरण काय आहे?
ब्रूकने क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात कधी केली?
ब्रूकच्या कुटुंबाला क्रिकेटचा वारसा आहे. ब्रूकचे वडील डेव्हिड हे इंग्लंडमधील बर्नली येथे क्लब क्रिकेट खेळायचे. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन ब्रूकने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. ब्रूकला २०१६ मध्ये यॉर्कशायर संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. तर २०१७ मध्ये त्याने कौंटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत ६१ प्रथम श्रेणी सामन्यांत १० शतके आणि २० अर्धशतकांच्या मदतीने ३६९० धावा केल्या आहेत. तसेच स्थानिक एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० स्पर्धांमध्येही त्याने चमक दाखवली आहे. ब्रूकने २०१८ सालच्या १९ वर्षांखालील विश्वचषकात इंग्लंडचे नेतृत्व केले होते. या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध त्याने नाबाद १०२ धावांची खेळी केली आणि १९ वर्षांखालील विश्वचषकात शतक करणारा तो ॲलिस्टर कूकनंतर इंग्लंडचा दुसराच कर्णधार ठरला. त्याने या स्पर्धेत इंग्लंडकडून सर्वाधिक २३९ धावा केल्या होत्या. त्याने या धावा ११५.४५ च्या धावागतीने केल्या होत्या. त्यामुळे त्याच्या आक्रमक शैलीतील फलंदाजीचे त्यावेळीही कौतुक झाले होते. आता त्याने आपल्यातील गुणवत्ता आंतरराष्ट्रीय स्तरावरही सिद्ध केली आहे. यंदा ‘आयपीएल’च्या लिलावात त्याच्यावर सनरायजर्स हैदराबादने १३.२५ कोटी रुपयांची विजयी बोली लावली.