फुटबॉल हा विश्वातील सर्वांत लोकप्रिय खेळ. युरोप, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका या खंडांमधील फुटबॉलच्या ‘क्रेझ’ची अन्य कोणत्याही खेळाशी तुलनाच होऊ शकत नाही. आफ्रिकेत फुटबॉलचा मोठ्या प्रमाणावर प्रसार असला, तरी अन्य सुविधांच्या बाबतीत हा खंड बराच मागे आहे. त्यामुळे अधिक चांगले जीवनमान आणि नोकऱ्या मिळाव्यात यासाठी आफ्रिकेतील लोक युरोप किंवा अमेरिकेचा मार्ग धरतात. आफ्रिकेतून स्थलांतरित झालेल्या आणि यंदाच्या युरो स्पर्धेत चमकलेल्या अनेक प्रतिभावान खेळाडूंविषयी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्पेनला कसा फायदा झाला?

स्पेनचा संघ २०१२ सालापासून मोठ्या फुटबॉल स्पर्धेत जेतेपदाच्या शोधात होता. यंदा जर्मनी येथे झालेल्या युरो स्पर्धेत सुरुवातीला स्पेनकडून जेतेपदाची अपेक्षा बाळगली जात नव्हती. मात्र, विविध वयोगटांत स्पेनला यश मिळवून देणाऱ्या लुईस डे ला फुएंटे यांची मुख्य संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर त्यांनी युवकांना संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे फळ त्यांना आणि स्पेनला यंदा युरो स्पर्धेत मिळाले. स्पेनसाठी कुमारवयीन यमाल आणि विल्यम्स यांनी चमकदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

हेही वाचा : Ashadhi Ekadashi 2024: पांडुरंगाच्या नावाची व्युत्पत्ती दडली आहे पांडुरंगपूरात; पुराभिलेखीय पुरावे काय सांगतात?

यमाल, विल्यम्समुळे स्पेनच्या शैलीत कसा बदल झाला?

२०००च्या दशकाच्या अखेरीस स्पेनकडे सर्वांत यशस्वी संघ म्हणून पाहिले जायचे. त्या वेळच्या स्पॅनिश संघावर बार्सिलोनाच्या ‘टिकी-टाका’ शैलीचा मोठा प्रभाव होता. चेंडू आपल्याकडेच ठेवणे, छोटे-छोटे पास देत प्रतिस्पर्ध्याच्या गोलपर्यंत पोहोचणे असे स्पेनचे नियोजन असायचे. परंतु झावी हर्नांडेझ, आंद्रेस इनिएस्टा, झाबी अलोन्सो, सर्जिओ बुस्केट्स यांसारखे मध्यरक्षक संघाबाहेर पडल्यानंतर स्पेनचा संघ अन्य युरोपीय संघांच्या तुलनेत मागे पडला होता. चेंडू केवळ ठेवायचा म्हणून ठेवायचा असा काहीसा रटाळपणा त्यांच्या खेळाला आला होता. मात्र, डे ला फुएंटे यांचे आक्रमक नियोजन आणि यमाल, विल्यम्स यांचा वेग यामुळे स्पेनच्या ‘टिकी-टाका’ शैलीला नवी दिशा मिळाली. डावखुरा यमाल उजव्या बाजूने, तर उजव्या पायाने खेळणारा विल्यम्स डाव्या बाजूने वेगवान खेळ करू लागला. तसेच वय कमी असल्याने त्यांना अपेक्षांचे फारसे दडपणही जाणवले नाही आणि त्यांनी यंदाची युरो स्पर्धा गाजवली. यमालने यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक गोलसाहाय्यांची (४) नोंद केली, तर विल्यम्सने इंग्लंडविरुद्धच्या अंतिम लढतीत महत्त्वपूर्ण गोल केला.

या दोघांची पार्श्वभूमी काय?

यमाल हा मूळचा इक्वेटोगिनीयन-मोरोक्कन वंशाचा, तर विल्यम्सचे पालक घानाचे. मात्र, दोघांच्याही पालकांना स्पेनने आपलेसे केले आणि त्यांच्या मुलांनी स्पेनचे नाव उंचावले. विल्यम्सचा भाऊ इनाकीही फुटबॉलपटूच. दोघेही क्लब फुटबॉलमध्ये स्पेनमधील ॲथलेटिक बिल्बाओसाठी खेळतात. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर निको विल्यम्स स्पेनसाठी खेळत असला, तरी इनाकीने आपला मूळचा देश घानाचे प्रतिनिधित्व करण्याचे ठरवले. दुसरीकडे, यमाल युरो स्पर्धेतील सर्वोत्तम युवा खेळाडू ठरला. यमालचा जन्म स्पेनचा असला, तरी त्याच्या वडिलांचा देश मोरोक्कोने त्याला त्यांच्याकडून खेळण्याबाबत विचारणा केली होती. यमालप्रमाणेच स्पेनमध्ये जन्मलेल्या अश्रफ हकिमी आणि ब्राहिम डियाझ यांनी मोरोक्कोकडून खेळण्यास पसंती दिली. यमालने मात्र स्पेनलाच आपले म्हणत ‘ला रोहा’चे प्रतिनिधित्व करण्याचा निर्णय घेतला. गेल्या हंगामात बार्सिलोनाकडून खेळताना अनेक विक्रम नोंदवल्यानंतर यमालने युरो स्पर्धेत खेळणारा स्पेनचा सर्वांत युवा खेळाडू, गोलस्कोअरर आणि युरो जिंकणारा सर्वांत युवा खेळाडू असे अनेक विक्रम आपल्या नावे केले.

