दत्ता जाधव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युरोप आणि अमेरिकेत सूर्य अक्षरश: आग ओकू लागला आहे. लाखो नागरिक या उष्णतेच्या झळांनी होरपळून निघत आहेत. अनेक देशांतील शेती उष्णतेच्या झळांनी उद्ध्वस्त झाली आहे. जंगलांना आगी लागण्याच्या घटना घडत आहेत.

अमेरिकेत तापमानवाढीची स्थिती काय?

अमेरिकेत सूर्य अक्षरश: आग ओकू लागला आहे. अमेरिकेच्या हवामान विभागाने देशातील नागरिकांना तापमानवाढीमुळे निर्माण होणाऱ्या आणीबाणीच्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी तयार राहण्याचा इशारा दिला आहे. कॅलिफोर्नियापासून टेक्सासपर्यंत उष्णतेची लाट आहे. अरिझोनाची राजधानी फिनिक्समध्ये सलग १८ दिवस ४३ अंश सेल्सिअसवर पारा राहिला आहे. अमेरिकेतील एकतृतीयांश म्हणजे सुमारे नऊ कोटी लोकांना उष्णतेच्या झळांचा फटका बसला आहे. कॅलिफोर्निया, नेवाडा, अ‍ॅरिझोना, न्यू मेक्सिको, लुइझियाना, टेक्सास, अर्कान्सास, मिसिसिपी, अलबामा, ओक्लाहोमा आणि फ्लोरिडा या राज्यांना तापमानवाढीचा मोठा फटका बसला आहे. अमेरिकेतील वाळवंटी प्रदेशात तापमान ४८ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे.

डेथ व्हॅलीतील स्थिती काय?

जगातील सर्वात उष्ण ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील डेथ व्हॅलीमध्ये उष्णतेच्या लाटांनी होरपळ होत आहे. डेथ व्हॅलीचे तापमान रविवारी (१६ जुलै) ५४ अंश सेल्सिअसवर गेले आहे. रात्रीचे तापमानही ३८ अंश सेल्सिअस इतके राहिले. लोकांना रात्रीही घराबाहेर पडणे मुश्कील झाले होते. डेथ व्हॅलीत नोंदविले गेलेले हे सर्वाधिक तापमान आहे. यापूर्वी फर्नेस क्रीक येथे जुलै १९१३मध्ये आजवरच्या सर्वाधिक ५६.६७ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती, अशी माहिती जागतिक हवामानशास्त्र संघटनेने दिली आहे.

युरोपचीही होरपळ होत आहे का?

इटली, स्पेन, स्विर्त्झंलड, ग्रीसमध्ये उष्णतेच्या झळांनी होरपळ सुरू आहे. इटलीत गुरुवारी, २० जुलै रोजी ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. रविवारी १६ जुलै रोजी सिसिली, सार्डिनिया बेटावर तापमान ४८ अंश सेल्सिअसवर गेले होते. फ्रान्समध्ये तापमानवाढीमुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. भूमध्य समुद्राच्या प्रदेशातही उष्णतेच्या लाटेचा फटका बसत आहे. ग्रीस, स्पेन आणि स्वित्र्झलडमध्ये उष्णतेची दुसरी लाट आली आहे. वाढत्या तापमानामुळे या देशांतील जंगलांना आगी लागण्याच्या घटना घडत आहेत. स्पेनमधील जंगलांना लागलेल्या आगीच्या धुराचा सामना लोकांना करावा लागत आहे. इटली, पोर्तुगाल, ग्रीसमध्ये उष्णतेच्या झळांचे परिणाम कमी करण्यासाठी सरकार, विविध संस्था, संघटनांकडून उपाययोजना सुरू आहेत. संयुक्त राष्ट्राच्या हवामान विभागाने दोन वर्षांपूर्वी सिसिली येथे नोंदविलेल्या ४८.८ अंश सेल्सिअस तापमानाचा उच्चांक मोडण्याचा इशारा दिला आहे. उष्माघाताने होणाऱ्या मृत्यूच्या संख्येतही वाढ होण्याचा अंदाज वर्तविला आहे.

जून हा आजवरचा सर्वात उष्ण महिना?

या वर्षांचा जून महिना १७४ वर्षांच्या हवामान शास्त्राच्या इतिहासात सर्वात उष्ण महिना ठरला आहे. यंदा जून महिन्याचे तापमान सरासरीपेक्षा १.०५ अंश सेल्सिअसने जास्त नोंदविले गेले आहे. नॅशनल ओशोनिक अ‍ॅण्ड अ‍ॅटमॉस्पिअर अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या (एनओएए) नॅशनल सेंटर फॉर एनव्हार्यमेंटल इन्फॉर्मेशन (एनसीईआय) ने आपल्या अहवालात यंदाच्या जूनमध्ये जागतिक कमाल सरासरी तापमान १६.५५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. हे तापमान २०व्या शतकाच्या सरासरी तापमानापेक्षा १.०५ अंश सेल्सिअसने अधिक होते. यापूर्वी नासा, बर्कले अर्थ आणि युरोपच्या कोपर्निकस या हवामान संस्थांनीही यंदा सर्वाधिक उष्ण जून महिन्याची नोंद झाल्याची माहिती दिली होती. यंदाचा जून महासागरांसाठीही सर्वाधिक उष्ण ठरला. पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी ७० टक्के क्षेत्रफळ असलेल्या समुद्रांच्या पृष्ठभागांमध्ये यंदा एप्रिल, मे आणि जून अशा सलग तीन महिन्यांत मासिक उच्च तापमानाची नोंद झाली आहे. उत्तर अटलांटिक महासागर मार्चच्या मध्यापासून ऊबदार असल्याचे हवामानतज्ज्ञांनी म्हटले आहे.

जगभरात उष्णतेच्या लाटेची स्थिती काय?

केवळ अमेरिका, युरोपलाच उष्णतेच्या लाटांचा तडाखा बसत आहे, असे नाही. जपान, गाझा पट्टीतही उष्णतेच्या झळांनी होरपळ होत आहे. युरोपात पारा ४० अंश सेल्सिअसवर गेला आहे. युरोपात हृदयविकार, उष्माघाताने होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली आहे. जागतिक हवामान संघटनेने अमेरिका, युरोपसह उत्तर गोलार्धातही उष्णतेच्या झळांचा इशारा दिला आहे. उत्तर अमेरिका, आशिया, उत्तर आफ्रिका, भूमध्य प्रदेशात तापमान ४० अंशांवर अधिक काळ टिकून राहण्याची शक्यता आहे. युरोपात सर्वाधिक तापमान इटलीत आहे, पारा ४३ अंशांवर गेला आहे. युरोपात जंगलांना वणव्यांनी वेढले आहे. ग्रीसमध्ये जंगलांना आगी लागण्याच्या घटना वाढत आहेत. गाझा पट्टीत तापमान ३८ अंश सेल्सिअसवर गेले आहे. जपानची राजधानी टोकियोत तापमान ३८ अंशांवर गेले आहे. पुढील काही दिवस तापमानवाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Europe america hit by heat waves print exp 0723 ysh
Show comments