5G Testing in India: इंटरनेट हे आता प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालं आहे. करोना कालावधीत या इंटरनेटचं महत्व जरा अधिक ठळकपणे लोकांना जाणवलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भारतामध्ये १९९५ मध्ये इंटरनेटची सुरुवात झाली. तेव्हापासून इंटरनेटचं जग अधिक विकसित झालं असून वेगाने प्रवास करत आहे. फक्त २७ वर्षांच्या प्रवासात भारतात इंटरनेट आता ५जी पर्यंत पोहोचत आहे. यासोबतच भारताने ६जी च्या दिशेने पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे.
याच महिन्यात १७ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील पहिल्या ५जी टेस्टबेडचं अनावरण केलं. नरेंद्र मोदींनी यावेळी या शतकाच्या अखेरपर्यंत देशात ६जी तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दृष्टीने काम सुरु केलं जाईल असं आश्वासनही दिलं. १जी पासून ते ५जी पर्यंत इंटरनेटने लोकांचं आयुष्य सहज केलं असून तंत्रज्ञानाच्या विस्ताराला वेग दिला आहे. समजून घेऊयात प्रत्येक ‘G’ सोबत इंटरनेटमध्ये नेमके काय बदल झाले…
१जी ते २जी पर्यंत: वॉइस कॉलिंगवर होता भर
१९७० च्या काळात जपानमध्ये सर्वप्रथम १जी ची सुरुवात झाली. पहिल्या जनरेशनच्या तंत्रज्ञानाच्या मदतीने फक्त वॉइस कॉलिंग केलं जाऊ शकत होतं. यामध्ये आवाजाचा दर्जा खराब होता, सोबतच कव्हरेज क्षेत्र फार कमी होतं आणि रोमिंगची सुविधादेखील नव्हती. १९९१ मध्ये २जी आल्यानंतर इंटरनेच्या जगाने वेग पकडला. सेकंड जनरेशनमध्ये अॅनालॉग सिग्नल पूर्णपणे डिजिटल झाले.
२जी सोबत लोकांना रोमिंग सुविधा मिळाली. याशिवाय पहिल्यांदा CDMA आणि GSM सारख्या गोष्टी समोर आल्या. जवळपास 50 kbps च्या स्पीडवर SMS आणि MMS पाठवण्याची सुविधा मिळाली. धीम्या गतीने वॉइस कॉलिंग आणि इंटरनेच्या स्पीडमध्ये सुधारणा होऊ लागली.
३जी ने घडवला मोठा बदल
२००१ मध्ये जेव्हा ३जी इंटरनेटची सुरुवात झाली तेव्हा इंटरनेट फार सहज झालं होतं. २जी च्या तुलनेत ३जीमध्ये चौपट स्पीड मिळेल असा दावा करण्यात आला होता. याच जनरेशने मोबाइलवर ईमेल, व्हिडीओ कॉलिंग, नॅव्हिगेशन मॅप, वेब बाऊंजिंग तसंच गाणी ऐकण्याची सुविधा दिली.
४जी स्पीडने जगाला दाखवला नवा मार्ग
३जी इंटरनेटच्या काळात नेटवर्क नीट मिळत नसणाऱ्या ठिकाणी इंटरटनेचा वापर करणं फार कठीण जात होतं. पण २०१० च्या जवळपास ४जी आल्यानंतर इंटरनेट सर्वांना उपलब्ध झालं. हाय स्पीड, हाय क्वालिटी, हाय कॅपिसिटी व्हॉइस आणि डेटा सुविधा अशा अनेक आश्वासनांसोबत ४जी आलं होतं. याचा स्पीड ३जी च्या तुलनेत पाच ते सात पटीने जास्त आहे.
आजकाल आपण ज्या इंटरनेटचा वापर करत आहोत तो ४ जी आहे. इंटरनेटच्या या वेगामुळे लोकांना लाईव्ह व्हिडीओ पाहणं, टॅक्सी बुक करणं, जेवणाची ऑर्डर करणं, व्हिडीओ कॉलिंग अशा गोष्टी सहज झाल्या आहेत. याच कारणामुळे इंटरनेटला लोकांची पसंती मिळत असून आधीच्या तुलनेत स्वस्त मिळत असल्याने सामान्यांपर्यंत पोहोचलेलं आहे.
५जी मध्ये काय मिळणार?
४जी मध्ये लॅटेन्सी ५० मिलीसेकंद आहे, तर ५जी मध्ये फक्त १ मिलीसेकंद आहे. लॅटेन्सी म्हणजे तुमचा डेटा किती वेळात एका पॉइंटपासून दुसऱ्या पॉइंटपर्यंत जाऊन येतो. एमआयटी टेक्नॉलॉजीच्या दाव्यानुसार, ५जी तंत्रज्ञानाचा वापर करताना डिव्हाईसला वीजेचा कमी वापर होईल, ज्यामुळे बॅटरी आणि सोबतच डिव्हाईसचं आयुष्य कित्येक पटींनी वाढेल.
५जी मध्ये फक्त डाऊनलोडिंग स्पीड वाढणार नाही तर याचे इतर अनेक फायदेही आहेत. सॅल्युलर बँडविथ वाढल्याने, स्पीड वाढल्याने आणि लॅटेन्सी कमी झाल्याने इंटरनेटचं जग आणखी वेग पकडेल.
इंटरनेटने घेरलेलं जग
आगामी काळात जगभरात स्मार्ट सिटी तयार होतील. ऑटोमॅटिक कार आणि रोबोटिक सर्जरीसारख्या गोष्टी सामान्य होतील. जगभरात दक्षिण कोरिया, अमेरिका आणि चीनसारख्या देशांमध्ये ५जी ची सुरुवात होत असताना भारतातही लवकरच याची सुरुवात होऊ शकते.
भारतात ५जी सुरु होण्याआधीच ६जी ची चर्चा सुरु झाली आहे. सांगितलं जात आहे की, आगामी काळत इंटरनेटचा वापर फक्त मोबाइल किंवा संगणकासारख्या डिव्हाइसपुरता मर्यादित राहणार नाही. पुढील काळात माणसांबोसत मशीनध्येही इंटरनेटचा वापर वाढेल. व्हर्च्युअल रिअॅलिटी, ऑगमेंटेड रिअॅलिटी आणि एचडी मोबाइल होलोग्रामसारख्या तंत्रज्ञानाची चर्चा असेल आणि यासाठी जास्त स्पीड असणाऱ्या इंटरनेटची गरज भासणार आहे.
भारत कशा पद्धतीने करत आहे ५जी ची सुरुवात?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पहिल्या ५जी टेस्टबेडचं अनावरण केलं आहे. यासाठी २२० कोटींचा खर्च करण्यात आला. याच्या मदतीने स्टार्ट अप आणि मोठ्या कंपन्यांना आपले प्रोडक्ट्स ५जी वर चाचणी करत तयार करता येतील. आतापर्यंत अशा चाचण्या फक्त विदेशात केल्या जाऊ शकत होत्या.
टेस्टबेड हा आयआयटी मद्रासच्या नेतृत्वाखालील आठ संस्थांचा समावेश असलेला एक सहयोगी प्रकल्प आहे. अनावरण करताना मोदी म्हणाले की, भारताने २०३० पर्यंत ६जी आणण्याची योजना आखली आहे आणि त्या दिशेने एक टास्क फोर्स काम करत आहे. “२१ व्या शतकातील भारतातील प्रगतीचा वेग कनेक्टिव्हिटी ठरवेल,” असंही ते म्हणाले.