हेही वाचा : विश्लेषण: कार्लोस अल्काराझ फेडरर-नडाल-जोकोविच यांच्या तोडीचा टेनिसपटू बनू शकतो का?

जर्मनीसाठी चमकलेला मुसियाला कुठला?

यजमान जर्मनीच्या संघाचे युरो स्पर्धेतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. मात्र, त्यापूर्वी या संघाने चमकदार कामगिरी केली आणि त्यांच्या यशात जमाल मुसियालाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले. २१ वर्षीय आक्रमकपटू मुसियाला सध्या जर्मनीतील बलाढ्य बायर्न म्युनिक क्लबकडून खेळतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र त्याला जर्मनी, इंग्लंड आणि नायजेरिया अशा तीन देशांकडून खेळता आले असते. याचे कारण म्हणजे, त्याच्या वडिलांची नायजेरियन-ब्रिटिश पार्श्वभूमी आहे, तर आई जर्मनीची. विशेषत: जर्मनी आणि इंग्लंड या देशांच्या फुटबॉल संघटनांनी मुसियालाला आपल्याकडून खेळण्याचा आग्रह धरला होता. २०२० मध्ये मुसियालाने २१ वर्षांखालील गटात इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले. मात्र, पुढील वर्षीच त्याने सिनियर स्तरावर जर्मनीकडून खेळण्याचा निर्णय घेतला. गेल्या दोन हंगामांत मुसियालाने बायर्नसाठी अप्रतिम कामगिरी केली असून त्याने आपली लय युरो स्पर्धेतही कायम राखली. तो चेंडू घेऊन अगदी सहजपणे धावण्यासाठी आणि आक्रमक मध्यरक्षक म्हणून खेळताना गोल करण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जातो. त्याने युरो स्पर्धेत स्कॉटलंड, हंगेरी आणि डेन्मार्क यांच्याविरुद्ध गोल नोंदवले.

इंग्लंड संघातही अनेक मिश्रवर्णी…

यंदाच्या युरो स्पर्धेत इंग्लंडने उपविजेतेपद मिळवले आणि त्यांच्यासाठी आक्रमकपटू बुकायो साकाने चांगली कामगिरी केली. २०२१च्या युरो स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंग्लंडला इटलीकडून पराभव पत्करावा लागला होता. यात साका पेनल्टी शूटआऊटमध्ये गोल करण्यात चुकला होता. मात्र, त्याने ही निराशा बाजूला सारत क्लब फुटबॉलमध्ये आर्सेनल, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर इंग्लंडसाठी चमक दाखवली आहे. साकाचे पालक मूळचे नायजेरियाचे आहेत. तसेच इंग्लंड संघातील एबेरेची एझे (नायजेरिया), मार्क गुएही (आयव्हरी कोस्ट), एझरी कोन्सा (अँगोला व कॉन्गो), कोबी मेइनू (घाना), जो गोमेझ (गांबिया) या खेळाडूंनाही आफ्रिकन पार्श्वभूमी आहे.

हेही वाचा : विश्लेषण: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि नॉन-क्रिमिलेअरचा वाद काय आहे?

फ्रान्स संघालाही आधार…

फ्रान्स संघाचा तारांकित आघाडीपटू आणि सध्या विश्वातील सर्वोत्तम फुटबॉलपटू मानला जाणारा किलियन एम्बापेलाही आफ्रिकन पार्श्वभूमी आहे. फ्रान्स संघाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या एम्बापेचे वडील मूळचे कॅमरूनचे, तर आई अल्जीरियाची आहे. मात्र, आता एम्बापेने फ्रान्सच्या सर्वकालीन सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. आगामी हंगामापासून तो क्लब फुटबॉलमध्ये बलाढ्य संघ रेयाल माद्रिदकडून खेळणार आहे. रेयाल आणि फ्रान्स संघातील एम्बापेचे सहकारी एडुवार्ड कामाविंगा आणि ऑरेलिन चुआमेनी, तसेच एन्गोलो कान्टे, ओस्मान डेम्बेले यांसह बहुतेक कृष्णवर्णीय खेळाडू हे मूळचे आफ्रिकन वंशाचे आहेत. त्याच प्रमाणे बेल्जियम (जेरेमी डोकू व अमादू ओनाना), पोर्तुगाल (नुनो मेंडेस व डॅनिलो परेरा), स्वित्झर्लंड (क्वादवो ॲन्तवी दुआ आणि मॅन्युएल अकांजी) यांसारख्या खेळाडूंनाही आफ्रिकन पार्श्वभूमी आहे. यावरूनच युरो स्पर्धेवरील आफ्रिकन प्रभाव स्पष्ट होतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Euro 2024 spain would not have won without african players the impact of african origin players print exp css
Show comments